श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ श्री भवानीदेवीची पूजा करतांना आणि देवीच्या मिरवणुकीच्या वेळी कु. वर्षा जबडे यांना जाणवलेली सूत्रे अन् त्यांनी अनुभवलेले दैवी विश्व !

‘१९.१.२०२० या दिवशी पारपतीवाडा (बांदोडा) येथून सायंकाळी ५.२५ वाजता ‘श्री भवानीदेवीचा विजय असो’, ‘जय भवानी, जय अंबे’, असा देवीचा जयघोष करत फुलांनी सजवलेल्या वाहनातून श्री भवानीदेवीच्या मूर्तीची मिरवणूक रामनाथी आश्रमापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीच्या आरंभी सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देवीला पुष्पहार अर्पण करून तिचे औक्षण केले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री भवानीदेवीला औक्षण करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. जाणवलेली सूत्रे

१ अ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्री भवानीदेवी या दैवी लोकांतून पृथ्वीवर येऊन एकमेकींना भेटत आहेत’, असे त्यांच्या मुखावरचे हास्य पाहून जाणवणे : देवी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई या दोघींच्या मुखावर हास्य होते. ज्याप्रमाणे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला पुष्कळ वर्षांनी भेटल्यावर आनंद होतो, त्याप्रमाणे ‘या दोघी दैवी लोकांतून पृथ्वीवर येऊन एकमेकींना भेटत आहेत’, असे त्यांच्या मुखावरचे हास्य पाहून जाणवले. त्या वेळी मला आनंद वाटत होता.

कु. वर्षा जबडे

१ आ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या भावाप्रमाणे देवीच्या मुखावरील भाव पालटत आहेत’, असे जाणवणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई देवीचे औक्षण करतांना त्यांच्या तोंडवळ्यावर वात्सल्यभाव जाणवत होता. ‘त्या वात्सल्यभावाने त्या देवीची सेवा करत आहेत. त्यामुळे देवीच्या मुखावरही तसे भाव उमटत आहेत. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई देवीला विचारून तिच्या आगमनाची सेवा करत आहेत आणि देवीही त्यांना तसा प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘देवी केवळ मूर्तीतच सीमित राहिली नसून ती येथे साक्षात् उभी आहे. देवी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे प्रत्यक्षात काहीतरी संभाषण चालू आहे’, असेही मला जाणवले. त्या वेळी ‘हा सोहळा वेगळ्याच कोणत्यातरी विश्वात होत आहे’, असे मला वाटले. हे सर्व अनुभवत असतानांच श्रीसत्‌शक्ति बिंदाताई साधकांना म्हणाल्या, ‘‘देवीच्या मुखावरील भाव सतत पालटत आहेत.’’ त्या वेळी मला वाटले, ‘जसा श्रीसत्‌शक्ति बिंदाताईंचा भाव आहे, तसे देवीच्या मुखावरील भाव पालटत आहेत.’

१ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देवीला नमस्कार केल्यावर ‘देवीची सर्व साधकांवर अपार कृपा असून ती साधकांना आशीर्वाद देत आहे’, असे जाणवून देवीप्रती सतत कृतज्ञता वाटणे : शेवटी श्रीसत्‌शक्ति बिंदाताईंनी देवीला नमस्कार केला. तेव्हा ‘देवी सर्व साधकांना आशीर्वाद आणि चैतन्य देत आहे, तसेच तिची सर्व साधकांवर अपार कृपा आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे मला देवीप्रती आतून सतत कृतज्ञता जाणवत होती.

२. मिरवणुकीच्या वेळी देवीचा जयघोष करतांना देवी साधकांमध्ये वीरश्री निर्माण करत असल्याचे जाणवणे

मिरवणुकीच्या वेळी आम्ही ‘श्री भवानीदेवीचा विजय असो’, ‘जय भवानी, जय अंबे’ असा देवीचा जयघोष करत होतो. त्या वेळी ‘देवी आमच्यात वीरश्री निर्माण करत आहे’, असे मला जाणवले.

३. मिरवणुकीच्या वेळी मन निर्विचार होऊन दैवी विश्व अनुभवणे

मी मिरवणुकीतील सेवा करत असतांना त्या सहजतेने आणि भावपूर्ण होत होत्या. त्यासाठी मला आवर्जून भाववृद्धीसाठी वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले आणि मला स्वतःचा विसर पडून दैवी विश्व अनुभवता आले.

‘हे गुरुमाऊली, तू मला असेच सतत दैवी विश्वात रहाता येण्यासाठी पात्र बनव’, अशी तुझ्या चरणी शरणागतीने प्रार्थना करते.’  – कु. वर्षा जबडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक