नरवणे (जिल्हा सातारा) येथे वाळू उपशाच्या वादातून २ चुलत भावांचा मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, १८ मार्च (वार्ता.) – वाळू उपशाच्या कारणावरून माण तालुक्यातील नरवणे गावातील २ चुलत भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये वाद झाले. या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये २ चुलत भावांचा मृत्यू झाला आहे.

२२ फेब्रुवारी या दिवशी नरवणे येथे शासनाधीन असलेल्या वाळूचा लिलाव करण्यात आला होता. हा लिलाव चंद्रकांत जाधव यांनी घेतला होता; मात्र चंद्रकांत जाधव हे अनधिकृत वाळूउपसा करत असल्याची तक्रार धोंडिबा जाधव यांनी तलाठ्यांकडे केली. ही बातमी यांना कळताच चंद्रकांत जाधव आणि धोंडिबा जाधव यांच्यात वाद झाले. पुढे वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये चंद्रकांत नाथाजी जाधव यांचा जागेवरच, तर विलास धोंडिबा जाधव यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाला. मारहाणीमध्ये लाकूड, लोखंडी पाईप, कुर्‍हाडी आणि चाकूचा उपयोग करण्यात आला होता. याविषयी परस्परविरोधी तक्रारी नोंद झाल्या असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.