गोव्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी परिसर जलमय : राज्यात एकूण ५३ इंच पावसाची नोंद

गोवा राज्यात ‘ऑरेंज ॲलर्ट’ घोषित

पणजी, १३ जुलै (वार्ता.) – राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. राजधानी पणजी शहरातही अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ५३ इंच पावसाची नोंद झाली आहे आणि ही नोंद सरासरीपेक्षा किंचित अधिक आहे. गोवा वेधशाळेने १५ जुलैपर्यंत राज्यात ‘ऑरेंज ॲलर्ट’ घोषित केला आहे.

पणजी शहरातील सखल भाग आणि रस्ते पाण्याखाली

पणजी शहरातील सखल भाग आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहरातील ‘१८ जून’ हा रस्ता पाण्याखाली गेला आहे, तर काही दुकानांमध्ये पाणी गेले आहे. मळा येथील सखल भागात पाणी साचल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाणी साचल्याने मिरामार ते दोनापावला रस्ता, ताळगाव, शंकरवाडी, करंजाळे येथील अंतर्गत रस्ता येथे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने लोकांची गैरसोय झाली.

जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे सत्तरी तालुक्यात पूरसदृश स्थिती

गेले २ दिवस सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने नदीचे पाणी वाढले असून पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्राप्त माहितीनुसार येथे मागील २४ घंट्यांत ७ इंच पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील म्हादई, वाळवंटी, रगडा आणि वेळूस या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाण्याची पातळी धोकादायक स्थितीत पोचल्याने सरकारी यंत्रणाही सतर्क झाली आहे. वाळपई नगरपालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे आणि यामुळे वाहतुकीवर पूर्णपणे परिणाम झाला आहे. गोवा-बेळगाव रस्त्यावर चोरला भागात कोणत्याही क्षणी दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिसुर्ले, सत्तरी येथील अनुराधा परवार यांचे घर कोसळले आहे.