‘आम आदमी पक्षा’च्या (‘आप’च्या) आडून देहली सरकारचा खजिना लुटण्याचे षड्यंत्र !

‘आम आदमी पक्षा’चे नेते आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यावरून ‘आप’कडून आंदोलन करून आणि गदारोळ माजवून ‘आपचे नेते पारदर्शी अन् प्रामाणिक आहेत’, असे सांगत आहेत; पण या पक्षाची पार्श्वभूमी काय आहे ? आणि त्यांची स्थिती, त्यांचे भ्रष्टाचार यांचा भांडाफोड करणारा लेख येथे देत आहोत.

१. अरविंद केजरीवाल ‘इमानदार (प्रामाणिक)’ नाही, तर ‘पांढरपेशा दरोडेखोर’ !

‘देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे तिहार कारागृहात असून त्यांना न्यायालयाने जामीन दिलेला नाही. ‘मी कारागृहात राहूनही सरकार चालवीन’, असे त्यांनी उघडपणे म्हटले आहे. ते विसरले की, उत्तरप्रदेशातील आतिक अहमद, मुख्तार अन्सारी, विकास दुबे यांसारखे अनेक मोठे गुंड कारागृहात राहून गुन्हेगारी साम्राज्य सांभाळायचे. त्यामुळे केजरीवाल एक प्रकारे सांगत आहेत की, ते ‘व्हाईट कॉलर डॉन’ (पांढरपेशी गुंड) आहेत. ही चेष्टा नसून ते खरोखर एक मोठे गुंड किंवा दरोडेखोर आहेत, असे कुणी म्हटले तर त्यात आश्चर्य काय ? फार वर्षांपूर्वी ‘मशाल’ नावाचा एक हिंदी चित्रपट येऊन गेला. हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. त्यात दिलीप कुमार यांनी एका पत्रकाराची भूमिका केली आहे. दिलीप कुमार एका मोठ्या गुंडाच्या मागे लागतो आणि त्याच्या बातम्या छापतो. त्यामुळे त्या गुंडाच्या ठिकाणांवर छापे टाकले जातात. एक दिवस तो गुंड दिलीप कुमारच्या मालकावर दबाव आणतो आणि त्याला नोकरीवरून काढण्यास बाध्य करतो. त्यानंतर दिलीप कुमार एक लहानचे वृत्तपत्र चालू करतो. त्यामुळे त्याची चेष्टा करण्यासाठी तो गुंड खलनायक अमरिश पुरी त्याच्या कार्यालयात जातो. तेथे दिलीप कुमारची चेष्टा करतांना तो म्हणतो, ‘कुठे एका मोठ्या वृत्तपत्राचा पत्रकार होतास आणि आता कुठे या लहानशा वृत्तपत्राचा संपादक बनून बसला

आहे ? काय आवश्यकता होती माझ्याशी ‘पंगा’ (भांडण) घेण्याची ? यात तुला काय मिळाले ? इत्यादी…’ तेव्हा दिलीप कुमार चिडतो आणि त्याला एक थापड मारतो. तो म्हणतो, ‘याहून अधिक चांगले उत्तर मला सुचले नाही.’ त्यानंतर दिलीप कुमार अमरिश पुरीला जे म्हणतो, त्या संकल्पनेवर काही वर्षांनी ‘आम आदमी पार्टी’ नावाचा एक पक्ष बनला. दिलीप कुमार अमरिश पुरीला म्हणतो, ‘तू तर एक गुंड आहेस; पण मी बुद्धीवादी आहे आणि तुझ्या बुद्धीहून माझी बुद्धी मोठी आहे. विचार कर, मी जर गुंड बनलो, तर तुमच्यासारख्यांना कुठे जागा शेष राहील ? अल्प बुद्धी असतांना जर तू एवढे गुन्हे करत असशील, तर माझ्यासारखा व्यक्ती गुंड बनला, तर काय होईल ?’ त्यानंतर या संघर्षात हळूहळू दिलीप कुमार स्वत:च एक मोठा गुंड बनतो. केजरीवाल याहून वेगळे नाहीत.

केजरीवाल यांनी पांढरपेशा लोकांची एक टोळीवजा संघटना बनवली. त्याला ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ हे नाव दिले. त्यानंतर सामाजिक माध्यमांचा वापर करून देशात एक भुलभुलैय्या निर्माण केला. ‘सर्व राजकीय पक्ष भ्रष्ट झाले आहेत. सर्व जण एकमेकांशी मिळालेले आहेत. सर्व राजकीय पक्ष जनतेला लूटत आहेत. या राजकारणात आपल्याला परिवर्तन आणायचे आहे’, अशा विविध घोषणा देऊन केजरीवाल यांनी आंदोलन चालू केले होते.

वर्ष २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देहलीत अनुमाने १५ दिवस उपोषण केले होते. ते प्रकरण एवढे मोठे झाले की, काँग्रेसच्या तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने (‘यूपीए’ने) लोकपाल विधेयक संमत केले. त्यानंतर केजरीवाल यांनी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि ‘आम आदमी पार्टी’ हा पक्ष काढला. त्यामुळे अण्णा हजारे केजरीवालपासून लांब गेले.  केजरीवाल यांनी पक्ष काढला; तेव्हा मशाल चित्रपटातील दिलीप कुमारचा ‘माझ्यासारखा बुद्धीमान भ्रष्टाचार करण्याच्या मैदानात आला, तर कायद्याच्या चिंधड्या उडवून टाकेल’, हा संवाद समजून घेणे आवश्यक आहे; कारण मुख्यमंत्री बनल्यावर केजरीवाल यांनी तेच केले.

२. सत्तेसाठी प्रामाणिकपणा आणि मूल्ये यांच्याशी तडजोड 

वर्ष २०१३ च्या डिसेंबरमध्ये छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांसह देहलीचीही विधानसभा निवडणूक झाली. तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी सर्व पक्षांच्या विरोधात प्रतिदिन पत्रकार परिषदांचा धडाका लावला होता. कोणतेही पुरावे नसतांना काहीतरी कागद फडकावून मनात येईल, ते खोटे आरोप केले. या आरोपांचे प्रकरण न्यायालयात गेले, तेव्हा त्या सर्व आरोपांसाठी केजरीवाल यांनी क्षमायाचना केली. यावरून तो खरा बदमाश कसा आहे, हे कळते. त्यानंतर ‘मला काही माहिती नाही. कुणीतरी माहिती दिली होती, मी क्षमा मागतो’, असे न्यायालयात सांगितले. केजरीवाल यांना सत्यता किंवा प्रामाणिकपणा यांच्याशी काडीचाही संबंध नव्हता, तर केवळ सत्तेशी मतलब होता. त्यांनी त्यांच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती, ‘मी काँग्रेसशी कधीही हात मिळवणार नाही. काँग्रेसचे साहाय्य घेऊन कधीच सरकार बनवणार नाही’; परंतु पहिल्याच दिवशी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन ते ४९ दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते.

३. भ्रष्टाचाराच्या आड येणार्‍या नेत्यांची आम आदमी पक्षातून हकालपट्टी

श्री. भाऊ तोरसेकर

अरविंद केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले, तेव्हा देहलीच्या रामलीला मैदानात शपथविधी झाला होता. या शपथविधीसाठी ते ‘मेट्रो ट्रेन’ने आले होते. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘आम्हाला गाडी नको, बंगला नको.’’ आता हा मनुष्य तेव्हा किती खोटा बोलत होता, हे संपूर्ण माध्यमांमधून पसरत आहे. ते परत सांगण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर ते पंतप्रधान मोदी यांचा पराभव करण्यासाठी वाराणसी येथे पोचले, तसेच लोकसभेसाठी देशभर ‘आम आदमी पक्षा’चे ४०० हून अधिक उमेदवार उभे केले. स्वत: केजरीवाल ही निवडणूक पराभूत होऊन देहलीला परतले. त्यानंतर त्यांना ‘आटेदाल’चा (कणीक आणि डाळीच्या पिठाचा) भाव समजला.

वर्ष २०१५ मध्ये देहलीच्या परत विधानसभा निवडणुका झाल्या. लोकांनी यांना भरघोस  प्रतिसाद देऊन त्यांचे ७० मधील ६७ आमदार निवडून दिले. त्यात भाजपचे ३ होते आणि काँग्रेसचा तर एकही निवडून आला नव्हता. त्यामुळे केजरीवाल दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले. या निवडणुकीनंतर त्यांचे २ सहकारी प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव अस्वस्थ झाले. ‘केजरीवाल त्यांच्याच पक्षात हुकूमशहा बनत चालले आहेत’, हे लक्षात आल्यानंतर त्यांचे सहकारी तक्रार करू लागले. त्यानंतर केजरीवाल यांनी त्यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षातून काढणे चालू केले. प्रशांत भूषण आणि त्यांचे वडील शांतीभूषण यांना काढले. त्यानंतर योगेंद्र यादव यांना काढले, शाजिया इल्मी निघून गेली. कालांतराने कुमार विश्वासही निघून गेले. अर्थात् या लोकांनी पक्षातून निघून जावे, अशीच परिस्थिती निर्माण केली गेली. कपिल मिश्रा हे केजरीवाल यांच्या दुसर्‍या सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनाही ‘आप’ पक्ष सोडून जावे लागले. हा इतिहास यासाठी सांगितला; कारण वर्ष २०१५ मध्ये केजरीवाल दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले, तेव्हाच त्यांनी ठरवले होते की, ‘त्यांच्या पक्षात कुणीच इमानदार असू नये.’ सरकार आल्यावर केजरीवाल यांनी पहिला निर्णय घेतला, ‘आपल्याला संपूर्ण खजिना लुटायचा आहे.’ म्हणून त्यांना थांबवणार्‍या प्रत्येकाला बाहेरचा रस्ता दाखवला. अनेकांना काढून शिल्लक राहिलेले जे खरेखुरे दरोडेखोर होते, त्यांना समवेत ठेवून केजरीवाल यांनी पक्ष चालवला.

