घरातून साधनेला विरोध असलेल्या कर्नाटक येथील एका साधिकेला आलेल्या अनुभूती

१. ६ फूट उंच कपाटावर असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ३ वेळा अकस्मात् भूमीवर पडणे आणि पू. रमानंद गौडा यांनी ‘तुमच्या घरात चांगली अन् वाईट शक्ती यांच्यात सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे सांगणे : ‘मी एकत्र कुटुंबात रहाते. मला साधना करण्यासाठी घरून विरोध आहे. त्यामुळे ‘प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे कोणाला दिसू नयेत’, यासाठी मी ती घरातील ६ फूट उंच कपाटावर मांडली आहेत. १.४.२०२२ या दिवशी मी देवघरात गेले होते. तेव्हा अकस्मात् तेथील ६ फूट उंच कपाटावर असलेले परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र भूमीवर पडले. वास्तविक त्या चित्रासमोर असलेले अन्य कोणतेच साहित्य खाली पडले नाही. असे या आधीही २ वेळा झाले आहे आणि या तिन्ही दिवशी अमावास्येची रात्र होती. त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवांनी मला मोठ्या आक्रमणापासून वाचवले आहे’, असे मला वाटले. मी सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांना ही अनुभूती सांगितल्यावर त्यांनी ‘तुमच्या घरात चांगली शक्ती आणि वाईट शक्ती यांच्यात सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे सांगितले.

‘परात्पर गुरुदेव माझी सतत काळजी घेत असतात’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.

२. समष्टी साधना होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करणे आणि घरातील सर्व जण काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने प्रतिदिन ८ ते १० घंटे समष्टी सेवा करता येणे : माझे यजमान माझा मानसिक छळ करत असल्याने मी पुष्कळ निराश झाले होते. माझी व्यष्टी किंवा समष्टी साधना होत नव्हती. मी सतत परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करत असे, ‘मला समष्टी साधना करता येण्यासाठी साहाय्य करा.’ परात्पर गुरुदेवांनी माझी प्रार्थना ऐकली. माझ्या घरातील प्रत्येक जण काही ना काही कामानिमित्त काही कालावधीसाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे मी प्रतिदिन ८ ते १० घंटे समष्टी सेवा करू शकत आहे. सेवेसाठी बाहेर पडण्यास आरंभ केल्यावर ‘समाजातील लोक काय म्हणतील ?’, अशी भीती आरंभी मला वाटली; मात्र आता मी परात्पर गुरुदेवांच्या कृपेने लोकांना धिराने सामोरे जाऊ शकते.

३. रामनाथी आश्रमात येण्यासाठी घरातून निघत असतांना आलेली अडचण गुरुकृपेने सुटणे आणि आश्रमात येऊ शकणे : ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी येत असतांना आदल्या रात्री माझी मुलगी अकस्मात् आजारी पडली. केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी अधिवेशनाच्या सेवेसाठी रामनाथी आश्रमात येऊ शकले.

४. रामनाथी आश्रम पहातांना आलेल्या अनुभूती

आज आश्रम पहातांना मला पुष्कळ आनंद होत होता. मला वाटत होते, ‘परात्पर गुरुदेव माझ्या समवेतच आहेत आणि तेच मला आश्रम दाखवत आहेत.’

– एक साधिका, कर्नाटक. (१०.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक