भाजप खासदार कंगना राणावत अन् अरुंधती रॉय यांना देण्यात येत असलेल्या वागणुकीतील भेद !

१. भाजप खासदार कंगना राणावत यांना मारहाण करणार्‍या महिला पोलिसाचे पुरोगाम्यांकडून समर्थन

खा. कंगना राणावत (डावीकडे) व अरुंधती रॉय (उजवीकडे)

‘अभिनेत्री कंगना राणावत हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यानंतर त्या देहली येथे जाण्यासाठी चंडीगड विमानतळावर आल्या असता तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍याने त्यांना मारहाण केली. त्यानंतर मारहाण करणारी महिला पोलीस कुलविंदर कौर म्हणाल्या, ‘‘कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन चालू असतांना कंगना राणावत यांनी चुकीचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांना मारले.’’ या प्रकरणाची चौकशी होऊन ४ कर्मचारी निलंबित करण्यात आले. (कुलविंदर कौर या पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्या आहेत.) यात दोषी महिला पोलीस कर्मचार्‍याच्या विरुद्ध चौकशी होऊन तिलाही शिक्षा होईल; परंतु या घटनेविषयी चित्रपटसृष्टीतील आणि राजकारणातील अनेकांनी मारहाण करणार्‍या कुलविंदरच्या बाजूने मते व्यक्त केली. काहींनी तिला लक्षावधी रुपये बक्षीस म्हणून द्यायचे मान्य केले, तर कुणी तिची नोकरी गेल्यास तीही द्यायची घोषणा केली. एरव्ही महिलांवरील अत्याचार आणि महिलांना समान वागणूक देणे यांविषयी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीही कंगना यांच्या विरुद्ध बोलत होत्या. यामागील एकच कारण होते की, त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत, तसेच गेल्या काही वर्षांत त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुरोगाम्यांसाठी त्या शत्रू ठरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी इस्रायलच्या राजदूतांची भेट घेतली. त्यामुळे तथाकथित समाजसुधारक आणि पुरोगामी यांना दु:खी व्हायला आणखी काय कारण हवे ?

२. देशद्रोही वक्तव्याप्रकरणी अरुंधती रॉय यांच्या विरुद्ध खटला चालण्यास अनुमती

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

नवनिर्वाचित खासदार कंगना यांच्या मारहाण प्रकरणानंतर थोड्याच दिवसात अरुंधती रॉयविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली. त्यांना म्हणे, ‘बुकर प्राइज विनिंग ऑथर’(बुकर पुरस्कार जिंकणार्‍या लेखिका) असेही संबोधले जाते. २१.१०.२०१० या दिवशी देहली येथील एका परिषदेत बोलतांना अरुंधती यांनी ‘काश्मीर हा भारताचा कधीही अविभाज्य भाग नव्हता’, असे वक्तव्य केले होते. त्याच वर्षी शेख शौकत हुसेन हा काश्मीरातील तरुण पोलिसांनी केलेल्या अश्रुधुराच्या मार्‍यामध्ये मारला गेला होता. अरुंधती यांच्या वक्तव्याच्या विरोधात काश्मिरी नेते सुशील पंडित यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर महानगर दंडाधिकार्‍यांनी अरुंधती रॉय यांच्यासह काही व्यक्तींच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंदवले होते. या प्रकरणी मे २०२४ मध्ये अरुंधती यांच्या विरुद्ध खटला चालण्याची अनुमती देण्यात आली. त्याच काळात भाजप मित्रपक्षांसह केंद्रात परत सत्तेत आला. त्यानंतर सर्व विचारवंत आणि पुरोगामी यांनी याला ‘वसाहती युग-देशद्रोही कायदा’ आदी संबोधले, तसेच कथित कायदेतज्ञांसह अनेकांनी त्यांच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रकरणात ही मंडळी ‘त्यांचा न्यायसंस्थेवर विश्वास आहे’, असे का म्हणत नाही ? एकंदरच सोयीच्या गोष्टी करणे, ही यांची जुनीच खोड आहे. खासदार राणावत आणि अरुंधती यांच्या प्रकरणांची तुलना केल्यावर विचारवंत अन् पुरोगामी यांच्या वागणुकीतील भेद लगेच लक्षात येतो.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२२.६.२०२४)

संपादकीय भूमिका 

खासदार कंगना राणावत आणि देशद्रोही अरुंधती रॉय यांच्या प्रकरणांच्या तुलनेतून पुरोगाम्यांच्या दुटप्पी वागणुकीतील भेद लक्षात घ्या !