रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात झालेल्या श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा झाला. त्या वेळी सनातन पुरोहित पाठशाळेतील श्री. ईशान जोशी यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. ईशान जोशी

१. श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेपूर्वी थकवा जाणवणे आणि संकल्प अन् पुण्याहवाचन  असलेल्या दिवसापासून आनंद जाणवू लागणे

‘मला श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेपूर्वी पुष्कळ थकवा जाणवत होता. त्यामुळे मला पूर्वसिद्धतेत सहभागी होता येत नव्हते; पण ज्या दिवशी संकल्प आणि पुण्याहवाचन होते, त्या दिवसापासून मला पुष्कळ आनंद अन् उत्साह जाणवायला लागला.

२. श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी संशोधनाच्या कारणाने विधींना विलंब होत असल्याने आरंभी चिडचिड होणे, ‘विधींचे महत्त्व लोकांवर बिंबवण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे आहे’, असे गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगणे आणि त्यानंतर त्यात सहभागी झाल्यावर परात्पर गुरुदेवांची महानता लक्षात येणे

श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी संशोधनाच्या कारणाने विधींना विलंब होत होता. त्या वेळी आरंभी माझ्या मनाची चिडचिड झाली; म्हणून मी माझ्या मनाची स्थिती सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितली. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘पुढे येणार्‍या काळात असे संशोधन आपण करू शकणार नाही. त्या वेळी आपल्याकडे वेळ आणि साधने अल्प असणार. त्यामुळे आपण आताच जेवढे शक्य आहे, तितके संशोधन करायचे आहे. या संशोधनाचा उपयोग आपल्याला समाजात जागृती करण्यासाठी, भगवंताप्रती लोकांचा भाव वृद्धींगत होण्यासाठी, तसेच विधींचे महत्त्व लोकांवर बिंबवण्यासाठी होणार; म्हणून हे संशोधन महत्त्वाचे आहे.’ परात्पर गुरुदेवांनी वरील सूत्र सांगितल्यावर ‘ते नेमके काय संशोधन करत आहेत ?’, याविषयीची रुची वाढली आणि मी त्यात सहभागी झाल्याने आनंद होऊन परात्पर गुरुदेवांची महानता लक्षात आली.

३. देवीची मूर्ती परात्पर गुरुदेवांकडे हस्तस्पर्शासाठी नेल्यावर ‘त्यांनी तिच्या हृदयाला स्पर्श करावा’, असे त्यांनीच सुचवल्याचे जाणवणे आणि त्यांनी हस्तस्पर्श केल्यावर मूर्तीमध्ये प्राण आल्याचे जाणवणे

देवीची मूर्ती परात्पर गुरुदेवांकडे हस्तस्पर्शासाठी नेण्यात आली. त्या वेळी मला मंत्र म्हणण्याची संधी मिळाली. तेव्हा परात्पर गुरुदेवांनी मला विचारले, ‘‘मी कुठे स्पर्श करू ?’’ त्या वेळी त्यांनीच मला आतून सुचवले, ‘हृदयाला !’; कारण जेव्हा देवतांची प्राणप्रतिष्ठा करतात, तेव्हा त्यांच्या हृदयाला स्पर्श करतात. त्यामुळे मी परात्पर गुरुदेवांना मूर्तीच्या हृदयावर हात ठेवायला सांगितला. ज्या क्षणी त्यांनी हस्तस्पर्श केला, त्या क्षणी मूर्तीमध्ये प्राण आल्याचे मला जाणवले. ‘वरील कृती त्यांनीच सुचवली’, असे मला जाणवले. त्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

४. देवीच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी देवीला शृंगार करण्यात आला होता. त्या वेळी ‘देवी श्वास घेत असून मूर्ती हालत आहे’, असे मला स्पष्टपणे जाणवले.

५. होम भावपूर्ण आणि मनापासून होण्यासाठी  प्रार्थना केल्याने पुष्कळ आनंद जाणवणे

देवीच्या प्रतिष्ठापनेच्या अंतर्गत होम होत असतांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. त्या वेळी ‘होम आणखी भावपूर्ण आणि मनापासून कसा करता येईल ?’, यासाठी प्रार्थना चालू होत्या. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळत होता.

६. ‘देवीची प्रतिष्ठापना होणे किती  आवश्यक होते ?’, हे लक्षात येणे

६ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देवीला अभिमंत्रीत जल लावल्यावर ‘देवीने तिची शक्ती पाताळात संक्रमित केली’, असे जाणवणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देवीला अभिमंत्रीत जल लावले. त्या वेळी ‘देवीने तिची शक्ती पाताळात संक्रमित केली’, असे मला जाणवले.

६ आ. साधकांच्या रक्षणासाठी ‘देवीची प्रतिष्ठापना आता होणे किती आवश्यक होते ?’, हे काही घटनांवरून लक्षात येणे : श्री भवानीदेवीची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर कुठे ना कुठे भूकंप होतच होते. भूकंपांचे प्रमाण पुष्कळ वाढले होते. तसेच दोन देशांच्या सैनिकांत धुमश्चक्री चालू झाली होती. यावरून साधकांच्या रक्षणासाठी ‘देवीची प्रतिष्ठापना होणे किती आवश्यक होते ?’, हे लक्षात आले.

७. सेवेत असलेल्या साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

७ अ. संशोधनामुळे थांबावे लागत असतांनाही साधकत्व असल्याने शांत रहाणारे मुख्य पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी ! : देवीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी संशोधन असल्याने पुष्कळ वेळा थांबावे लागत होते. त्या वेळी मुख्य पुरोहित ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दामोदर वझेगुरुजी होते. वझेगुरुजींचे कौतुक करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘बाहेरचे पुरोहित असते, तर आतापर्यंत थांबलेच नसते. पुरोहितच काय, आपले साधकही एवढा वेळ शांत बसले नसते. गुरुजींमध्ये पुष्कळ साधकत्व आहे. त्यामुळे ते दिवस-रात्र विधी करू शकतात. त्यांना कंटाळाही येत नाही किंवा प्रतिक्रियाही येत नाही. ते शांतच असतात.’’

७ आ. पुढाकार घेऊन सगळ्यांना प्रोत्साहित करणारे श्री. अनिरुद्ध राजंदेकर ! : ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिरुद्ध राजंदेकरदादा या वेळी चित्रीकरणाच्या सेवेत नवीन होता, तरी तो पुढाकार घेऊन सगळ्यांकडून सेवा करवून घेत होता आणि तो सगळ्यांना प्रोत्साहित करत होता. एखाद्याला चांगले सुचले, तर लगेच त्याचे कौतुकही करत होता. त्यामुळे बाकीच्यांनाही उत्साह येत होता. त्याचप्रमाणे मधे-मधे ‘देवीला प्रार्थना करणे’ आणि शरण जाणे’ याही कृती तो स्वतः करून इतरांना करण्यास सांगत होता. त्यामुळे देवी त्याला वेळच्या वेळी अनुभूतीही देत होती.

७ इ. श्री. राजू सुतार आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांनी अखंड सेवारत राहून मूर्ती रंगवण्याची सेवा पूर्ण करणे : मूर्तीकार श्री. राजू सुतार आणि श्री. रामानंद परब यांनी २४ घंट्यांपेक्षा अधिक वेळ जागून मूर्ती रंगवण्याची सेवा पूर्ण केली. त्या वेळी ते अखंड सेवारत असतांनाही इतरांशी समन्वयसुद्धा करत होते. त्यांनी सेवेच्या ध्यासाने आणि इतरांना अडचण यायला नको; म्हणून जेवणासाठी अल्पसा वेळ दिला होता. त्यांना काही वेळा अनेक साधकांचे सेवेसाठी भ्रमणभाष आले, तरी ते तितक्याच शांतपणे उत्तर देत होते.

८. कृतज्ञता

परात्पर गुरुदेवांनी वरील साधकांच्या समवेत ठेवून त्यांच्याकडून शिकण्याची अमूल्य संधी उपलब्ध करून दिल्याविषयी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘भवानीदेवीच्याच कृपेने ही प्रतिष्ठापना झाली. त्यातून पुष्कळ आनंद मिळाला आणि अनुभूती आल्या’, याविषयी श्री भवानीमाता, परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. ईशान जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘नेत्रोन्मीलन विधी’च्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘नेत्रोन्मीलन विधी’नंतर देवीला दर्पण (आरसा) दाखवतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी विविध द्रव्यांच्या मिश्रणयुक्त जलाने देवीला स्नान घातल्यावर ‘देवी ते स्वीकारत आहे’, असे वाटणे : जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भवानीदेवीला विविध द्रव्यांच्या मिश्रणयुक्त जलाने स्नान घातले, तेव्हा ‘देवी त्यांच्याकडे बघून हसत आहे, तसेच प्रत्यक्ष देवी ते स्वीकारत आहे’, असे मला जाणवले.

२. ‘नेत्रोन्मीलन विधी’च्या वेळी देवीचे तत्त्व मोठ्या प्रमाणात जागृत झाल्याचे जाणवणे : देवीचा ‘नेत्रोन्मीलन विधी’ करण्यात आला. त्या वेळी देवीच्या डोळ्यांना तूप-मध, काजळ आणि तूप-मध-साखर, असे एका पाठोपाठ एक लावण्यात आले. ‘डोळ्याला ते पदार्थ लावल्यावर डोळा जागृत होत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी देवीचे तत्त्व पुष्कळ मोठ्या प्रमाणात जागृत झाल्याचे जाणवले.

३. ‘नेत्रोन्मीलन विधी’नंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्री भवानीदेवी यांचा तोंडवळा एकाच वेळी आरशात दिसणे अन् त्या वेळी ‘त्या दोघी एकच आहेत’, असे वाटणे : वरील ‘नेत्रोन्मीलन विधी’नंतर देवीला आरसा दाखवायचा होता. त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देवीला आरसा दाखवला आणि माझ्याकडे दिला. आरसा खाली ठेवतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्री भवानीदेवी यांचा तोंडवळा एकाच वेळी त्या आरशात दिसला. त्या वेळी मला जाणवले, ‘भवानीमाता आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ एकच आहेत. दोघींनी आरशाच्या माध्यमातून शक्तीची देवाण-घेवाण केली आणि देवीने जणूकाही सांगितले, ‘बघ, आम्ही दोघी एकच आहोत’. (विशेष म्हणजे महर्षींनीसुद्धा ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या आई भवानीस्वरूप आहेत’, असे सांगितले आहे.)

४. नेत्रोन्मीलन विधीपासून ‘देवी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा तोंडवळा एकसारखाच दिसतो’, असे मला जाणवले.

– श्री. ईशान जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक