‘ऑनलाईन’ शिक्षणातील गुणवत्ता वाढवा !

दळणवळण बंदीमुळे चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ शिक्षणप्रणालीला जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले आहे; मात्र एवढा मोठा काळ उलटूनही सर्व विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ शिक्षण व्यवस्थित मिळत नाही, हे दुर्दैव आहे. एवढेच नव्हे, तर शिक्षणापासून वंचित असलेल्या ३५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचवण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. प्राथमिक शिक्षणातील गळतीचे प्रमाणही या वर्षभरात वाढले आहे. यावर प्रशासनाने गांभीर्याने अभ्यास करून त्वरित उपाययोजना काढायला हवी.​

१ ली ते ४ थी या इयत्तांमध्ये विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता चांगली असते. याच वयामध्ये मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण करायला हवी; मात्र ‘ऑनलाईन’ शिक्षणाद्वारे हे होतांना दिसत नाही. पालकांनी मुलांना कितीही अभ्यास करण्यास सांगितले, तरी त्याचा विशेष परिणाम होत नाही. ‘सोनारानेच कान टोचावे लागतात’, या म्हणीप्रमाणे शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी गांभीर्य आणि गोडी निर्माण करू शकतात; पण ‘ऑनलाईन’ शिक्षणामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संवादच दुर्मिळ झाला आहे.

​त्यामुळे शिक्षण विभागाने ‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धतीतील त्रुटी टाळण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना काढून त्याची घडी बसवणे आवश्यक होते; परंतु तसे न होणे, हे चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील मुलांना ‘ऑनलाईन’ शिक्षण घेण्यात अडचणी आहेत. त्यांच्याकडे आधुनिक साहित्य उपलब्ध नाही, तसेच ‘इंटरनेट’ची समस्याही आहे. सर्व यंत्रणा हाताशी असतांना या समस्यांवर उपाययोजना न निघणे, ही असंवेदनशीलताच आहे. शिक्षकांनी पालकांना विश्वासात घेऊन मुलांची शिक्षणातील गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पूर्वीच्या काळी गुरु-शिष्य परंपरेत गुरु शिष्याला असे शिक्षण देत असत की, आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीत त्याला गुरूंनी दिलेल्या शिकवणीची जाणीव होत असे आणि त्याप्रमाणे तो प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कृती करत असे. हाच आदर्श समोर ठेवून शिक्षण विभाग आणि प्रशासन यांनी काळासमवेत योग्य ती पावले उचलून ‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धतीतील गुणवत्ता वाढवणे अपरिहार्य आहे.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर