Ukraine Russia War : चीन रशियाला शस्त्रे पुरवत आहे ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

युक्रेन-रशिया युद्ध

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

सिंगापूर – युक्रेन-रशिया युद्धात चीन रशियाला पाठिंबा देत आहे. चीन रशियाला शस्त्रे पुरवत आहे. चीनच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध दीर्घकाळ चालणार आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी येथे सांगितले. सिंगापूरमध्ये आयोजित ‘शांग्री ला डायलॉग’मध्ये बोलतांना झेलेंस्की यांनी ही माहिती दिली.

१. झेलेंस्की म्हणाले की, चीननेे हे पाऊल उचलल्यामुळे जगात चुकीचा संदेश गेला आहे. चीनची धोरणे चुकीची असल्याचे सिद्ध होते. एखाद्या देशाला नष्ट करण्यासाठी शस्त्रे देणे किंवा पाठिंबा देणे ही चांगली गोष्ट नाही.

२. चीन सातत्याने रशियाला शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचा आरोप अमेरिकेनेही केला आहे. यासाठी चीनला अनेकदा चेतावणी देण्यात आली आहे; मात्र चीनने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

३. झेलेंस्की यांनी एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना १५ आणि १६ जून या दिवशी स्वित्झर्लंडमध्ये होणार्‍या युक्रेनसाठी आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

युक्रेन-रशिया युद्धात साहाय्य केल्यामुळे पुतिनकडून चीनचे कौतुक !

या वर्षी मे महिन्यात व्लादिमीर पुतिन यांनी पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार सांभाळल्यानंतर चीनला भेट दिली. या भेटीपूर्वी त्यांनी युक्रेनविरुद्धच्या युद्धात साहाय्य केल्यामुळे चीनचे कौतुक केले होते. या भेटीत पुतिन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांत व्यापार वाढवण्यावर सहमती दर्शवली.