काँग्रेस नेते विरियातो, तुम्ही चुकीचेच बोलला !

दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा, त्यातील तांत्रिक अडचणी, त्यामुळे लोकांना होणारा त्रास, विशिष्ट लोकांना मिळणारी सवलत हे सगळे कळीचे मुद्दे एका बाजूला आणि त्याची आवश्यकता पटवण्यासाठी काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे लोकसभा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केलेले विधान एका बाजूला. ते पटण्यायोग्य आणि स्वीकारण्यायोग्य अजिबात नाही.

१. ‘गोमंतकियांना दुहेरी नागरिकत्व बहाल करण्या’विषयी विरियातो यांचे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्याशी झालेले बोलणे

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

‘गोंयचो आवाज’च्या माध्यमातून समाजकारणात सक्रीय असतांना काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांच्या सांगण्यावरून १९ मार्च २०१९ या दिवशी विरियातो हे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना भेटले. विरियातो यांनी त्यांच्यासमोर १२ मागण्या ठेवल्या, ज्यात गोमंतकियांना दुहेरी नागरिकत्व बहाल करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी त्यांना ‘दुहेरी नागरिकत्व राज्यघटनेच्या चौकटीत बसते का ?’, असे विचारले. त्यावर त्यांनी ‘नाही’, असे सांगितले. असे असेल, तर ‘त्यावर चर्चा होणार नाही’, असे राहुल गांधी त्यांना म्हणाले. त्यावर विरियातो यांनी ‘२६ जानेवारी १९५० या दिवशी जेव्हा राज्यघटना लागू झाली, तेव्हा आम्ही (गोवा) भारताचा भाग नव्हतो. वर्ष १९६१ मध्ये गोवा स्वतंत्र झाला, तेव्हा आम्हाला सहभागी न केलेली राज्यघटना आणून आमच्या माथी मारली. आता तुम्ही आम्हाला सांगता की, (आमची मागणी) घटनाबाह्य आहे. तुमच्या पणजोबांनी (जवाहरलाल नेहरू यांनी), गोमंतकीय त्यांचे भविष्य ठरवतील, असे आझाद मैदानात म्हटले होते. प्रत्यक्षात आमचे भविष्य इतरांनीच ठरवले. काश्मीरसाठी कलम ३७० (विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम) लागू केले. गोव्यासाठी असे काहीच केले नाही’, असे म्हणून त्यांनी दुहेरी नागरिकत्व गोमंतकियांसाठी किती महत्त्वाचे आहे, ते सांगितले. ही सर्व हकीकत विरियातो यांनी बाणावली (गोवा) येथील एका प्रचारसभेत सांगितली. ही घटना वर्ष २०१९ मधील असल्याने त्याला वर्ष २०२२ मधील परराष्ट्र खात्याच्या आदेशाचा संदर्भ नाही; पण दुहेरी पारपत्र बाळगणार्‍यांसाठी समस्या अधिक तीव्र बनली आहे.

२. नागरिकत्वाविषयी भारत सरकारने पोर्तुगालकडून आवश्यक ती स्पष्टता करून न घेतल्याचा परिणाम

गोवा मुक्तीनंतर १९ डिसेंबर १९६१ पासून या भूमीत राज्यघटनेची कार्यवाही चालू झाली. त्यामुळे या भागांमध्ये ‘भारतीय कायदे’ आणि १९५५ चा ‘भारतीय नागरिकत्व कायदा’ लागू झाला. याच दुरुस्तीन्वये गोव्यात ‘विदेशी कायदा १९४६’ आणि ‘विदेशींची नोंदणी कायदा १९३९’ लागू झाला. गोवा, दमण आणि दीव यांसाठी वर्ष १९६२ मध्ये जारी केलेल्या नागरिकत्वाच्या आदेशानुसार जी व्यक्ती किंवा तिचे पूर्वज २० डिसेंबर १९६१ या दिवसापूर्वी जन्माला आले आहेत, ते भारताचे नागरिक ठरतात. इथेच हा विषय संपायला हवा होता; पण ‘गोवा हा भारताचा भाग होता, त्यावर पोर्तुगालने आक्रमण केले आणि गोवा मुक्त झाल्यानंतर तो पुन्हा भारताचा भाग झाला’, हे पोर्तुगीज मानायलाच सिद्ध नव्हते. त्यामुळे त्यांनी गोमंतकियांना त्यांच्या देशाचे नागरिक मानणे चालूच ठेवले. हा त्यांचा मोठेपणा नव्हता. उलट भारताच्या सार्वभौमत्वाची केलेली पायमल्ली होती. त्याविषयी पोर्तुगालकडून आवश्यक असलेली स्पष्टता भारत सरकारने करून घेतली नाही.

३. विरियातो यांच्या विधानाचे कुठल्याही पद्धतीने समर्थन करणे अशक्य !

कारगिल युद्धात लढलेले कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची देशभक्ती आणि देशप्रेम यांविषयी शंका घेणे करंटेपणा ठरेल. काँग्रेसचे दुसरे उमेदवार अधिवक्ता रमाकांत खलप यांनी अगदी ग्रेटा थेनबर्गने म्हटलेल्या ‘हाऊ डेअर यू’च्या (तुम्ही धाडस कसे केले ?) आविर्भावात त्यांच्या देशभक्तीविषयी शंका (पत्रकारांनी घेतली नव्हती; पण बहुधा त्यांना भाजप नेते, कार्यकर्ते यांच्याविषयी बोलायचे असावे) घेण्यावरून ‘हू आर् यू ?’ (तुम्ही कोण आहात ?), असे विचारले. भाजपने त्या वाक्याचा राजकीय हेतूने वापर करणे क्रमप्राप्त आहे. भाजपची कुणी व्यक्ती असे बोलली असती, तर काँग्रेस गप्प बसली असती का ? त्यांनी त्याचा राजकीय लाभ उचललाच असता. प्रश्न राजकारण करण्याचा नाही, तर त्या वाक्यातून विरियातो यांना नेमके काय म्हणायचे आहे ? हा आहे. ज्याचे उत्तर तेच देऊ शकतील; पण ज्या पद्धतीने त्यांनी हा मुद्दा मांडला आणि विषय पुढे नेला, ते सांगतांना जी वाक्ये उच्चारली, ती चुकीचीच होती. त्याचे कुठल्याही पद्धतीने समर्थन करता येत नाही.

विरियातो

४. विरियातो यांची अत्यंत चुकीची आक्षेपार्ह वाक्ये

अ. ‘पोर्तुगाल काय समजत होते किंवा समजत आहे ? यापेक्षाही ‘मुक्त होण्यापूर्वी गोवा भारताचा भाग नव्हता’, असे म्हणतांना विरियातो यांच्या तसे म्हणण्याचा नेमका अर्थ काय काढायचा ? पोर्तुगीज येण्यापूर्वी गोवा स्वतंत्र देश नव्हता; गोवा हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. अर्थात् त्यांनाही त्याविषयी शंका नसावी. अनेक ख्रिस्त्यांसाठी आणि काही हिंदूंसाठीही दुहेरी पारपत्र असणे, हे कौटुंबिक भरणपोषणासाठी आवश्यक गोष्ट झाली आहे; पण दुहेरी नागरिकत्वाची आवश्यकता पटवत असतांना असे वाक्य टाळणे आवश्यक होते.

आ. दुसरे आक्षेपार्ह वाक्य म्हणजे ‘राज्यघटना लादली’. सगळी संस्थाने विलीन झाली तेव्हा आणि कालौघात नवी राज्ये निर्माण झाली, तेव्हाही त्यांचा विचार राज्यघटनेच्या संदर्भात घेण्यात आला नव्हता. तशी आवश्यकताही नव्हती. नेहरू म्हणाले ते राज्यघटनेच्या संदर्भात किंवा विशेषाधिकारासंदर्भात नसावे. विरियातो यांनी ते ओढून ताणून राज्यघटना लागू करण्याशी जोडले आहे. भारतीय राज्यघटना लागू झाली नसती, तर गोव्याकडे स्वत:ची राज्यघटना त्या वेळेस होती का ? विरियातो काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, ती ‘थोपलेल्या’ राज्यघटनेनुसार आहे का ? ‘गोवा हा पोर्तुगालचा भाग होता आणि आहे’, अशा रांगेत नेऊन सोडणारे हे वाक्य उच्चारणे केवळ गैरलागूच नव्हे, तर चुकीचेच होते.

५. वसाहतवादी विचारसरणी अद्याप सक्रीय

‘भारत हा कधीच एक देश नव्हता; अनेक संस्थानांचे ते कडबोळे होते’, या विचारधारेचा पगडा अनेक विचारवंत आणि शासनकर्ते यांवर मोठ्या प्रमाणात आहे. वसाहतवादी राजवट जरी संपली, तरी वसाहतवादी विचारसरणी अद्याप सक्रीय आहे. दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावर असलेल्या समस्या सोडवणे, त्यातून पर्यायी मार्ग सुचवणे चुकीचे नाही; पण त्यासाठी गोवा राज्य आणि राज्यघटना यांविषयी चुकीची भूमिका, देश संरक्षणासाठी लढलेल्या एका योद्ध्याने चुकीच्या पद्धतीने मांडणे स्वीकारण्यायोग्य नाही. त्यासह विरियातो यांना लगेच ‘देशद्रोही’ लेबल चिकटवणेही तितकेच अयोग्य ठरेल. विरियातो यांचे म्हणणे आणि मांडणी चुकली, यात शंकाच नाही. त्याविषयी त्यांनी स्वतःची भूमिका अधिक स्पष्ट करणे क्रमप्राप्त आहे. विरियातो, तुमच्या देशप्रेमाविषयी शंका घेण्याचे काहीच कारण नाही; पण तरीही तुम्ही चुकीचेच बोलला !

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (२४.४.२०२४)

(साभार : फेसबुक)