समष्टीसाठी नामजप करणारे श्री. श्याम देशमुख आणि सूक्ष्मातील अचूक समजण्याची क्षमता असलेल्या सौ. क्षिप्रा देशमुख !

समष्टीसाठी नामजप करणारे श्री. श्याम देशमुख (वय ७१ वर्षे) आणि सूक्ष्मातील अचूक समजण्याची क्षमता असलेल्या सौ. क्षिप्रा देशमुख (वय ६८ वर्षे) !

‘वर्ष २०२० ते २०२१ या कालावधीत आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असलेले आमचे वडील श्री. श्याम देशमुख आणि आध्यात्मिक पातळी ६२ टक्के असलेली आमची आई सौ. क्षिप्रा देशमुख यांच्यात झालेले पालट येथे दिले आहेत.

श्री. शाम देशमुख आणि सौ. क्षिप्रा देशमुख

१. श्री. श्याम देशमुख (वडील)

१ अ. तीव्र तळमळीमुळे स्वतःत समष्टीसाठी नामजप करण्याची क्षमता निर्माण करणे : ‘२०.११.२०२० या दिवशी एका अनौपचारिक चर्चेत सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी बाबांना (श्री. श्याम देशमुख यांना) स्वतःमध्ये समष्टीसाठी नामजप करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी सांगितले. वर्ष २०११ – २०१२ मध्ये बाबा समष्टीसाठी नामजप करत होते; परंतु तेव्हा त्यांच्यावर अनिष्ट शक्तींचे तीव्र आक्रमण झाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बाबांना सांगितले, ‘‘तुम्ही सध्या समष्टीसाठी नामजप करू नका.’’ सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी बाबांना स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी सांगितल्यावर बाबांनी आज्ञापालन म्हणून नामजपादी उपाय आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवले. सप्टेंबर २०२१ मध्ये सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी बाबांना सांगितले, ‘‘आता तुम्ही समष्टीसाठी नामजप करू शकता.’’ यावरून ‘आपत्काळ आणि वृद्धावस्था असूनही तीव्र तळमळीमुळे ईश्वराने त्यांच्यामध्ये समष्टीसाठी नामजप करण्याची क्षमता निर्माण केली आहे’, असे आमच्या लक्षात आले.

१ आ. कुंडलिनी चक्रावर न्यास करतांना शारीरिक त्रास होत असूनही समष्टीसाठी तो सहन करणे : बाबांना ठाऊक आहे की, ‘साधक किंवा धर्मसंस्थापनेचे कार्य यांच्यासाठी नामजप केल्यावर अनिष्ट शक्ती आक्रमण करतात.’ त्यामुळे बाबा प्रथम स्वतःचा व्यष्टी नामजप पूर्ण करतात आणि त्यानंतरच ते समष्टीसाठी नामजप करतात. बाबांचे वय झाल्यामुळे नामजप करतांना कुंडलिनी चक्रांवर न्यास करणे त्यांच्यासाठी वेदनादायी होते. त्यामुळे ते व्यष्टी नामजप करतांना अनेक वेळा कुंडलिनी चक्रांवर न्यास करत नाहीत; मात्र साधकांसाठी नामजप करतांना साधकांचे त्रास लवकर न्यून व्हावेत, यासाठी ते स्वतः वेदना सहन करत न्यास करूनच नामजप करतात. अनेक वेळा साधकांसाठी सांगितलेला नामजप करतांना कानावर किंवा सहस्रारचक्रावर न्यास करण्याची सूचना येते. बाबांना तसा न्यास करायला थोडे वेदनादायी होते, तरीही साधकांविषयी असलेल्या प्रीतीमुळे ते सांगितल्यानुसार न्यास करून नामजप करतात.

१ इ. ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगांचा नातेवाईक आणि परिचित यांना लाभ व्हावा’, अशी तळमळ वाढणे : आमच्या नातेवाईकांना साधनेची आवड नाही. त्यांच्याशी साधनेविषयी बोलल्यास ते त्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे बाबा त्यांच्याशी भ्रमणभाषवर साधनेविषयी बोलत नव्हते. मागील वर्षी दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध ‘ऑनलाईन’ सत्संग आरंभ करण्यात आले. हे सत्संग ऐकून बाबांमध्ये ‘नातेवाईक आणि परिचित यांना त्याचा लाभ झाला पाहिजे’, अशी तळमळ निर्माण झाली. आता नातेवाईक किंवा परिचित यांचा बाबांना भ्रमणभाष आल्यावर ते त्यांना सत्संगाविषयी सांगतात. त्यांना पुनःपुन्हा सत्संगाविषयी सांगितल्यामुळे या वर्षी आमच्या चुलत बहिणीने गणेशोत्सवाच्या काळात सनातन संस्थेने बनवलेले ‘श्री गणेश पूजाविधी’ हे ‘ॲप’ ‘डाऊनलोड’ करून त्यानुसार श्री गणेशपूजन केले.

