मावळ्यांचे विडंबन थांबवा !

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात सध्या लग्न सोहळ्यात वेटर, दरबान म्हणून मावळ्यांच्या वेशभूषेतील कामगार उभे केले जात आहेत. विविध ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापने मावळ्यांच्या वेशभूषेतील तरुणांना दैनंदिन रोजगारावर कामासाठी घेतात. शिवकालीन वेशभूषा, हातात भाला घेतलेले हे मावळे पाहुण्यांना मुजरा घालण्यासमवेत पडेल ती कामे याच वेशभूषेत करतात. मावळ्यांच्या वेशभूषेतील हे कामगार लग्नात अक्षता वाटप, वाढपी काम, नवरा-नवरी यांच्यावर छत्री धरणे, राजकीय पुढार्‍यांसमोर तुतारी वाजवणे, अशी कामे करतांना सर्रास दिसत आहेत. बहुतांशी हॉटेल बाहेर दरबान म्हणूनही मावळ्यांच्या वेशभूषेतील कामगारांना नेमले जाते. तेही येणार्‍या जाणार्‍या गिर्‍हाईकांना मुजरा करतात. विशेष म्हणजे हे सर्व कुणालाही अयोग्य वाटत नाही. खरेतर हे सर्व संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळे शूरवीर आणि लढवय्ये असत. नव्या पिढीसमोर अशा प्रकारे मावळे दिसतील, तर त्यांच्यासमोर मावळ्यांविषयी काय आदर रहाणार ? अशी कृती करतांना मावळे दिसल्यावर लढवय्या मावळ्यांची प्रतिमा ‘पडेल ती कामे करणारे’, अशी होणार. यामुळे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे हे एक प्रकारचे विडंबनच असून हे अपप्रकार तातडीने थांबवायला हवेत.

हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्या मावळ्यांनी जिवाचे रान केले, अशा मावळ्यांचा वेश परिधान करून त्यांनी वर उल्लेखलेली कामे करणे म्हणजे त्यांचे जाणीवपूर्वक विडंबन करण्यासारखे आहे. शिवप्रेमींनी यासाठी पुढाकार घेऊन शूरवीर मावळ्यांचे विडंबन करणारे हे अपमानास्पद अपप्रकार बंद केले पाहिजेत. केवळ गाडीवर शिवरायांची प्रतिमा लावून, शिवजयंतीला ढोल-ताशाच्या तालावर नाचून छत्रपती शिवरायांचा अभिमान बाळगता येत नाही. त्यासाठी डोळसपणे जिथे कुठे छत्रपती शिवरायांचा अथवा त्यांच्या मावळ्यांचा अवमान होत असेल, तर तो रोखणे आणि इतरांनाही त्याची जाणीव करून देणे, हे खरे शिवप्रेम अन् दायित्वही आहे.

छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणजेच महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाचा बघण्याचा आपला अभिमान कृतीतून दिसला पाहिजे. याउलट विदेशात अगदी अलीकडच्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसाही प्रेमाने जपला जातो. हिंदु राष्ट्रात असे अपप्रकार नसतील !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे