भग्नावस्थेतील देवतांच्या मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करणारे श्री. सतीश मोरे यांचे अभिनंदन ! मोरे यांचा आदर्श धर्मप्रेमींनी घ्यावा !
भिंगार (जिल्हा नगर) – हिंदु धर्मामध्ये मूर्ती पूजेला महत्त्वाचे स्थान आहे. हिंदु देवतांच्या मूर्तींची पूजा करतात; परंतु काही जणांकडून मूर्ती किंवा चित्र रस्त्याच्या कडेला टाकलेली असतात. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, त्यामुळे त्या भग्नावस्थेत आढळतात. हे सर्व पाहून हिंदु राष्ट्र सेनेचे भिंगारचे शहराध्यक्ष श्री. सतीश उपाख्य नाना मोरे यांनी देवतांच्या भग्नावस्थेत पडलेल्या मूर्ती कार्यकर्त्यांना समवेत घेऊन एकत्रित करून त्या नगरपासून ८० किलोमीटर असलेल्या प्रवरासंगम येथील वहात्या पाण्यात विसर्जित केल्या आहेत.
याविषयी बोलतांना श्री. नाना मोरे म्हणाले, ‘‘नगर येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या समोरही देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमा जळलेल्या अवस्थेत होत्या. त्या पाहून डोळ्यात पाणी आले. हिंदूंनी आपल्या देवतांविषयी संवेदनशील राहून आपल्याच हातून होणारे आपल्या देवतांचे विडंबन थांबवावे. तसेच आपण बरेच दिवस पूजलेल्या आपल्या घरातील देवतांच्या प्रतिमा किंवा मूर्ती कुठेही न टाकता त्या वहात्या पाण्यात विसर्जन कराव्यात’’, असे कळकळीचे आवाहनही सर्व हिंदूंना केले.
या वेळी रामा एंटरप्राइजेसचे मालक श्री. सुरजशेठ रवे यांनी या कार्यात योगदान दिले.