‘जकणाचार्य पुरस्कार’ प्राप्त कर्नाटकातील सुप्रसिद्ध शिल्पकार पू. नंदा आचारी यांचा देहत्याग !

पू. नंदा आचारीगुरुजी

कारवार (कर्नाटक), ११ डिसेंबर (वार्ता.) – अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे, तसेच कर्नाटक सरकारचा ‘जकणाचार्य पुरस्कार’ प्राप्त करणारे कारवार येथील प्रसिद्ध शिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) यांनी ११ डिसेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता देहत्याग केला. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी आणि ४ मुलगे आहेत. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी त्यांना सनातन संस्थेच्या गोव्यातील रामनाथी आश्रमात संत म्हणून घोषित करण्यात आले होते. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती त्यांच्या मनात अपार भाव होता. आश्रमातील श्री सिद्धीविनायकाची मूर्ती पू. नंदा आचारी यांनीच घडवली होती.

दशकलांचे अधिकारी असणारे पू. आचारीगुरुजी !

पू. आचारीगुरुजी यांना दशकला ज्ञात होत्या. ‘आतापर्यंत आपण पंचकला येणार्‍या व्यक्ती ऐकल्या आहेत; पण ‘भगवंताने मला दशकला दिल्या आहेत’, असे गुरुजी सांगत असत. त्यांना दगड, माती, सिमेंट, फायबर, लाकूड, सोने, चांदी, पितळ, तांबे आणि ॲल्युमिनिअम इत्यादी वस्तूंपासून मूर्ती बनवण्याची कला अवगत होती. तसेच जुन्या ‘टाईप रायटर’ची दुरुस्ती करणे; पेट्रोल आणि डिझेल इंजिन, चारचाकी, दुचाकी यांची दुरुस्ती करणे; शिलाईयंत्र बनवणे आणि त्याची दुरुस्ती करणे; ॲल्युमिनिअमचा वापर करून विळी बनवणे इत्यादी कला अवगत होत्या. इतकेच नाही, तर मूर्ती सिद्ध करण्यासाठी लागणारी यंत्रे किंवा अवजारे ते स्वतःच बनवत असत.

सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असणारे आणि त्याप्रमाणे मूर्ती घडवणारे पू. आचारीगुरुजी !

‘कोणत्या देवतेची मूर्ती कोणत्या दगडापासून घडवायला पाहिजे ?’, हे गुरुजींना त्या दगडाला स्पर्श करताक्षणी समजत असे. ‘मूर्ती घडवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या मूर्तीला विशिष्ट प्रकारचा दगड लागतो, उदा. कृष्णशिळा, वज्रशिळा, शाळिग्राम, संगमरवर इत्यादी. ‘कोणत्या देवतेची मूर्ती कोणत्या दगडापासून घडवायला हवी ?’, हे गुरुजींना त्या दगडाला स्पर्श करताक्षणी कळत असे. त्या दगडाला स्पर्श केल्यावर त्या दगडातून जाणवणारी स्पंदने जी मूर्ती घडवायची आहे, त्या देवतेच्या स्पदनांशी जुळली पाहिजेत. त्या स्पंदनांद्वारे त्यांना ‘त्या मूर्तीसाठी तो दगड चालेल का ?’, याची आतून जाणीव होत असे.’

– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि  श्री. राजू  सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.