१. धर्माविना माणूस तो कसला ?
आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत्पशुभिर्नराणाम् ।
धर्माे हि तेषामधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ।।
अर्थ : आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी पशू आणि मानव यांच्यात समान आहेत. (धर्म ही मानवातील अधिकची विशेष गोष्ट आहे.) धर्मविहीन (धर्माचरण न करणारी) माणसे ही पशूंसारखीच आहेत.
२. माणूस आणि पशू यांतील साम्य
आहार, निद्रा, भीती आणि संभोग या गोष्टी माणसात अन् पशूत दोहोंतही आहेत. पशूही खातो, तसा माणूसही खातो. पशूही झोपतो आणि माणूसही झोपतो. पशूही भितो, तसा माणूसही भितो. पशूही विषयोपभोग घेतो, तसाच माणूसही घेतो.
२ अ. खाणे : कुणी म्हणेल पशू काही माणसासारखे रुचकर अन्न खात नाहीत; परंतु माणसाला जे रुचकर, तेच पशूला रुचकर असेल कशावरून ? रुचकर सोडा; पण एखाद्या पशूचे जे अन्न असते, ते दुसर्या पशूचे अन्न असेलच, असे नाही ! वाघ-सिंह गवत खातात का ? हिरवा चारा गायी-म्हशी काय आवडीने खातात; पण उंट खातो ती काटेरी झुडुपे गायी कुठे खातात ?
तुम्ही अमेरिकन मंडळी जे अन्न चवीने खातात, ते बर्गर किंवा पिझ्झा मला तोंडातही घालावे, असे वाटत नाही; पण अन्न खाणे एवढ्यापुरतेच सर्व पशू आणि माणूस समान आहेत ना ?
२ आ. झोपणे : झोपतात सगळेच ! कुणी मऊ मऊ गादीवर, तर कुणी गोठ्यात. कुणी जंगलात, कुणी रस्त्यावर. कुणी बिळात, तर कुणी झाडावर; पण माणूस, पशू आणि पक्षी सगळेच प्राणी झोपतात !
२ इ. भिणे : भितातही सगळेच ! कुणी प्राणी वाघाला भितात, कुणी मगरीला. कुणी कुत्र्याला, तर कुणी मांजराला. कुणी बायकोला, तर कुणी साहेबाला; पण भितात हे खरेच ना !
२ ई. विषयोपभोग : विषयोपभोग कोणता प्राणी करत नाही ? त्यांची त्यांची पद्धत वेगळी असेल. मानवासह सर्व प्राण्यांची पुनरुत्पत्ती संभोगातूनच आहे. मग इतर पशू आणि माणूस वेगळा तरी कशात आहे ?
कुणी म्हणतात मनुष्य हसतो बाकीचे प्राणी हसत नाहीत. कुणास ठाऊक हसतात कि नाही ? आनंदाचे प्रकटन म्हणजेच हास्य असेल, तर त्यांनाही होणारा आनंद ते नक्कीच प्रकट करत असतील. ते हास्य कदाचित आमच्या हास्यासारखे नसेल ! आणखी एक गोष्ट आहे. आम्ही जसे दुसर्याला हसतो, तसे ते हसतात कि नाही कुणाला ठाऊक ?
३. मनुष्य आणि पशू यांतील भिन्नता
आमचे शास्त्रकार सांगतात, ‘मनुष्यात पशूंपेक्षा काही वेगळे असेल, तर तो आहे धर्म !’ हा मात्र पशूंना नाही. खातात सगळेच ! पण काय खावे ? केव्हा खावे ? कुठे खावे ? कसे खावे इत्यादी प्रश्नांची उत्तरे धर्म देतो. झोपतात सगळेच; पण कुठे झोपावे ? कसे झोपावे ? केव्हा झोपावे ? किती झोपावे इत्यादी प्रश्नांची उत्तरे धर्माकडून मिळतात.
भितो सगळेच; पण केव्हा भ्यावे अन् केव्हा भिऊ नये, कुठे भ्यावे आणि कुठे भिऊ नये, का भ्यावे अन् का भिऊ नये, हे धर्म सांगतो. तसेच विषयोपभोगाबद्दल ! कुठेही, कुणीही, कुणाच्याही समवेत, कशाही प्रकारे, केव्हाही विलास करावेत, हे शास्त्रसंमत नाही. हे धर्माला मान्य नाही. हे मानतो, तोच माणूस.
याचप्रमाणे संपूर्ण जीवनाच्या संदर्भातील सर्व मानवांना निश्चित हितावह होतील, असेच मार्ग धर्माने सांगितले आहेत.’
– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (न्यूयॉर्क २७.९.१९८०)