सरकारी कर्मचार्‍यांना वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करण्याचा निर्णय स्वागतार्ह !  – चंद्रशेखर उपरकर, राज्य सरकारी कर्मचारी संघटना

कार्यालयात गुटखा खाण्यावरही बंदीची मागणी

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व कर्मचार्‍यांना वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू केल्याविषयी राज्यशासनाचे अभिनंदन करत हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते चंद्रशेखर उपरकर यांनी व्यक्त केली आहे.

मागील अनेक वर्षे शासनाच्या विविध खात्यांतील फक्त तांत्रिक कर्मचारी, शिपाई, पहारेकरी, परिचारिका (नर्सेस), फिटर, चालक, मेकॅनिक, सफाई कामगार, मजूर या ठराविक कर्मचार्‍यांना शासनाने वस्त्रसंहिता लागू केली होती; मात्र कार्यालयातील कर्मचारी आणि वर्ग ३ चे अधिकारी यांना वस्त्रसंहिता लागू नसल्याने जनतेला अधिकारी कोण ? आणि कर्मचारी कोण ? हे समजून येत नव्हते. शिवाय काही ‘ड्रेसकोड’ असलेले कर्मचारी दिलेल्या ड्रेसचा कार्यालयात वापर करत नव्हते, तर काही जण स्वत:च ‘साहेब’ असल्याच्या आविर्भावात वागत होते. त्यामुळे आता सरकारने सर्वसमावेशक असा निर्णय घेऊन चांगला पायंडा पाडला आहे. आता काही कार्यालयांतील कर्मचारी अत्यंत गबाळे, रंगीबेरंगी टी-शर्ट, वगैरे घालून येतात, तसेच कार्यालयात गुटखा खाण्यावरही पूर्ण बंदी घातल्यास कार्यालयीन स्वच्छता अधिक चांगली राहील, असे उपरकर यांनी म्हटले आहे.