वृक्षांची महानता !

अक्रोड वृक्ष

ब्रिटनच्या महाराणी द्वितीय यांच्या राज्यकारभारास ७० वर्षे पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये मोठा उत्सव साजरा केला गेला. तेव्हा भव्यदिव्य असे संचलन झाले. या पथसंचलनात २६० वर्षांपूर्वी सिद्ध केलेली घोडागाडीही सहभागी झाली होती. या घोडागाडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे वजन ४ टन असून तिची चाके अक्रोडच्या वृक्षापासून बनवलेली आहेत. त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला असून हे सुशासनाचे प्रतीक मानले जाते. तिचे दरवाजे आणि खिडक्या ताडाच्या लाकडापासून सिद्ध केलेल्या आहेत. त्यामुळे अक्रोड आणि ताड या वृक्षांचे महत्त्व लक्षात येते.

अक्रोड हा मोठा, पानझडी, सुगंधी वृक्ष मूळचा इराणमधील असून उत्तर भारत, दक्षिण युरोप, सीरिया आणि अमेरिका या ठिकाणी आढळतो. भारतात तो हिमालय, आसाम, काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तरप्रदेश येथे आढळतो. मुखशुद्धी आणि सुकामेवा म्हणून अक्रोडचे बी महत्त्वाचे आहे. ते मेवा, मिठाई, आईस्क्रिम यांमध्ये घालतात. कच्च्या फळांपासून लोणची, मुरंबे, चटणी आणि सरबत बनवतात. पाने स्तंभक (आकुंचन करणारी), पौष्टिक, कृमीनाशक असून झाडाची साल आणि पाने ही पुरळ, गंडमाळा, उपदंश, इसब या आजारांवर उपयुक्त असतात. फळ संधीवातावर, तर बियांचे तेल पट्टकृमीवर उपयुक्त आहे. लाकूड सजावटी सामान, तसेच अन्य सुबक वस्तूंसाठी उत्तम आहे.

एकेकाळी भारतात १० कोटींहून अधिक ताडाची झाडे होती. त्यांपैकी ५ कोटी केवळ तमिळनाडूत होती. ताड हा माडासारखाच उपयुक्त वृक्ष आहे. ताडाच्या झाडापासून अतिउत्कृष्ट दर्जाचा गूळ बनवता येतो. साखर नव्हती, तेव्हा गूळच वापरला जायचा. ब्रिटिशांनी मॉरिशसला साखर कारखाने चालू केले. त्यानंतर मोरस साखर भारतात आली आणि ताडगुळाचे महत्त्व संपले. कागदाचा शोध लागण्यापूर्वी सगळे लिखाण ताडाच्या पानांवर केले जायचे. कागद निर्माण झाला आणि पानांचा उपयोग संपला. पूर्वी घरावरचे छप्पर, खांब म्हणून ताडाचा वापर व्हायचा, त्याची जागा आता पत्रे आणि लोखंडी खांबांनी घेतली. २६० वर्षांपूर्वी सिद्ध केलेली घोडागाडी आजही रस्त्यावर उतरते, यावरून ती सिद्ध करण्यासाठी वापरलेल्या वृक्षांची महानता लक्षात येते. त्यामुळे अशा चिरकाल टिकाऊ वस्तू सिद्ध होणाऱ्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. पुढील आपत्काळात तेच आपल्याला उपयोगी ठरतील.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव