देवभक्‍ती !

‘सध्‍याचे युग हे आधुनिक विचारांचे आहे’, असे वारंवार ऐकण्‍यास मिळते. यात काही जण देवाला मानतात, तर काही जण मानत नाहीत. जे मानत नाहीत, त्‍यांचा पूर्ण विश्‍वास त्‍यांच्‍या मेहनतीवर असतो. ‘देव वगैरे काही नसते, या सर्व काल्‍पनिक कथा आहेत’, असे त्‍यांना वाटते. जे देवाला मानतात, त्‍यांच्‍याविषयी पाहूया. देवाला नमस्‍कार करणे, तुळशीला पाणी घालणे, संकष्‍ट चतुर्थीला उपवास करणे, मंदिरासमोरून जातांना नमस्‍कार करणे, आठवड्यातून एकदा आवडत्‍या देवाच्‍या मंदिरात जाणे, प्रतिवर्षी गणपतीला गावाला जाणे, नवरात्रीत उपवास करणे, एवढे केले की, देवाची भक्‍ती झाली, असे चित्र विशेषतः तरुणाईत पहाण्‍यास मिळते. ‘काळानुसार साधना केली, तर ती अधिक फलदायी असते’, असे शास्‍त्र सांगते. कलियुगात काळानुसार नामजप ही सर्वोत्तम साधना आहे. सध्‍या बहुतांश लोक देवभक्‍ती म्‍हणून ज्‍या कृती करत आहेत, त्‍या निश्‍चित चांगल्‍या आहेत; पण त्‍या पुरेशा नाहीत, हे त्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्‍या कृतींना त्‍यांनी नामस्‍मरणाची जोड दिली पाहिजे. त्‍यामुळे मन शांत, स्‍थिर रहाण्‍यास साहाय्‍य होणार आहे; मात्र नेमक्‍या याच सूत्राचा अभाव आहे. कित्‍येकदा बर्‍याच जणांनी ‘मी जे करतो त्‍या मर्यादेपुढे मला जायचे नाही’, हे मनाने ठरवलेले असते.

पदवी प्राप्‍त केल्‍यावर अपेक्षित नोकरी मिळण्‍यासाठी बाजारात सध्‍या ज्‍या गोष्‍टीला मागणी आहे, त्‍यानुसार शिक्षण घेतले जाते, प्रसंगी आवश्‍यक शिकवण्‍या लावल्‍या जातात, अद्ययावत् रहाण्‍यासाठी मायाजाल (इंटरनेट), मित्र परिवार यांच्‍या साहाय्‍याने संबंधित माहिती घेतली जाते. सर्व तांत्रिक गोष्‍टी अद्ययावत् वापरण्‍याकडे कल असतो. एवढा सर्व खटाटोप व्‍यावहारिक जगात तग धरण्‍यासाठी केला जातो. तसेच आपण जी साधना करतो, ती काळानुसार योग्‍य अशीच करणे आवश्‍यक आहे. ज्‍या देवामुळे मी या पृथ्‍वीवर आलो त्‍याच्‍यासाठी मी किती वेळ देतो ? हे पाहिले पाहिजे. बहुतांश वेळ आपण स्‍वतःसाठीच देतो. घंटो न् घंटे सामाजिक माध्‍यमांवर वेळ घालवतोे. ‘मनुष्‍यजन्‍माचा उद्देश साधना करून ईश्‍वरप्राप्‍ती करणे हा आहे’, हे ज्ञान ना शाळेत शिकवले जाते ना घरी. केवळ देवळाबाहेर अनेक घंटे रांगा लावणे किंवा उपवास करणे एवढी साधना पुरेशी नाही, तर देवाची भक्‍ती करण्‍यासाठी दिवसभर त्‍याचे स्‍मरण, त्‍याला प्रार्थना करणे, योग्‍य आचारण (वागणे-बोलणे), योग्‍य पेहराव करणे, योग्‍य केशभूषा, वेशभूषा करणे आदी धर्माचरण करणेही आवश्‍यक आहे. नामजप आणि धर्माचरण यांच्‍या माध्‍यमातून केलेली देवभक्‍ती ही काळानुसार योग्‍य साधना आहे.

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.