गोव्यातील ‘गोमेकॉ’मध्ये मध्यरात्री ऑक्सिजन संपल्याने १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू !

४ दिवसांत ७४ जणांचा मृत्यू !

पणजी (गोवा) – येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. १३ मेच्या रात्री २ ते १४ मेच्या सकाळी ६ वाजेपर्यंत १३ जणांचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी १० मे या दिवशी २६, ११ मे या दिवशी २०, १२ मे या दिवशी १५ आणि १३ मेला १३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गोवा सरकारने मेडिकल कॉलेजमधील ऑक्सिजन पुरवठ्याच्या प्रश्‍नावर समितीची नियुक्ती केली आहे. रुग्णालयांना केल्या जाणार्‍या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचे दायित्व या समितीला देण्यात आले आहे. तसेच येणार्‍या अडचणींवर तातडीने तोडगा काढण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील ३ दिवसांत समितीला अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दुसरीकडे गोवा फॉरवर्ड पक्षाने या मृत्यूंवरून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.