‘तबलावादक श्री. योगेश सोवनी (‘अलंकार’) यांच्या तबलावादनाचा संशोधनात्मक प्रयोगाच्या वेळी संगीत अन् नृत्य यांचा अभ्यास करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती

‘तबलावादक श्री. योगेश सोवनी (‘अलंकार’) यांच्या तबलावादनाचा आध्यात्मिक त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या साधकांवर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो ?’, या संशोधनात्मक प्रयोगाच्या वेळी संगीत अन् नृत्य यांचा अभ्यास करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती

श्री. योगेश सोवनी

२९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत तबलावादक श्री. योगेश सोवनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. त्या वेळी ‘त्यांच्या तबलावादनाचा आध्यात्मिक त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या काही साधकांवर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी त्यांच्या तबलावादनाचे संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांच्या वेळी त्यांनी विविध पेशकार, कायदे, रेले, बंदिशी (टीप) तबल्यावर वाजवल्या. त्या वेळी उपस्थित असलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत आणि नृत्य यांचा अभ्यास करणार्‍या साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. योगेश सोवनी यांचा परिचय

श्री. योगेश सोवनी हे उत्तम व्यावसायिक तबलावादक आहेत. ते मूळचे सांगली, महाराष्ट्र येथील असून सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी तबल्याचे आरंभीचे शिक्षण सांगली येथील श्री. रमेश गोखले आणि श्री. निशिकांत बडोदेकर यांच्याकडे घेतले. कालांतराने त्यांनी तबल्याचे पुढचे शिक्षण उस्ताद अल्लारखा, उस्ताद झाकिर हुसेन, पखवाज मास्टर पं. भवानी शंकर आणि पं. सुधीर माईणकर यांच्याकडे घेतले. तबल्यामध्ये त्यांनी ‘अलंकार’ ही पदवी प्राप्त केली आहे. श्रीमती प्रभा अत्रे, पं. सुरेश वाडकर, सतारवादक पं. शंकर अभ्यंकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना त्यांनी तबल्यावर साथ केली आहे. त्यांनी सांगली आणि मुंबई आकाशवाणीवर, तसेच अन्यत्रही एकल (सोलो) तबला वादनाचेही कार्यक्रम केले आहेत.

१. श्री. योगेश सोवनी यांचे एकल तबलावादन ऐकतांना आलेल्या अनुभूती

१ अ. ‘पेशकार’ हा प्रकार ऐकतांना आलेल्या त्रासदायक अनुभूती

१. माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी धडधड होत होती आणि मधे मध्ये मला चक्कर येत होती. – सौ. भक्ती कुलकर्णी, संगीत अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

(‘साधिकेला वाईट शक्तींचा त्रास आहे. तबलावादन ही आकाशतत्त्वाची साधना आहे. साधिकेला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला संगीतातील चैतन्य सहन झाले नाही. त्यामुळे तिला त्रास झाला.’ – संकलक)

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

१ आ. ‘पेशकार’ हा प्रकार ऐकतांना आलेल्या चांगल्या अनुभूती

१. श्री. सोवनी यांनी तबलावादनाला आरंभ करताच त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला सूक्ष्मातून एक मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) दिसली. त्यावर फुलांची चादर घातली होती. (श्री. सोवनी यांच्याशी बोलतांना ‘तबलावादनासाठी त्यांना चार मार्गदर्शक गुरु लाभले. त्यातील उस्ताद अल्लारखा खान (कुरेशी) हे एक आहेत’, असे समजले. ‘त्यांचा आशीर्वाद श्री. सोवनी यांना गुरुतत्त्व रूपात सदैव आहे’, असे मला जाणवले.)

२. माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवत होत्या.

३. या प्रकारात सगुण-निर्गुण तत्त्व असल्याचे जाणवले.

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (भरतनाट्यम् विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

४. गायन आणि नृत्य यांप्रमाणे तबलावादनाचीही फारुखाबाद, पंजाब, देहली, लखनऊ अशी विविध घराणी प्रसिद्ध आहेत.

श्री. सोवनी यांनी या विविध घराण्यांचे पेशकार वाजवले. त्यातील लखनौ घराण्याचा पेशकार ऐकतांना माझे मन निर्विचार झाले. – श्री. गिरिजय प्रभुदेसाई (संगीत विशारद (तबला)), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

५. त्यांनी वाजवलेल्या विविध घराण्यांच्या पेशकांरांपैकी लखनौ घराण्याचा पेशकार ऐकतांना अन्यांच्या तुलनेत अधिक चांगले वाटले. त्यात एकसंधता आणि कोमलता अधिक असल्याचे जाणवले. – सौ. सावित्री इचलकरंजीकर (नृत्य अभ्यासिका), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

६. पेशकार हा प्रकार ऐकतांना ‘निर्माण होणार्‍या आवाजाची घनता अधिक असून त्यात पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अधिक आहे’, असे वाटले. आरंभी वातावरणात दाब जाणवत होता. नंतर तो न्यून झाला. – श्री. मनोज सहस्रबुद्धे (वाद्य अभ्यासक), (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

७. प्रयोगाच्या आरंभी माझी सूर्यनाडी चालू होती. १५ मिनिटांनी मला चंद्रनाडी चालू झाल्याचे जाणवले. माझ्या डोक्याच्या डाव्या बाजूला संवेदना जाणवल्या. – कु. मयुरी आगावणे (संगीत अभ्यासिका), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

१ इ. ‘कायदा’ हा प्रकार ऐकतांना आलेल्या चांगल्या अनुभूती

१. विविध प्रकारचे ‘कायदे’ ऐकतांना शक्ती जाणवत होती.

– श्री. गिरिजय प्रभुदेसाई.

२. ‘कायदा’वादनाला आरंभ होताच माझ्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवल्या.

३. या प्रकारातून मारक तत्त्व प्रक्षेपित होत होते.

४. या प्रकारात उत्साह जाणवून माझे मन एकाग्र झाले.

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

५. या वादनाच्या वेळी माझ्या मनाला आनंद जाणवत होता. – श्री. मनोज सहस्रबुद्धे आणि सौ. अनघा जोशी (बी.ए. संगीत), (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

१ ई. ‘रेला’ हा प्रकार ऐकतांना आलेल्या चांगल्या अनुभूती

१. वादनाच्या वेळी हलकेपणा जाणवला. – सौ. भक्ती कुलकर्णी

१ उ. ‘बंदीश’ हा प्रकार ऐकतांना आलेल्या चांगल्या अनुभूती

१. द्रुत (जलद) लयीमध्ये विविध बंदिशी ऐकतांना आनंदाची स्पंदने जाणवत होती. – श्री. गिरिजय प्रभुदेसाई आणि श्री. मनोज सहस्रबुद्धे

२. या प्रकारच्या वादनातून मला आध्यात्मिक चैतन्य मिळत असल्यामुळे मला काही प्रमाणात अस्वस्थता जाणवत होती; परंतु वादनातून आनंदही जाणवत होता.

३. ‘तबला वादनामुळे निर्माण झालेल्या नादाची आस ( प्रत्यक्ष नाद थांबलेला असतांनाही त्या नादाचे सूक्ष्म गुंजन ऐकू येणे) या प्रकाराच्या वादनानंतर वातावरणात टिकून आहे’, असे मला जाणवले.

४. या वादनाने माझ्या मनाला आनंद आणि चैतन्य जाणवले.

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (क्रमशः)

टीप

१. पेशकार : तबलावादनातील बहुतेक सर्व बोलांच्या साहाय्याने विविध लयी आणि वजने (ठराविक लयीमध्ये केलेला आघात) यांच्या आधारे वादकाच्या प्रतिभेतून फुलत जाणारा तालबद्ध अन् तबलावादनात प्रारंभी वाजवला जाणारा प्रकार म्हणजे ‘पेशकार’.

२. कायदा : तालाच्या मूळ स्वरूपानुसार सिद्ध केलेली विशिष्ट बोलसमुहाची नियमबद्ध अन् विस्तारक्षम रचना म्हणजे कायदा. हा स्वतंत्र तबला-वादनातील मुख्य प्रकार आहे. ‘कायदा’ हा विलंबित आणि मध्य या लयीत (दुगुण किंवा चौगुण यांत) वाजवला जातो.

३. रेला : अत्यंत द्रुत लयीत वाजवला जाणारा, नियमबद्ध, विस्तारक्षम आणि नादांची साखळी निर्माण करणारा बोलसमूह म्हणजे ‘रेला’.

४. बंदीश : निसर्गातील विविध घटनांच्या गतीची (चालीची) अनुभूती देणारी तबल्याच्या भाषेतील काव्यमय रचना म्हणजे बंदीश.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक