ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (८.६.२०२२) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७० वा वाढदिवस आहे. सद्गुरु नंदकुमार जाधव हे प्रसारातील साधकांसाठी ‘नामजपादी उपाय सत्संग’ घेतात. एप्रिल २०२२ मध्ये मी ४ – ५ दिवस आजारी असतांना मला (सद्गुरु नंदकुमार जाधव यांची मुलगी) त्या सत्संगाला बसायला मिळाले. तेव्हा त्या सत्संगाबद्दल जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्या समवेत वर्ष २०२१ मध्ये जळगाव सेवाकेंद्रात रहात असतांना मला आलेल्या अनुभूती त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे दिल्या आहेत.
सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या चरणी त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सद्गुरु नंदकुमार जाधव घेत असलेला ‘नामजपादी उपाय सत्संग’ म्हणजे साधकांसाठी आध्यात्मिक संजीवनी !
१ अ. ‘नामजपादी उपाय सत्संगात सद्गुरु नंदकुमार जाधव ‘ॐ नमो जी आद्या….’ हा श्लोक म्हणतांना त्यांच्या आवाजात मुळातच गोडवा असल्याने तो ऐकत रहावा’, असे मला वाटणे : ‘सद्गुरु नंदकुमार जाधव (बाबा) घेत असलेला ‘नामजपादी उपाय सत्संग’ म्हणजे ‘साधकांसाठी आध्यात्मिक संजीवनी आहे’, असे मला वाटते. त्यात सद्गुरु बाबा ‘ॐ नमो जी आद्या….’ हा श्लोक वरच्या पट्टीत म्हणायचे. त्यांच्या आवाजात मुळातच गोडवा असल्याने ‘तो ऐकत रहावा’, असे मला वाटले. त्यांनी तो श्लोक वरच्या पट्टीत म्हटल्याने ‘श्लोकाचा ध्वनी आकाशाला भिडून त्यातील चैतन्य माझ्या सहस्रारचक्रातून माझ्या पूर्ण देहात जात आहे’, असे मला जाणवायचे. यापूर्वी मला कधी सहस्रारचक्रावर संवेदना जाणवल्या नाहीत; पण ‘त्यांच्या आवाजातील चैतन्यामुळे संवेदना जाणवू लागल्या’, असे मला वाटते.
१ आ. सद्गुरु नंदकुमार जाधव सत्संगात करत असलेल्या आर्त प्रार्थनेमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे आणि शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास न्यून होऊन उत्साह वाटणे : सद्गुरु बाबा ‘नामजपादी उपाय सत्संगा’च्या शेवटी समष्टीसाठी प्रार्थना सांगतात. तेव्हा त्या प्रार्थनेत एवढी आर्तता असते की, मी रामनाथी आश्रमात सेवा करतांना मला जसे परात्पर गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवायचे, तसे अस्तित्व बाबा प्रार्थना म्हणत असतांना जाणवते. पूर्ण सत्संगात ‘सद्गुरु बाबांच्या वाणीतील चैतन्यामुळे, तसेच त्यांच्यात असलेल्या अतुल्य भक्तीमुळे प्रचंड प्रमाणात चैतन्य मिळते’, असे मला जाणवले. मी २ – ३ तीन दिवस सत्संगाला बसल्याने माझे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून होऊन मला उत्साह वाटू लागला.
२. यजमान रुग्णाईत असतांना सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मुलीला धीर देऊन जावयासाठी प्रार्थना करणे अन् त्यांच्या आजाराचे तत्परतेने निदान होऊन योग्य उपचार मिळणे
जुलै २०२१ मध्ये माझे यजमान श्री. आदित्य शास्त्री यांना अचानक हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात भरती करावे लागले. तेव्हा समाजात कोरोना महामारी असल्याने रुग्णालयात अन्य कोणा व्यक्तीला प्रवेश नसायचा. त्यामुळे यजमानांच्या समवेत मी एकटीच होते. त्या वेळी सद्गुरु बाबा ‘गुरुपौर्णिमा आणि ऑनलाईन सत्संग’ या सेवेत व्यस्त असूनही मला सातत्याने भ्रमणभाष करून धीर द्यायचे आणि ते यजमानांसाठी प्रार्थनाही करत होते. त्यामुळे श्री. आदित्य यांचे तत्परतेने निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळाले.
३. नोव्हेंबर २०२१ मध्ये जळगाव सेवाकेंद्रात रहात असतांना सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती
अ. सद्गुरु बाबांच्या समवेत व्यवहारातील कोणतेही काम करण्यास गेल्यावर कधीच कोणते अडथळे येत नसत. सर्व कामे अगदी सहजतेने होत असत.
आ. त्यांच्या सहवासात साधनेचे प्रयत्नही सहजतेने झाले.
इ. त्यांचे कपडे धुतांना त्यांना मंद सुगंध यायचा.
ई. त्यांच्या सत्संगात मला चैतन्य मिळते.
उ. सद्गुरु बाबांच्या काही वस्तू घेण्यासाठी त्यांचे कपाट उघडल्यावर ‘त्यातून शक्तीचा स्रोत माझ्यावर येत आहे’, असे मला जाणवायचे.
ऊ. ‘पूर्वी त्यांच्याशी बोलल्यावर चैतन्य मिळते’, असे मला जाणवायचे. ‘आता त्यांची आठवण काढली, तरी मला चैतन्य मिळते’, असे मला जाणवते.
ए. ‘त्यांच्यातील चैतन्य किंवा सूक्ष्मातील शक्ती पुष्कळ वाढत आहे’, असे मला वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे जे मला शिकायला मिळाले, ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही सेवाही त्यांच्या चरणी अर्पण करते.
– सौ. गायत्री आदित्य शास्त्री (सद्गुरु नंदकुमार जाधव यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.५.२०२२)
|