व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या  (कै.) श्रीमती प्रभा कानस्कर (वय ७९ वर्षे) !

९.१२.२०२१ या दिवशी श्रीमती प्रभा कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना देवाज्ञा झाली. २२.१२.२०२१ या दिवशी कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर यांचा मुलगा श्री. हेमंत कानस्कर यांना जाणवलेली सूत्रे पाहिली. आज अन्य कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे पाहूया.

कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :https://sanatanprabhat.org/marathi/537101.html

सौ. अनुपमा हेमंत कानस्कर (कै. प्रभा कानस्कर यांची सून), भिलाई, जिल्हा दुर्ग, छत्तीसगड.

१. हाताला ‘सलाईन’ लावलेले असतांनाही आपोआप बोटांची मुद्रा होणे

सौ. अनुपमा कानस्कर

‘सासूबाईंच्या हाताला ‘सलाईन’ लावत असतांनाही त्यांच्या हाताची बोटे मुद्रा केलेल्या स्थितीत असायची. त्यामुळे त्यांचे हात १ – २ वेळा सुजले होते. त्यांना बोटे सरळ करायला सांगितल्यावर त्या मला म्हणायच्या, ‘‘बोटांची मुद्रा आपोआप होते. मी मुद्दाम करत नाही.’’

२. औषधांमुळे झोप येत असतांना नामजप वैखरी वाणीतून करणे

त्यांना औषध घेतल्यावर झोप यायची. औषध घेतल्यानंतर नामजप करतांना झोप येऊ नये; म्हणून त्या वैखरी वाणीतून (मोठ्याने) नामजप करायच्या. त्यांना सतत पुटपुटत नामजप केल्यामुळे दमायला व्हायचे, तरीही त्या ‘माझा नामजप पूर्ण व्हायला पाहिजे’, असे म्हणून प्रयत्नपूर्वक नामजप करायच्या.

कु. अंजली हेमंत कानस्कर (कै. कानस्करआजी यांची मोठी नात), भिलाई, छत्तीसगड.

१. छायाचित्रातील परात्पर गुरुदेव नमस्कार करत असल्याचे सांगितल्यावर डोळे उघडणे

कु. अंजली कानस्कर

तिला कोणीही हाक मारली किंवा डोळे उघडण्यास सांगितले, तर ती डोळे उघडायची नाही. ‘ती शस्त्रकर्माला घाबरू नये’, यासाठी आम्ही (मी आणि शर्वरी (माझी लहान बहीण, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) तिला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील परात्पर गुरु डॉक्टरांचे सिंहासनावर विराजमान असलेले नमस्कार करतांनाचे छायाचित्र दाखवले. नंतर शर्वरीने तिला सांगितले, ‘‘बघ आजी, परात्पर गुरुदेव तुला नमस्कार करत आहेत.’’ हे ऐकून तिने पटकन डोळे उघडले. आजीला अशक्तपणा असूनही तिने परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे बघून हात जोडून नमस्कार केला.

२. आजीचे निधन झाल्यानंतर जाणवलेली सूत्रे 

अ. ‘आजी गुरूंच्या अनुसंधानात आणि कृतज्ञताभावात आहे. तिच्या तोंडवळ्यावरून तेजरूपी प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

आ. एरव्ही मृतदेह पाहिल्यानंतर  माझ्या डोक्यावर दाब जाणवतो; पण आजीच्या साधनेमुळे असे त्रासदायक काही जाणवले नाही.’

कु. शर्वरी हेमंत कानस्कर (कै. कानस्कर आजी यांची छोटी नात, वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), भिलाई, छत्तीसगड.

१. आजीचे व्यष्टी साधनेविषयी असलेले गांभीर्य 

अ. आजी रुग्णालयात भरती असतांनाही भ्रमणभाषवर व्यष्टी साधनेच्या आढाव्याला जोडायची. एकदा आजी झोपली होती; पण व्यष्टी साधनेचा आढावा चालू होण्याआधी १० मिनिटे उठून तिने मला तिला आढाव्याला जोडून द्यायला सांगितले. आजी आढावा सत्संगात इतरांचा आढावाही लिहून घ्यायची.

आ. एकदा आजी मला म्हणाली, ‘‘माझा हात थरथरत असल्यामुळे आढावा लिहितांना माझे अक्षर व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मी आढावा सांगते आणि तू माझा आढावा लिहून काढ.’’ त्यानंतर तिने मला तिचा आढावा सांगितला आणि ‘मी आढावा व्यवस्थित लिहून घेतला आहे ना ?’, यासाठी २ वेळा माझा पाठपुरावा घेतला.

कु. शर्वरी कानस्कर

२. आजीची रुग्णालयात असतांना असलेली दिनचर्या !

अ. आजीला प्रतिदिन ३ – ४ बाटल्या ‘सलाईन’ लावावे लागायचे. तेव्हा तिला त्रास व्हायचा. त्या वेळी ती भावप्रयोग करायची, ‘सलाईन’च्या माध्यमातून देव शरिरात भरभरून चैतन्य पाठवत आहे. हे सगळे चैतन्य माझ्या शरिरात गेल्यावर मला गुरुसेवा करण्यासाठी शक्ती, बळ आणि स्फूर्ती मिळणार आहे.’

आ. ती ठराविक अंतराने स्वयंसूचनांची सत्रे करायची. झोपण्यापूर्वी ती ‘दिवसभरात किती सत्रे झाली ?’ हे मोजून आत्मनिवेदन करायची. त्यानंतर ती निद्रादेवीचा श्लोक म्हणून झोपायची.

 ३. आजीमध्ये जाणवलेला पालट 

तिच्या केसांचा स्पर्श मऊ जाणवायचा आणि केसांचा रंग पिवळा अन् सोनेरी झाला होता.

४. आजीचे निधन झाल्यानंतर जाणवलेले सूत्र

आजीचे निधन झाल्यानंतर ‘तिचा तोंडवळा पाहून काय वाटते ?’, असे बघण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा ‘आजी नेहमीप्रमाणे शांत झोपली असून ती गुरुदेवांचे स्मरण करत आहे’, असे मला जाणवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आजीची ही गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !              (समाप्त)

(सर्व सूत्रांचा दिनांक १६.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक