Temple Museum In Ayodhya : अयोध्येत मंदिरांचे संग्रहालय बांधणार !

  • ७५० कोटी रुपये खर्च होणार

  • ‘टाटा सन्स’ आस्थापनाकडे दायित्व

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येत मंदिरांचे एक मोठे संग्रहालय उभारले जाणार आहे. हे संद्रहालय टाटा समूह बांधणार असून त्यासाठी अंदाजे ६५० कोटी रुपये खर्च येणार आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला संमती दिली. सरकारच्या ‘एक्स’ खात्यावरून ही माहिती देण्यात आली. जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारण्यासाठी आणि तेचालवण्यासाठी भूमीचा वापर करण्यासाठी परवाना देण्याच्या प्रस्तावाला संमती देण्यात आल्याचे यात सांगण्यात आले आहे.

१. संग्रहालयाच्या निर्णयाविषयी उत्तरप्रदेशचे पर्यटनमंत्री जयवीर सिंग म्हणाले की, मंदिरांच्या संग्रहालयासाठी ही भूमी टाटा समुहाला ९० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर १ रुपयाच्या ‘टोकन’ रकमेवर दिली जाईल. हे संग्रहालय अत्याधुनिक असेल आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ते बांधले जाईल. भारतातील प्रसिद्ध मंदिरांच्या वास्तू आणि इतिहास यांची माहिती संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या प्रस्तावित संग्रहालयात ‘लाईट अँड साऊंड शो’चीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

२. या संग्रहालयाच्या बांधकामाविषयी ‘टाटा सन्स’ने म्हटले आहे की, ते त्यांच्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ निधीतून ६५० कोटी रुपये खर्च करून मंदिराचे संग्रहालय बांधणार आहेत. अयोध्येच्या सदर तहसीलमधील मांझा जामतारा गावात हे संग्रहालय बांधले जाणार आहे. त्यामुळे गावाभोवती आणखी मूलभूत सुविधा निर्माण होतील. यासाठी अनुमाने १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, म्हणजे एकूण ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

३. टाटा समुहाने हे संग्रहालय बांधण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा गेल्या वर्षी मांडला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. हा प्रस्ताव पंतप्रधानांना फार आवडला. त्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांना या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आणि आता या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

४. अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी येणारे भाविक आणि पर्यटक या संग्रहालयालाही भेट देतील आणि त्यामुळे या ठिकाणाचा पर्यटनस्थळ म्हणून आणखी विकास होईल, अशी अपेक्षा आहे.

५. श्रीराममंदिराचे कामही २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. पहिल्या मजल्याचे काम जुलैअखेर पूर्ण होणार आहे.

संपादकीय भूमिका 

मंदिरांचे संग्रहालय बांधण्यासह देशात असलेली सर्व मंदिरे कशी चांगली रहातील ? आणि तेथील सात्त्विकता कशी टिकून राहील ?, यांसाठीही प्रयत्न झाला पाहिजे !