उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. समर्थ गणेश सांडभोर हा या पिढीतील एक आहे !
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (२६.१२.२०२१) या दिवशी कु. समर्थ गणेश सांडभोर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना आणि एका साधकाला जाणवलेली त्याची (कु. समर्थची) गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. समर्थ गणेश सांडभोर याला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. प्रगती गणेश सांडभोर (आई)
१ अ. जन्मापूर्वी
१ अ १. गर्भारपणात नामजप आणि पोथीवाचन करणे अन् त्या वेळी ‘मन शांत आणि हलके होत आहे’, असे जाणवणे : ‘बाळावर चांगले संस्कार व्हावेत; म्हणून मी गर्भारपणात ‘श्री स्वामी समर्थ ।’ हा नामजप ११ माळा, स्वामीचरित्राच्या ३ अध्यायांचे वाचन, तसेच कुलदेवी श्री तुळजाभवानी आणि कुलदेव श्री खंडोबा यांचे नामस्मरण करत असे. या काळात ‘२ वेळा रुद्राभिषेक, २१ दिवस दुर्गासप्तशतीचे पठण, ७ दिवस गुरुचरित्राचे पारायण’, देवाने करवून घेतले. मी प्रत्येक गुरुवारी आरतीला जायचे आणि तेथे मंत्रजप करायचे. हे सर्व करतांना ‘माझे मन शांत आणि हलके होत आहे’, असे मला जाणवायचे.
१ अ २. या कालावधीत मला ‘देवाजवळ बसून रहावे’, असे वाटायचे. त्या वेळी बाळाच्या होणार्या हालचालींवरून ‘बाळालासुद्धा हे आवडत आहे’, असे मला जाणवायचे.
१ आ. जन्मानंतर
१ आ १. बाळाचा जन्म झाल्यावर ‘बाळ अत्यंत तेजस्वी, सात्त्विक आणि शांत आहे’, असे प्रत्येक जण सांगत होता.
१ आ २. सहनशीलता : जन्माच्या वेळी बाळाच्या गालावर इजा झाली होती, तरीही बाळ शांत राहिले. ते पाहून आधुनिक वैद्यही म्हणाले, ‘‘बाळ संतांप्रमाणे शांत आहे.’’ समर्थ ६ – ७ मासांचा (महिन्यांचा) असल्यापासून रुग्णाईत असला, तरी त्रास देत नसे. तो खेळतांना पडला, तरी रडत नसे. तो शांतपणे औषध लावून घ्यायचा. ‘भगवंतच त्याला सहन करण्याची शक्ती देतो’, असे माझ्या लक्षात आले.
१ आ ३. सात्त्विक गोष्टींची आवड
अ. समर्थ देवांची गाणी आणि आरती यांत रमून जात असे. पूजेच्या वेळी घंटी वाजवल्यावर तो तिच्याकडे आकृष्ट होत असे.
आ. मंदिरात गेल्यानंतर तो शांत बसून निरीक्षण करत असे.
इ. गणेशोत्सवात घरी गणपति बसवल्यानंतर विसर्जन होईपर्यंत तो पुष्कळ उत्साही आणि आनंदी असतो.
ई. त्याला दूरदर्शनवरील अन्य मालिका पहाण्यापेक्षा धार्मिक कार्यक्रम पहायला आवडतात.
१ आ ४. समर्थ कुणीही न सांगता स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवतो आणि स्वतःचे स्वतः आवरतो.
१ आ ५. नामजपादी उपाय भावपूर्ण करणे
अ. तो प्रत्येक कृती भावपूर्ण करतो. जपमाळ हातात घेतल्यानंतर तो ती भावपूर्ण धरतो आणि जपमाळेसंबंधी सर्व नियम पाळतो. तो डोळे मिटून भावपूर्ण प्रार्थना आणि नामजप करतो. त्या वेळी त्याच्या ताेंडवळ्यावर आनंदी भाव असतात.
आ. तो त्याच्या वडिलांसह घराची शुद्धी करतो.
इ. तो मीठ-पाण्याचे, तसेच अत्तर आणि कापूर यांचे उपाय भावपूर्ण करतो. तो आम्हालाही उपायांची आठवण करून देतो.
१ आ ६. अन्य
अ. घरात नवीन व्यक्ती आल्यावर तो तिच्याशी प्रेमाने बोलतो. तो कुणाचे मन दुखावत नाही.
आ. तो मला आणि त्याच्या वडिलांना कामांमध्ये साहाय्य करतो.
इ. त्याच्याकडून चूक झाली, तर तो लगेच क्षमा मागतो.
ई. तो हट्टीपणा करत नाही. एखाद्या वेळी त्याला समजावून सांगितल्यावर तो लगेच ऐकतो.
१ आ ७. दळणवळण बंदीपूर्वी तो माझ्या समवेत धर्मशिक्षणवर्गाला आवडीने येत असे. धर्मशिक्षणवर्गात सांगितलेली सर्व सूत्रे तो एकाग्रतेने ऐकतो. तो आम्हा दोघांसह सेवेलाही येत असे.’
२. श्री. गणेश सांडभोर (वडील)
२ अ. लढाऊ वृत्ती
१. ‘समर्थने दूरचित्रवाणीवरील ‘रामायण’ मालिका पाहून धनुष्यबाण करवून घेतले. तो त्याच्याशी खेळत असे.
२. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आहे. तो त्यांच्या प्रतिमेजवळ संध्याकाळी दिवा लावतो. तो महाराजांच्या प्रतिमेजवळ ‘त्यांचा मावळा आहे’, या भावाने बसतो. तो लढाऊ वृत्तीने घोषणा देतो.
३. ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका’, या ट्विटर ‘ट्रेंड’(एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) मध्ये समितीच्या साधकांनी एक ध्वनी-चित्रफीत करायला सांगितली होती. समर्थला घेऊन ती सेवा करतांना मी ‘तो ‘ट्रेंड’ कशाविषयी आहे ? त्यात काय बोलायचे ?’, हे त्याला समजावून सांगितले. त्यानंतर संपूर्ण ‘व्हिडिओ’मध्ये तो लढाऊ वृत्तीने बोलत होता.
२ आ. त्याला खोटे बोललेले आवडत नाही.’
३. श्री. श्रीकांत बोराटे, पुणे
३ अ. खेळण्यापेक्षा सेवेला प्राधान्य देणे : ‘समर्थचे बाबा आणि मी प्रसाराच्या सेवेला जातांना तो घरी खेळण्यापेक्षा आमच्या समवेत सेवेला येतो. सेवेत असतांना अधिक वेळ झाला, तरी ‘कंटाळा आला’, असे तो म्हणत नाही. सेवा करतांना तो सेवेतील प्रत्येक कृतीचे निरीक्षण करतो.’
४. स्वभावदोष : चिडचिड करणे’ – सौ. प्रगती गणेश सांडभोर (कु. समर्थची आई)