साधनेची तळमळ अन् संतांप्रती भाव असलेला आणि ५४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला यवतमाळ येथील कु. रुद्र चंद्रशेखर गोबाडे (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !कु. रुद्र चंद्रशेखर गोबाडे हा या पिढीतील एक आहे !

‘मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (२६.१२.२०२१) या दिवशी कु. रुद्र चंद्रशेखर गोबाडे याचा १० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त कु. रुद्रचे आजी आणि आजोबा (आईचे आई-वडील) यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. रुद्र गोबाडे

कु. रुद्र चंद्रशेखर गोबाडे याला दहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. रुद्र चंद्रशेखर गोबाडे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ५१ टक्के पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२१ मध्ये त्याची पातळी ५४ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सौ. सुनिता खाडे

सौ. सुनिता खाडे (कु. रुद्रची आजी, आईची आई)

१. प्रेमभाव

१ अ. आजोबांची काळजी घेणे ः ‘रुद्रचे आजोबा दुकानात जायला निघाल्यावर तो त्यांना म्हणतो, ‘‘बाबा प्रार्थना आणि उपाय करा. तुम्ही ‘मास्क’ घातलात का ? भ्रमणभाष घेतलात का ? हळू जा.’’ तेव्हा ‘देवच त्याच्या माध्यमातून त्यांची काळजी घेत आहे’, असे वाटून माझी भावजागृती होते. त्याच्या प्रेमळ बोलण्याने आपोआपच ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त होते.

१ आ. साधकांविषयी कुटुंबभावना असणे ः एकदा रुद्रची आई मला म्हणाली, ‘‘आई, तू साधकांशी भ्रमणभाषवर अधिक वेळ बोलत असतेस आणि कुटुंबासाठी अल्प वेळ देतेस. जरा आमच्याशीही बोलत जा.’’ तेव्हा रुद्र पटकन म्हणाला, ‘‘साधकही आपले कुटुंबीयच आहेत ना ?’’

२. शिकण्याची वृत्ती ः एकदा परात्पर गुरु डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्र चकती दाखवणार होते. तेव्हा रुद्र वही-पेन घेऊन बसला आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली सूत्रे लिहून घेत होता.

३. इतरांनी साधना करावी, ही तळमळ

अ. रुद्रची आई नोकरीला जात असल्यामुळे रुद्र दिवसातील काही घंटे आमच्याकडे असतो. तो ९.३० वाजता नामजपाला बसण्यासाठी १० मिनिटे आधी येतो आणि आम्हाला नामजप करण्यासाठी बोलावतो.

आ. रुद्रच्या आईला नोकरीला जायचे असल्याने ती बसून नामजप करण्याला प्राधान्य देत नव्हती. दळणवळण बंदीमुळे आई घरी असतांना तो तिला नामजपाची आठवण करून द्यायचा.

४. आज्ञापालन करणे ः रुद्रला जिल्हासेवकांनी केंद्रातील बालसाधकांचा आढावा घ्यायला सांगितला. तेव्हा ती सेवा त्याने लगेच आनंदाने स्वीकारली आणि प्रतिदिन तो त्यांचा आढावा घेऊन जिल्हासेवकांना न चुकता आढावा देत असे.

५. त्याची चूक सांगितली असता तो लगेच स्वीकारतो.

६. त्यागी वृत्ती ः मी रुद्रच्या आईला अर्पणाचे महत्त्व सांगत होते. तेव्हा त्याने त्याचे खाऊचे जमा झालेले पैसे परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्पण केले.

७. सेवेची तळमळ असणे ः रुद्रला सेवा करायला फार आवडते. तो आजोबांच्या समवेत कधी कधी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या सेवेला जातो. आमच्याकडे सात्त्विक उत्पादनांच्या साहित्याचे वितरण करण्याची सेवा आहे. दळणवळण बंदीमध्ये साहित्य आल्यावर साधकांचे साहाय्य मिळत नसे. तेव्हा त्याने खोके ‘पॅकिंग’ करणे, ते उघडून देणे, साहित्य लावणे, या सेवा उत्साहाने आणि आनंदाने केल्या. तो आजोबांना म्हणतो, ‘‘मी मोठा झाल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करीन.’’

