लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांना विहीत वेळेत दुसरा डोस द्या ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली

जयंत पाटील

सांगली, १० मे – जिल्ह्यात आतापर्यंत साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, अशांना विहीत वेळेत दुसरा डोस द्यावा. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरणाचे डोस मिळवण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करू, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना सद्य:स्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात १५ मेपर्यंत कडक दळणवळण बंदी पाळण्यात येणार आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालय येथे ३० खाटा वाढवण्यात आल्या असून सांगली येथे शासकीय रुग्णालयात ५०० खाटांच्या रुग्णालय उभारणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागासमवेत चर्चा चालू आहे. जिल्ह्याला सध्या ४४ मेट्रिक टन ऑक्सिजन संमत झाला असून सदरचा ऑक्सिजन जेमतेम पुरवण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिविरचा पुरवठा या दोन गोष्टींचे फार मोठे आव्हान असून राज्यांना रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिविरचा पुरवठा व्हावा, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे.’’

या वेळी खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ यांसह अन्य राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.