परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतःला ‘गुरु’ समजत नसण्यामागील आध्यात्मिक कारणे

१. सतत शिष्यभावात असणे

श्री. राम होनप

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांची सेवा मनोभावे केली. त्यांनी गुरूंनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार साधना केली आणि अखंड शिष्यभाव आत्मसात् केला. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधना करून ‘मोक्षपद’ किंवा ‘परात्पर गुरुपद’ प्राप्त केले, तरीही त्यांच्यात शिष्यभावाचा संस्कार टिकून राहिला. त्यामुळे त्यांच्यात गुरुपदाचा अहंभाव निर्माण झाला नाही.

२. सतत शिकण्याच्या स्थितीत असणे

‘ईश्वर अनंत असून त्याचे कार्य आणि ज्ञान अनंत आहे’, हे जाणून परात्पर गुरु डॉक्टर विविध प्रसंगांतील ईश्वरेच्छा अन् त्यामागील कार्यकारणभाव समजून घेण्याचा प्रयत्न करतात, तसेच अन्य संतांकडून मार्गदर्शन घेत असतात. त्यांच्यातील या शिकण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्यात अहं निर्माण होत नाही.

३. ईश्वरी कार्याचा कर्तेपणा नसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले सहस्रो साधकांची आध्यात्मिक प्रगती करवून घेत आहेत. त्यांचे लक्ष सर्वत्रच्या साधकांच्या समवेत साधना आत्मसात् करू इच्छिणार्‍या जिज्ञासूंकडेही आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचे आध्यात्मिक कार्य व्यापक स्वरूपात चालू असून ते जगद्गुरूंप्रमाणे कार्य करत आहेत; परंतु त्यांच्यात त्याविषयीचा कर्तेपणा नसल्याने ते स्वतःला गुरु समजत नाही किंवा तसा विचार त्यांच्या मनात येत नाही.

४. गुरुपणाचा सात्त्विक अहं नष्ट झालेला असणे

साधकाला साधना करून कालांतराने ‘गुरुपद’ प्राप्त होते. तेव्हा त्या जिवाला ईश्वरी कार्य करतांना गुरुपदाचा सात्त्विक अहं निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा जिवाची पुढील आध्यात्मिक वाटचाल खुंटण्याची शक्यता असते. परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेली ‘अखंड साधना आणि अत्युच्च भक्ती’, यांमुळे त्यांच्यातील गुरुपणाचा सात्त्विक अहं नष्ट झालेला आहे.

५. सर्वकाही ईश्वर करत असल्याची निस्सीम श्रद्धा असल्याने ‘मी गुरुस्थानी आहे’, याची जाणीव नसणे

परात्पर गुरु डॉक्टरांची अखंड आंतरिक साधना आणि भक्ती आहे. त्यामुळे त्यांची ‘सर्वकाही ईश्वर करत आहे’, अशी निस्सीम आणि अतूट श्रद्धा आहे. या श्रद्धेमुळे त्यांना ‘मी गुरुस्थानी आहे’, याची जाणीव नाही, तसेच त्यांच्यात परात्पर गुरुपदाचा अहंभाव निर्माण होत नाही.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक