शीवगडाच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभाग आराखडा सिद्ध करत आहे ! – खासदार राहुल शेवाळे, शिवसेना

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्याकडून शीवगडाची पहाणी !

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे

मुंबई – पुरातत्व विभागाकडून शीवगडाचे संवर्धन आणि जतन यांसाठी आराखडा सिद्ध केला जात आहे. यामध्ये गडाच्या तटबंदीची डागडुजी, ऐतिहासिक माहिती देणारे फलक, ऐतिहासिक वास्तूंचे अद्ययावत संवर्धन आदी कामे केली जाणार आहेत. गडाच्या सौंदर्यीकरणाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. १८ जानेवारी २०२२ या दिवशी राहुल शेवाळे आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी शीवगडावर जाऊन गडाच्या स्थितीची पहाणी केली.

१. या वेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक राजेंद्र यादव, स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गजानन बेल्लाळे, शीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज हिर्लेकर आदी उपस्थित होते.

२. याविषयी माहिती देतांना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, शीवगडाच्या संवर्धनाविषयी पालिका आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक येत्या आठवड्यात आयोजित केली आहे. या बैठकीत स्थानिक पोलीस आणि गडावर पहाटे चालण्यासाठी येणार्‍या वरिष्ठ नागरिकांच्या समितीचे प्रतिनिधी यांच्या सूचनांचाही आढावा घेतला जाईल. दोन्ही प्राधिकरणाच्या समन्वयातून शीवगडाला लवकरात लवकर त्याचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करीन.

३. गडाच्या खालच्या बाजूस असलेले उद्यान पुरातत्व विभागाकडून मुंबई महापालिकेला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. या उद्यानाची देखभाल पालिकेकडून केली जाते. हा भाडेकरार पुढच्या वर्षी संपुष्टात येणार असून तो वाढवण्यासाठी पालिकेने पुरातत्व विभागाकडे विनंती केली आहे. उद्यानाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण यांसाठी पालिकेकडून सिद्ध करण्यात येणारा आराखडा लवकरच पूर्ण होईल. पुरातत्व विभागाच्या अनुमतीने या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ केला जाईल.