|
ठाणे, १४ मे (वार्ता.) – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबूकद्वारे आक्षेपार्ह कविता प्रसारित केल्याच्या प्रकरणी तिच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेटके यांच्यासह कार्यकर्त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्याआधारे तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केतकी चितळे हिला कळंबोली पोलिसांनी कह्यात घेतले आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली. कळंबोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांनी तिचा ताबा घेतला. त्या वेळी पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाई फेकली आणि अंड्यांचाही मारा केला.
शरद पवार यांच्याविषयी अन्य एक आक्षेपार्ह ट्वीट करणारा तरुण पोलिसांच्या कह्यात !
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अन्य एक आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या नाशिक येथील निखिल भामरे या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांकडून चौकशी चालू आहे. भामरे यांनी ‘वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे सिद्ध करण्याची’ असे लिखाण ट्वीट केले होते. या प्रकरणी ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानुसार भामरे याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.