प.पू. दास महाराज यांनी ‘विदेही स्थिती’विषयी केलेले विवेचन !

४ मार्च २०२२ या दिवशी ‘प.पू. दास महाराज यांची स्वामी चिन्मयानंद यांच्याशी भेट होणे आणि त्यांनी प्राणायम शिकवणे’ हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/558050.html

प.पू. दास महाराज

२ ई. १ मास सराव केल्यावर स्वामींनी आज्ञा, अनाहत आणि विशुद्ध या चक्रांवर हात ठेवल्यावर प्रकाश दिसू लागणे, त्यानंतर श्रीविष्णूच्या आकाराची सावली दिसू लागणे अन् स्वामींनी बद्रीनाथला गेल्यावरही सराव करण्यास सांगणे : ‘स्वामी चिन्मयानंद यांनी मला प्राणायाम करण्याची पद्धत सांगितल्यानंतर मी एक मास सराव कला. तेव्हा मला विविध दर्शने झाली. स्वामी माझ्या आज्ञाचक्रावर हात ठेवायचे आणि अन्य चक्रांवर हात ठेवून मंत्र म्हणायचे. तेव्हा ते ‘आता कसला प्रकाश दिसतो ?’, असे मला विचारायचे. तेव्हा मी त्यांना सांगायचो, ‘‘गुलाबी रंगाचा प्रकाश दिसतो. अनाहतचक्रावर भगवा आणि विशुद्धचक्रावर निळा या रंगांचे प्रकाश दिसतात.’’ मला आज्ञाचक्रावर विष्णूचा पिवळा प्रकाश दिसायचा. तो तेथेच स्थिर व्हायचा. याचा सराव करायलाही मला १५ ते २० दिवस लागले. १ मास पूर्ण झाल्यावर मला श्रीविष्णूच्या आकाराची सावली दिसू लागली. ‘असा सराव बद्रीनाथला गेल्यावरही करा’, असे स्वामींनी सांगितले.

२ उ. बद्रीनाथच्या देवळात बसून सराव केल्यावर श्रीविष्णूच्या आकाराची सावली स्पष्ट दिसू लागणे : मी बद्रीनाथच्या देवळात बसून सराव केल्यावर मला २ मासांनी ती सावली स्पष्ट दिसू लागली. त्या वेळी मला प्रथमच स्पष्ट आकृती दिसली. नंतर सावलीच दिसायची. मी बद्रीनाथच्या देवळात ८ घंटे ध्यानाला बसलो होतो. तेव्हा मला दुसर्‍यांनी येऊन उठवले होते. त्यानंतर मी कधी एवढा वेळ बसलो नाही.

२ ऊ. समाधी, निर्विकल्प समाधी आणि अमृतवृष्टी यांविषयी स्वामी चिन्मयानंद यांनी सांगितलेली सूत्रे

२ ऊ १. समाधी

अ. ध्यान उतरवतांना ते कमी मात्रांनी उतरवायचे. कुणी उन्नत नसतील, तर समाधी सहस्रारचक्रापर्यंत चढवायची नाही, नाही तर निर्विकल्प समाधी लागते. समाधी विशुद्धचक्रापर्यंतच चढवायची. उन्नतच आपल्याला कानात ‘ॐ’काराचा नाद करून सहस्रारचक्रापर्यंत गेलेल्या समाधीतून आपल्याला बाहेर काढतात.

आ. समाधी अवस्थेत ८ ते १० दिवस राहिल्यावर ब्रह्मकुंडली नाडी जागृत होते आणि त्यातून (जीवात्म्यावर, आत्म्यावर) एक थेंब अमृतवृष्टी होते आणि मग तो जीव समाधी अवस्थेत जातो. तो त्या स्थितीत १ मास राहिल्यावर सहस्रारचक्रातून स्फोट होतो; म्हणून मी तुम्हाला विशुद्धचक्रापर्यंत ध्यान लावण्याचे मार्गदर्शन केले आहे. (सहस्रारचक्रातून स्फोट होतो, म्हणजे निर्विकल्प समाधी लागते. भगवान श्रीधरस्वीमींनी निर्विकल्प समाधी लावूनच देह सोडला. स्फोट म्हणजे सहस्रारचक्राच्या जागी भोक पडते आणि त्यातून एक ज्योत वेगाने वर जाते. आकाशातील चांदण्यांप्रमाणे चमकणारी ज्योत आकाशाच्या दिशेने जाते आणि तो जीवात्मा मूळ तत्त्वाशी जाऊन मिळतो, म्हणजे जीव-शिवाचे मीलन होते.)

इ. यापुढे उन्नत (माहीतगार) जवळ असेल, तरच निर्विकल्प समाधी लावा. समाधी लावल्यावर उन्नत (माहीतगार) आपल्या कानात आपले नाव घेऊन हाक मारतात. त्या वेळी जाग आली नाही, तर मग ‘ॐ’काराचा नाद करतात.

ई. आपण आपली शारीरिक स्थिती आणि बळ पाहून मगच सहस्रारचक्रापर्यंत समाधी चढवायची. हे गुरुकृपेविना शक्य नाही. तुम्ही हे लवकर ग्रहण केले; कारण तुम्हाला भगवान श्रीधरस्वामींचा आशीर्वाद होता.

२ ऊ २. निर्विकल्प समाधी

२ ऊ २ अ. समाधी सहस्रारचक्रापर्यंत चढवायची नाही; कारण स्फोट होतो.

२ ऊ २ आ. निर्विकल्प समाधी अवस्थेत जीवात्मा केवळ वरच्या लोकात निघून जात असणे आणि त्याच्या शरीरक्रिया चालूच असणे : त्या वेळी शरीर समाधी अवस्थेत बसलेले असते, त्याच स्थितीत रहाते. खाली पडत नाही. मग हात-पाय सोडवावे लागतात; पण इतरांप्रमाणे ते घट्ट होत नाहीत. काही जणांचे ते सुटत नाहीत, सोडवावे लागतात. समाधी अवस्थेतील मनुष्याचे हात-पाय लगेच सुटतात. त्यांच्या चैतन्यामुळे रक्त गोठत नाही. सामान्य मनुष्याचे अवयव लगेच घट्ट होतात. त्यामुळे काही वेळा प्राण जाण्याआधीच हात-पाय मोकळे करून लांब करून ठेवतात. नाहीतर ज्या अवस्थेत मनुष्य प्राण सोडतो, त्याच स्थितीत हात-पाय अवघडून रहातात, घट्ट होतात. तसे समाधी अवस्थेत होत नाही. ईश्वर संकेत देतो. त्यामुळे शरिरातील रक्त गोठत नाही. शिरा, नाड्या चालू असतात. समाधी अवस्थेत हे सर्व चालूच असते आणि सामान्य मनुष्य मेल्यावर जीवच सोडलेला असतो. त्यामुळे सर्व शरीरक्रिया बंद पडतात. समाधी अवस्थेत मात्र जीवात्मा केवळ वरच्या लोकात निघून जातो. शरीरक्रिया चालूच असतात.

२ ऊ ३. अमृतवृष्टी

अ. सहस्रारचक्रापर्यंत समाधी गेल्यावर अमृताचे थेंब पडत असतात. त्यामुळे शरीर वर्षानुवर्षे जसेच्या तसेच ताजेतवाने रहाते आणि जीवात्माही कार्यरत असतो; म्हणून ऋषिमुनी वर्षानुवर्षे समाधी अवस्थेत राहिलेले असतात. त्यांची ब्रह्मकुुंडली जागृत झालेली असते.

आ. सहस्रारचक्रात अमृत असते. सहस्रारचक्रातून विशुद्धचक्रावर अमृतवृष्टी होत असते आणि मग ते तिथून आपल्या नसानसांत जाते अन् शरिराला चैतन्य मिळते अन् मग शरीर ताजेतवाने होते. त्यावर ५ किंवा १० मासांनी एक थेंब अमृतवृष्टी होते आणि त्यावर ते कित्येक वर्ष जगतात.

इ. सापाच्या अंगावर कात येते आणि अंगावरील ती कात काही दिवसांनी निघून गेली की, साप परत ताजातवाना होतो. त्याचप्रमाणे समाधी अवस्थेत असलेल्या ऋषिमुनींवर अमृतवृष्टी झाली की, त्यांच्या अंगावर आलेली कात निघून जाऊन ते परत ताजेतवाने होतात आणि १०० ते ५०० वर्षे जगतात.

ई. ऋषिमुनींच्या अंगावर झाडे-झुडपेही वाढतात. काहींवर वारुळेही वाढतात. वाल्या कोळ्याने समाधी लावली. तेव्हा त्याच्यावरही असेच वारुळ वाढले होते. ते सहस्रो वर्षर्े बसले होते. नारदमुनी वाल्या कोळ्याला सत्ययुगात (कृतयुगात) भेटले होते. तेव्हा नारदमुनींनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला (वाल्या कोळ्याला) त्रेतायुगात रामायण लिहायचे आहे. त्याची तुम्हाला सिद्धता करायची आहे. वाटमारीचा धंदा सोडून शतकोटी रामायण लिहायचे आहे. त्यानुसार प्रभु श्रीराम वागतील आणि तुमच्याच आश्रमात रामाचा पुढचा वंश वाढेल.’’ त्या वेळी त्रेतायुगापर्यंत प्रभु श्रीरामचंद्र भेटेपर्यंत सहस्रो वर्षे वाल्मीकिऋषि समाधी स्थितीत बसले होते.

वर्ष १९६८ मध्ये हा वृत्तांत स्वामींना सांगितला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुझी इच्छा पूर्ण झाली का रे ? तुझी साधना झाली ना ?’’ मी ‘‘हो’’, असे म्हणालो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आता तूच रामाची स्थापना कर.’’

२ ए. लहानपणी वडिलांच्या समवेत ध्यानाचा सराव झाल्याने स्वामी चिन्मयानंदांकडे गेल्यावर त्यांची शिकवण लवकर अवगत करता येणे : लहानपणी मी शाळेत जाऊन आल्यावर वडील मला त्यांच्या समवेत ध्यानाला बसवायचे. त्यामुळे मला त्याचा सराव झाला होता. त्यामुळे स्वामी चिन्मयानंदांकडे गेल्यावर मला त्यांची शिकवण लवकर अवगत करता आली आणि मला चिन्मयानंदस्वामींकडून पुढचे शिक्षण मिळाले. त्या वेळी मी १२ – १३ वर्षांचा होतो.’

(क्रमशः)

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२०)