परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न केल्यावर ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

श्रीमती मनीषा गाडगीळ
‘श्रीमती मनीषा गाडगीळ यांचे सहज बोलणेही किती मार्गदर्शनात्मक असते, हे त्यांच्या पुढील लेखावरून लक्षात येईल. अशा विचारांमुळेच त्यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे आणि त्या साधनेत जलद गतीने प्रगती करत आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

१. घरी पाहुणे जेवायला असतांना समष्टीला आवडेल, अशी चव येण्यासाठी प्रार्थना करणे

१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले पदार्थांची मापे सांगत आहेत’, असे जाणवणे : ‘एकदा आमच्याकडे ५ – ६ नातेवाइक जेवायला आले होते. त्या वेळी मी सकाळी स्वयंपाक करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘समष्टीला आवडेल अशी चव येऊ दे’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर मला परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडून सर्वकाही करवून घेत असल्याचे जाणवले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर मला ‘प्रत्येक पदार्थ किती घ्यायचा ? तो किती प्रमाणात घालायचा ?’, याचे माप सांगत आहेत’, असे जाणवत होते. देवानेच माझ्याकडून स्वयंपाक करवून घेतला असल्याचे मला जाणवत होते.

१ आ. नातेवाइकांनी स्वयंपाक उत्कृष्ट झाल्याचे सांगितल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना मनातून शाबासकी देणे आणि त्या वेळी कृतज्ञतेने डोळे भरून येणे : सर्व जण जेवायला बसल्यावर एका नातेवाईकाने ‘स्वयंपाक नुसता चांगला झाला नाही, तर उत्कृष्ट झाला आहे’, असे सांगितले. अन्य नातेवाइकांनीही सर्वच स्वयंपाक चांगला झाला असल्याचे सांगितले. मी सर्वांना जेवण वाढत होते. मी परात्पर गुरु डॉक्टरांना मनातून म्हणाले, ‘ही शाबासकी तुम्हाला.’ त्या वेळी माझे डोळे कृतज्ञतेने भरून आले. माझ्याकडे बोलण्यासाठी काही शब्दच नव्हते. देवानेच सर्वकाही करवून घेतले होते. परात्पर गुरु डॉक्टर, शब्दातीत कृतज्ञता !

२. १० वर्षांपूर्वी रामनाथी आश्रम पाहिला असल्याने काही साधकांनी आश्रमात जाण्याविषयी विचारणे

२ अ. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ असल्याचे अनुभवून परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत असल्याने दिवसभर चैतन्य अनुभवता येऊन आनंदी रहाता येत असल्याचे साधकांना सांगणे : मला काही दिवसांपूर्वी २ – ३ साधकांनी विचारले, ‘‘तुम्ही रामनाथी आश्रम पहायला कधी गेला होता ?’’ त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘मी वर्ष २०१० मध्ये आश्रमात गेले होते.’’ त्यावर त्यांनी मला विचारले, ‘‘मग तुम्हाला आता आश्रम पहावासा वाटत नाही का ? गुरुदेवांना भेटावेसे वाटत नाही का ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘आश्रमात जाणे आणि गुरुदेवांना भेटणे हे दोन्हीही चांगलेच आहे; परंतु सध्या मी वैयक्तिक अडचणींमुळे आश्रमात जाऊ शकत नाही. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ यानुसार परात्पर गुरुदेव आपल्यापासून लांब नसून अगदी आपल्या जवळच हृदयात, घरात आणि सभोवती सर्वत्र आहेत’, असे मला वाटते. त्यांच्या अस्तित्वामुळे मला दिवसभर चैतन्य अनुभवता येऊन आनंदी रहाता येते.’’

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच हे शक्य आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

– श्रीमती मनीषा गाडगीळ, सनातन संकुल, देवद, पनवेल.

(‘मला गुरुदेवांना भेटायचे आहे’, असा विचार करणार्‍या साधकांना श्रीमती. मनीषा गाडगीळ यांच्या वरील लिखाणातून बरेच काही शिकता येईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  )


विविध प्रसंगात श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी साधकांना साधनेविषयी सांगितलेली सूत्रे

१. एका साधिकेला तिच्या मुलांना चुका स्पष्टपणे सांगता न येणे, त्यावर ‘भावनिक स्तरावर हाताळल्याने सर्वांच्याच साधनेची हानी होत असून देवाला प्रार्थना करून मुलांना त्यांची चूक सांगितल्यावर त्यांना साधनेत साहाय्य होईल’, असे तिला सांगणे

‘एका साधिकेची मुलेही साधना करतात. मुलांचे काही प्रसंगांत चुकल्यास तिला मुलांना चुका स्पष्टपणे सांगता येत नाही. ती त्यांना भावनिक स्तरावर हाताळते. मी त्या साधिकेला म्हणाले, ‘‘अध्यात्मात एकमेकांना भावनिक स्तरावर हाताळल्याने सर्वांच्याच साधनेची हानी होईल. तुम्ही देवाला प्रार्थना करून मुलांना त्यांच्या चुका सांगा, म्हणजे तुम्हाला ताण येणार नाही आणि ‘चूक कशी सांगायची ?’, हा विचारही न येता ती सहजतेने सांगितली जाईल. तुम्ही मुलांना चुका सांगितल्यावर तुमची साधना होईल आणि मुलांनाही साधनेत साहाय्य होईल.’’ त्यावर त्या साधिकेने तसे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

२. कर्तेपणा घेतल्याने ताण येत असल्याचे साधिकेने सांगणे, सेवा पूर्ण करून घेण्याविषयी देवाला सांगितल्यास ताण येत नसल्याचे तिला सांगणे आणि कर्तेपणा ईश्‍वरचरणी अर्पण केल्यावर अहं न्यून होत असल्याने सेवेतील आनंद मिळत असल्याचे तिला लक्षात आणून देणे

एकदा एका साधिकेने मला सांगितले, ‘‘मी काही वेळा सेवेचा कर्तेपणा स्वतःकडे घेते. त्या वेळी मला वाटते, ‘ही सेवा पूर्ण करायची आहे. ती सेवा पूर्ण करायची आहे. घरातील कामही राहिले आहे.’ मला सेवेचा ताण आल्याने सेवेत काही वेळा चुका होतात. मग मला पुन्हा ताण येतो.’’ त्या वेळी मी तिला ‘कर्तेपणा स्वतःकडे घेणे’ यांवर स्वयंसूचना द्यायला सांगितल्या. मी तिला सांगितले, ‘‘तुला सर्व सेवा ताण न घेता पूर्ण करायच्या आहेत. तुला सेवेचा ताण आल्यास देवाला सांगायचे, ‘देवा, ही सेवा आणि दुसरीही सेवा तूच पूर्ण करून घे.’ यामध्ये विचार तर सेवेचाच आहेे; परंतु ‘मी सेवा पूर्ण करणार’ यापेक्षा ‘देवच माझ्याकडून सेवा करवून घेणार’, हा विचार वाढण्यास साहाय्य झाल्याने ताण येत नाही. प्रत्येक सेवा करतांना देवाला प्रार्थना केल्याने आध्यात्मिकरण होऊन ‘देव किती साहाय्य करतो !’, या विचाराने कृतज्ञताभावातही वाढ होते. देवानेच सेवा पूर्ण करून घेतल्याने कर्तेपणाही लगेचच ईश्‍वरचरणी अर्पण करायचा. कर्तेपणा अर्पण केल्यावर अहं न्यून होण्यास साहाय्य होत असल्याचे आपल्या लक्षात आल्याने सेवा करतांना आनंद मिळतो.’’

३. वेगवेगळ्या विचारांमुळे देवापासून दूर गेल्याची जाणीव साधिकेला विलंबाने होत असणे आणि तिने याविषयी सांगितल्यावर ‘आपली दोरी देवाच्या दोरीला जोडलेली हवी आणि ती तुटल्यास लगेचच गुरुस्मरण अन् नामजप यांनी जोडायला हवी’, असे तिला सांगणे

‘एक साधिका घरकाम करते. तिला अन्य कुठेही जायचे असल्यास ‘सर्वांची घरकामे पूर्ण कधी होणार ?’, असा विचार येतो. तिच्या मनातील विचार वाढून तिचे मन भरकटते आणि तिच्यावरील त्रासदायक आवरण वाढते. साधिकेला विलंबाने ‘मी देवापासून दूर गेले आहे’, याची जाणीव होत असे. मी तिला सांगितले, ‘‘आपली देवाकडे जाणार्‍या दोरीची वीण घट्टच हवी. आपण घरात ‘इलेक्ट्रिक’ची ‘वायर’ वापरतो. ‘वायर’ तुटल्यास आपण तिला लाल रंगाची ‘टेप’ लावून ती लगेच चिकटवतो. आपली दोरीही देवाच्या दोरीला जोडलेली असायला हवी. ही दोरी तुटल्यास लगेचच गुरुस्मरण आणि नामजप यांनी ती जोडायला हवी; म्हणजे पुन्हा सर्वकाही सुरळीत होते आणि मग आपल्याला आनंद मिळतो.’’

४. एका कुटुंबात सासू-सुनेचे जुळत नसतांना मुलाला ‘एखाद्याला साधना करावीशी वाटेल’, असेच आपले वागणे आणि बोलणे हवे !’, असे सांगणे

एका कुटुंबात चौघे जण रहातात. सासू-सुनेचे काही प्रमाणात जुळत नव्हते. मला मुलाने विचारले, ‘‘माझी बायको साधिका नसल्याने तिला साधनेसंदर्भात काही गोष्टी पटत नाहीत. तिला काही वेळा घरातील व्यक्तींच्या काही चुका लक्षात येतात. त्या वेळी ती आम्हाला त्याची जाणीव करून देते.’’ त्या वेळी मी त्याला सांगितले, ‘‘हे चांगले आहे. आपण साधक आहोत. त्यामुळे आपले वागणे आणि बोलणे असे हवे की, ते पाहूनच इतरांना साधना करावीशी वाटली पाहिजे. आपली प्रत्येक कृती साधनेच्या दृष्टीने योग्य आणि परिणामकारक असली, तर त्यातून सर्वांनाच आनंद मिळतो.’’

 – श्रीमती मनीषा गाडगीळ, सनातन संकुल, देवद, पनवेल.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक