‘गूगल मॅप’वर नगर येथील ‘पॉटींजर रोड’चे नाव दाखवले जात आहे ‘औरंगजेब रोड !’

  • गूगलचा भारतद्वेष ! उद्या जर गूगलने भारताला पाकिस्तानचा भाग दाखवले, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही भारतातील अनेक भागांना इंग्रज आणि मोगल आक्रमकांची नावे असणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! सरकारने ही नावे तात्काळ पालटून त्यांना भारतीय नावे द्यायला हवीत, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !

नगर – ‘गूगल मॅप’वर येथील ‘पॉटींजर रोड’ या ठिकाणाचे नाव ‘औरंगजेब रोड’ असे दाखवले जात आहे. हा भाग भिंगार सैनिकी छावणी परिषदेच्या सीमेत येतो. या भागात सैन्याचे गोपनीयतेसह सुरक्षेविषयीचे नियम लागू आहेत. या रस्त्यावर सैनिकी अधिकार्‍यांचे जुने बंगले आहेत. पूर्वीवरून इंग्रज अधिकार्‍याच्या नावावरून या भागाला ‘पॉटींजर रोड’ हे नाव देण्यात आले होते. गूगल मॅप हे सरकारी आणि अधिकृत नावांसह लोकांनी ‘पोस्ट’ केलेल्या नावांचाही समावेश करतो. एखादी गोष्ट अनेकांनी नमूद केल्यास ‘गूगल’कडून ती स्वीकारली जाते, तसेच अनेकांनी हरकत घेतल्यास ती पालटलीही जाते, असे सांगण्यात येते.

नगरचा भुईकोट किल्ला कह्यात घेण्यासाठी औरंगजेबाने आटोकाट प्रयत्न केले होते. (ज्या क्रूरकर्मा औरंगजेबाने स्वराज्य बळकावण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण, तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! – संपादक) परतीच्या प्रवासात वर्ष १७०७ मध्ये त्याचा नगरमध्येच मृत्यू झाला होता. ते ठिकाण या रस्त्यापासून जवळच आहे. या प्रकाराविषयी ‘वैभवशाली नगर संस्थे’चे भैरवनाथ वाकळे म्हणाले की, सैन्याच्या सीमेतील कोणतेही काम हे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ‘गूगल’ने नगरमधील रस्त्यांची नावे जिल्हा आणि सैन्यदल यांना विचारून द्यायला हवीत. (आतापर्यंत देशाच्या नकाशाचे विकृतीकरण करणारी अशी विदेशी आस्थापने आता देशांतर्गत विभाजनवादाची विषारी बीजे रोवत आहेत, हेच यावरून लक्षात येते. केंद्र सरकार आता तरी अशांवर तात्काळ कठोर कारवाई करणार का ?- संपादक)