परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त वर्ष २०२० मध्ये झालेल्या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्याच्या वेळी नोएडा (उत्तरप्रदेश) येथील साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. आलेली त्रासदायक अनुभूती

१ अ. श्रीमती तारा यादव

‘भावसोहळ्याच्या वेळी अधूनमधून माझे डोके दुखत होते आणि पायांत तीव्र वेदना होत होत्या.’

२. आलेल्या चांगल्या अनुभूती

२ अ. श्री. हरिकृष्ण शर्मा

२ अ १. पू. सौरभ जोशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘श्री’ म्हणत असल्याचे आठवून रांगोळीत ‘श्री’ लिहिणे आणि कार्यक्रमात पू. सौरभदादांविषयीचे चलत्चित्र पहातांना भावजागृती होणे : ‘१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मी रांगोळी काढली. संपूर्ण रांगोळी काढून झाल्यानंतरही माझी भावजागृती होत नव्हती. तेव्हा थोडा वेळ रांगोळीकडे पाहून प्रार्थना केल्यावर सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांचा तोंडवळा माझ्या डोळ्यांसमोर आला. पू. सौरभ जोशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘श्री’, असे संबोधतात. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव असल्याने रांगोळीत ‘श्री’ लिहावे’, असा माझ्या मनात विचार आला. मी रांगोळीच्या मध्यभागी ‘श्री’ लिहिल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. भावसोहळ्यात पू. सौरभ जोशी यांच्याविषयी चलत्चित्र दाखवले जात असतांना माझा भाव जागृत झाला. त्या वेळी मला परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.

२ अ २. झाडांना मानस प्रार्थना केल्यावर भावसोहळ्याच्या दिवशी कृष्णकमळाच्या झाडावर २ सुंदर फुले उमलणे : माझ्या घराच्या सज्जात काही झाडे लावली आहेत. त्यांना फुले येत नव्हती. भावसोहळ्याच्या आदल्या दिवशी ‘उद्या फूल येईल’, अशी कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. १२.५.२०२० च्या रात्री झोपतांना मी त्या झाडांना मानस प्रार्थना केली. १३.५.२०२० या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत कृष्णकमळाच्या झाडावर २ अतिशय सुंदर फुले उमललेली दिसली. तेव्हा माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टर आणि ते झाड यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’

२ आ. कु. अक्षिता वार्ष्णेय

२ आ १. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर भावसोहळ्याच्या दिवशीचा ‘ऑनलाईन’ वर्ग रहित होणे आणि भावसोहळा अडचणीविना पहाता आल्याने कृतज्ञता व्यक्त होणे : ‘१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवानिमित्त भावसोहळा होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘माझा ‘ऑनलाईन’ वर्ग असल्यामुळे मी भावसोहळा पाहू शकणार नाही.’ मला पुष्कळ ताण आला होता. तेव्हा माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना झाली, ‘आपणच ही अडचण दूर करावी, म्हणजे मी हा भावसोहळा पाहू शकीन.’ नंतर मला समजले, ‘त्या दिवशी माझा वर्ग नव्हता.’ तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली. मी मनोमन परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली, ‘आपल्याच कृपेमुळे अडचण दूर होऊ शकली आणि मी भावसोहळा निर्धास्तपणे पाहू शकले.’

२ इ. सौ. कामिनी दुबे

१.  ‘१३.५.२०२० या दिवशी सकाळी उठल्यावर मला पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘कोणता तरी उत्सव आहे’, असे मला वाटत होते.

२. माझा नामजप अखंड होत होता.

३. मी सकाळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला फुले आणि नैवेद्य अर्पण करत असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रूंच्या धारा वहात होत्या.

४. ‘ऑनलाईन’ भावसोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पहात असतांना मला वाटत होते, ‘माझा भगवंत मला नवी दिशा देत आहे.’

२ ई. श्रीमती गरिमा सिन्हा, नोएडा

१. ‘१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवानिमित्त होत असलेल्या भावसोहळ्याच्या दिवशी मला पुष्कळ उत्साह वाटत होता.

२. ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांना कोणत्या रूपात दर्शन देतील ?’, हे जाणून घेण्यासाठी माझे मन व्याकुळ झाले होते. मी अंगणात कृष्णतत्त्वाची रांगोळी काढली होती. ‘साक्षात् परात्पर गुरु डॉक्टर घरी येत आहेत’, असा मी भाव ठेवला होता.

३. ‘भावसोहळा चालू असतांना कुठलीही तांत्रिक अडचण येऊ नये’, यासाठी आम्ही १५ मिनिटे प्रार्थना केली. प्रत्यक्षातही भावसोहळ्याच्या वेळी तांत्रिक अडचणी अत्यल्प आल्या.

४. भावसोहळ्यात ‘ज्योत से ज्योत जगाओ…’ ही आरती म्हणत असतांना माझ्या संपूर्ण शरिरावर रोमांच उभे राहिले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची आरती करण्यासाठी सर्व देवता उपस्थित आहेत’, असे मला जाणवत होते. हे अनुभवतांना माझे मन पुष्कळ आनंदी झाले.

५. भावसोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टर साधकांशी संवाद साधत असतांनाची ध्वनी-चित्रचकती पहात असतांना मला वाटत होते, ‘ते स्वतः श्रीकृष्ण आहेत आणि आम्हा सर्व साधकरूपी अर्जुनांना ज्ञान देत आहेत.’

६. त्या वेळी ‘आम्ही रामनाथी आश्रमात बसून भावसोहळा पहात आहोत’, असे मला वाटत होते.’

२ उ. श्रीमती मोहिनी कुलकर्णी

‘मागील ८ दिवसांपासून घरातील स्थिती ठीक नव्हती; परंतु भावसोहळ्याच्या वेळी माझे मन आनंदात होते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यावर मानस उपाय केले’, असे मला जाणवले.’ (वर्ष २०२०)