२. सौ. क्षिप्रा देशमुख (आई)

२ अ. सूक्ष्मातून जाणण्याच्या क्षमतेत वृद्धी होणे

२ अ १. आईने प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार शोधलेला नामजप आणि संतांनी सांगितलेला नामजप एकसारखा असणे : आमची आई प्रतिदिन प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधते. तिचा आध्यात्मिक त्रास वाढल्यावर ती संतांना नामजपादी उपाय विचारते. तेव्हा अनेक वेळा ‘आईने प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार शोधलेला नामजप आणि संतांनी सांगितलेला नामजप एकसारखाच असतो’, असे लक्षात आले. यावरून ‘तिची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अचूक आहे’, हे लक्षात येते.

२ अ २. आईवर काळ्या शक्तीचे आवरण पुनःपुन्हा येत असल्याचे लक्षात आल्यावर आईने स्वतःवरील आवरण काढतांना प्रार्थना करणे : एकदा तिला पुष्कळ त्रास होत होता. तिच्या कटीपासून पायापर्यंतचा भाग बधीर (सुन्न) झाला होता. त्यासाठी डॉ. अजय जोशी आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘त्यांच्यावर वारंवार काळ्या शक्तीचे पुष्कळ आवरण येत आहे.’’ तेव्हा मी तिला विचारले, ‘‘तू अशी किती वेळा आवरण काढणार ? याउलट तुझ्याभोवती नामजपाच्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण कर.’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘मी काळ्या शक्तीचे आवरण काढण्यासाठी देहावरून हात फिरवल्यावर एक थर निघून जातो; परंतु त्वरित दुसरा थर आकृष्ट होतो. त्यामुळे मी आता देहावर हात फिरवतांना ‘काळ्या शक्तीचे आवरण नष्ट होऊ दे आणि त्या ठिकाणी संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना करते.’’ तिने असे करायला आरंभ केल्यानंतर काही वेळाने तिचा त्रास ७० ते ८० टक्के न्यून झाला. यावरून ‘तिची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता पुष्कळ वाढली आहे’, असे लक्षात आले.

२ आ. तीव्र शारीरिक त्रास होत असूनही तोंडवळा आनंदी असणे : आईला संधीवातासह अनेक शारीरिक त्रास आहेत. असे असूनही तिचा तोंडवळा सतत आनंदी दिसतो. त्यामुळे ‘तिला भेटायला येणार्‍या अनेक साधकांना तिची प्रकृती चांगली आहे’, असे वाटते.

२ इ. आईला तीव्र शारीरिक त्रास होत असूनही तिने रात्री जागून सेवा करणे आणि तिला होत असलेल्या शारीरिक त्रासामुळे ‘सेवा करू नका’, असे सांगितल्यावर ‘नामजप हीच सेवा आहे’, या भावाने नामजपात वाढ करणे : आईला तीव्र शारीरिक त्रास होत असूनही ती पाक्षिक ‘सनातन प्रभात’साठी भाषांतर केलेले लेख, प्रसिद्धीपत्रक (प्रेसनोट) पडताळणे’, इत्यादी सेवा करते. अनेक वेळा एकाच दिवशी अनेक सेवा तातडीने पूर्ण करण्यासाठी आल्यावर ती आमच्यासह रात्री उशिरापर्यंत जागून धारिका पडताळत होती. तेव्हा आढावासेवकांनी तिला सांगितले, ‘‘नामजप करणे, हीच तुमची साधना आहे.’’ आईने त्यांचे बोलणे स्वीकारून नामजपात वाढ केली.

श्री. निषाद देशमुख आणि कु. निधी देशमुख

३. आई आणि बाबा यांच्या संदर्भातील समान सूत्रे

३ अ. आसक्ती न्यून होणे : पूर्वी आई-बाबांना त्यांच्याकडे असलेले धन, वस्तू किंवा संपत्ती यांची काळजी वाटायची. ते मधे मधे त्या संदर्भात बोलतही होते. आता त्यांची भक्ती वाढल्यामुळे ते त्या विषयावर बोलत नाहीत.

३ आ. चैतन्यात वाढ होणे : पूर्वीच्या तुलनेत ‘आई-बाबा यांच्यातील चैतन्य वाढले आहे’, असे आम्हाला जाणवते. त्यामुळे त्यांचा तोंडवळा पूर्वीच्या तुलनेत अधिक गोरा दिसतो आणि त्यांची त्वचासुद्धा मऊ झाली आहे.’

– कु. निधि देशमुख आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (श्री. श्याम आणि सौ. क्षिप्रा देशमुख यांची मुलगी अन् मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक