चिखली (जिल्हा बुलढाणा) येथील १० खासगी कोविड रुग्णालयांतील १३ आधुनिक वैद्यांचे सामूहिक त्यागपत्र !

वाढता राजकीय हस्तक्षेप आणि सुविधांचा अभाव यांमुळे ताण वाढल्याने घेतला निर्णय !

  • खासगी रुग्णालयांतील आधुनिक वैद्यांकडून चुका होत असल्याचे निदर्शनास आल्यास लोकप्रतिनिधींनी त्या दाखवून त्यांच्याकडून योग्य पद्धतीने सेवा करवून घ्यावी; मात्र आधुनिक वैद्यांच्या कामात सतत ढवळाढवळ करू नये !
  • आधुनिक वैद्यांच्या त्यागपत्रामुळे रुग्णालयातील रुग्णांचे किती हाल होतील, याचा विचारच न केलेला बरा !

बुलढाणा – राजकीय हस्तक्षेप आणि सुविधांअभावी ताण वाढल्याने चिखली येथील १० खासगी कोविड रुग्णालयांतील रुग्णसेवा देणार्‍या १३ आधुनिक वैद्यांनी सामूहिक त्यागपत्र पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे १४ मे या दिवशी दिले आहे. पालकमंत्री या त्यागपत्रांविषयी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बुलढाण्यात प्रतिदिन सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय रुग्णालयात कुठेही बेड उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत काही रुग्ण खासगी कोविड रुग्णालयांत उपचार घेत आहेत; मात्र कोणताही राजकीय पुढारी किंवा नेता येऊन तेथे आधुनिक वैद्यांना धमक्या देतात. त्यामुळे सतत राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. तसेच ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन यांचा तुटवडा यांमुळे खासगी रुग्णालये चालवणे कठीण झाले असून मानसिक त्रासही वाढला आहे. या कारणास्तव १३ आधुनिक वैद्यांनी त्यागपत्रे दिली आहेत.