८. भाव

८ अ. परात्पर गुरु देशपांडेकाका यांच्याप्रती भाव असणे ः वर्ष २०२० मध्ये (तो ९ वर्षांचा असतांना) रुद्र आजोबांच्या समवेत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करत असतांना परात्पर गुरु देशपांडेकाका (परात्पर गुरु कालिदास देशपांडे) यांच्या निवासस्थानी गेला होता. तेव्हा तो त्यांच्या घरातील ध्यानमंदिरात काही वेळ नामजपाला बसला. ध्यानमंदिरात परात्पर गुरु देशपांडेकाका यांचा पलंग आहे. त्या संदर्भात त्याला आलेली अनुभूती सांगतांना तो म्हणाला, ‘‘पलंगावर परात्पर गुरु देशपांडेकाका झोपले आहेत’, असे मला दिसले. मी त्यांच्या चरणांवर सूक्ष्मातून डोके ठेवले असता त्यांच्या चरणांमधून पिवळा प्रकाश माझ्या डोक्यात गेल्याचे जाणवले.’’ हे ऐकून आमची भावजागृती झाली.

८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती भाव असणे

१. मी रुद्रला आमच्या घरातील तुळशी वृंदावनामध्ये उन्हाळ्यात नवीन उगवलेली तीन तुळशीची रोपे दाखवली. तेव्हा तो म्हणाला, ‘‘मोठी तुळस म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर आणि बाजूच्या २ तुळशी म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आहेत.’’ त्याचे वाक्य ऐकून माझी भावजागृती झाली. प्रतिदिन तुळशीला पाणी घालतांना मला या वाक्याची आठवण होऊन ‘आपण तिन्ही गुरूंच्या चरणांवर जलाभिषेक करत आहोत’, असा भाव निर्माण होतो आणि कृतज्ञता व्यक्त होते.

२. रुद्र नवीन घरी रहायला आला, तेव्हा त्याच्यासाठी वेगळी खोली होती आणि त्यातील साहित्य लावायचे होते. तेव्हा रुद्रने श्रीकृष्णाची मूर्ती आणून ती कपाटात ठेवली. तिच्या बाजूला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सचित्र जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला आणि नंतर इतर साहित्य लावायला घेतले. यातून रुद्रचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव दिसून आला.’

(७.६.२०२१)

श्री. विष्णुपंत खाडे

श्री. विष्णुपंत खाडे (कु. रुद्रचे आजोबा, आईचे वडील)

१. प्रेमभाव ः ‘आमच्याकडे घराचे काम चालू होते. त्या वेळी कामगारांवर लक्ष देण्यासाठी मी दिवसभर उभाच असायचो. तेव्हा रुद्र म्हणाला, ‘‘आजोबा, तुमचे पाय दुखतील. एवढा वेळ उभे राहू नका. फार काम करू नका. तुम्ही आराम करा. मी मोठा झाल्यावर तुम्हाला काम करू देणार नाही.’’

२. स्पष्टवक्तेपणा ः एकदा दुकानांमध्ये ८०० किलो वजनाचे लोखंडी पत्रे (शीट) पडल्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली. तेव्हा माझ्या पायाचे शस्त्रकर्म (ऑपरेशन) करावे लागले. त्यानंतर दुकानातील नोकर घरी आला होता. तेव्हा रुद्र त्याला रागावून म्हणाला, ‘‘तुम्ही लक्ष दिले नाही; म्हणून यांचा अपघात झाला.’’ त्या वेळी कामगार असूनही मला काम करावे लागते, याची त्याला चीड आल्याचे लक्षात आले.

३. रुद्रचे स्वभावदोष

जेवणामध्ये आवड-नावड असल्याने ताटातील अन्न टाकणे, अभ्यासाचा कंटाळा करणे आणि विसरणे

‘गुरुदेवांनी आम्हाला रुद्रकडून शिकता यावे, यासाठी हा सात्त्विक नातू दिला आणि त्यांनीच आम्हा उभयतांकडून ही सूत्रे लिहून घेतली, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(७.६.२०२१)