४. ‘आप’ पक्षातील लोकपाल ॲडमिरल रामदास बरखास्त

यात एक नाव कुठेच चर्चेत नाही, ते म्हणजे ॲडमिरल रामदास (निवृत्त) ! केजरीवाल यांच्या घोटाळ्याची चर्चा पुष्कळ चालू आहे; पण त्यात ॲडमिरल रामदास हे नाव कुठेच झळकतांना दिसत नाही; पण हे नाव अतिशय महत्त्वाचे आहे; कारण केजरीवाल यांच्या देहली लुटण्याच्या आणि जनतेच्या खजिन्यावर दरोडा टाकण्याच्या नियोजनाचा सर्वांत मोठा पुरावा ॲडमिरल रामदास नावाचा आहे. ते आम आदमी पक्षाचा अंतर्गत हिशोब ठेवणारे ‘लोकपाल’ होते. केजरीवाल यांनी पक्ष काढला, तेव्हा सर्व पक्षात आणि आपल्याही पक्षात ‘लोकपाल असला पाहिजे’, अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे पक्षात प्रामाणिकपणे काम चालावे, यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षात लोकपाल बनवला होता. हे पद भारतीय नौदलाचे सरसेनापती राहिलेले ॲडमिरल रामदास यांच्याकडे होते. वर्ष २०१५ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर एकाच मासात केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षातील साहाय्यकांची आपत्काल बैठक बोलावली. त्यात निर्णय झाला, ‘त्यांच्या पक्षातील लोकपाल ॲडमिरल रामदास यांना बरखास्त करण्यात यावे.’ गूगलवर थोडा शोध घेतला, तर आपल्याला रामदास यांचे पत्र मिळेल. ते आश्चर्यचकित झाले होते की, हे काय झाले ? जो पक्ष प्रामाणिकपणे राजकारण करण्यासाठी भारतीय राजकारणात आला आहे, त्याला त्याच्या पक्षाचा लोकपाल नको आहे. याचे कारण रामदास स्वत: प्रामाणिक होतेच; परंतु पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनीही प्रामाणिक असावे, असा त्यांचा आग्रह असायचा.

५. देहली आणि राज्य सरकारचा खजिना लुटण्यासाठी ‘आम आदमी पक्षा’ची  स्थापना

केजरीवाल यांनी लोकपाल हे पद रहित केले आणि त्या पदावरील रामदास यांना पक्षातूनही काढले. कारण स्पष्ट आहे. पुढे जाऊन जल घोटाळा, जल बोर्डाचा घोटाळा, ‘मोहल्ला क्लिनिक’चा (गल्लीत चालू केलेल्या चिकित्सालयाचा) घोटाळा, वर्गखोल्या निर्मितीचा घोटाळा, गटार निर्मिती घोटाळा, रस्ते देखभाल घोटाळा, तसेच मद्य घोटाळा करायचा होता. केजरीवाल यांना सरकाराच्या प्रत्येक क्षेत्रात घोटाळाच करायचा होता. या घोटाळ्यांच्या पैशाने पक्षामध्ये काळा पैसा जमा होणार होता. त्यामुळेच चुकांसाठी कान पकडणार्‍या रामदास यांना आधीच काढले. या काळ्या पक्षाची चर्चा पक्षातही होऊ नये; म्हणून हा निर्णय घेण्यात आला. जर रामदास यांच्यावर कोणताच आरोप नव्हता, तर त्यांना पदावरून आणि पक्षातून का काढले ?; कारण पुढे जाऊन केजरीवाल यांना मिळेल तेवढ्या काळात देहली आणि देहली सरकारचा खजिना लुटायचा होता. केजरीवाल यांचे घोटाळे अचानक झाले नाहीत. लुटीचे संपूर्ण नियोजन करूनच केजरीवाल यांनी ‘आम आदमी पक्ष’ काढला होता. वर्ष २०१५ मध्ये भव्य बहुमत अाल्यानंतर यात अडचण बनू शकणार्‍या एकेकाला काढले. रामदास लोकपालपदी असते, तर केजरीवाल शेकडो कोट्यवधी रुपये हडपण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे केजरीवाल यांनी खजिना लुटण्याचे कसे षड्यंत्र बनवले, याचा ॲडमिरल रामदास हा मोठा पुरावा आहे. केजरीवाल यांनी हे षड्यंत्र बनवूनच दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.’

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, देहली.

(साभार : ‘प्रतिपक्ष’ यू ट्यूब वाहिनी)