रुग्णाईत असतांनाही इतरांचा विचार करणार्‍या आणि परिस्थिती सहजतेने स्वीकारणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कै. (सौ.) अनिता प्रकाश घाळी (वय ६७ वर्षे) !

१२.४.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. अनिता प्रकाश घाळी (वय ६७ वर्षे) यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. २१.४.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्यानिमित्त त्या रुग्णाईत असतांना त्यांच्या सेवेत असणार्‍या साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. अनिता घाळी

१. काकूंकडे पाहून ‘त्या रुग्णाईत आहेत’, असे न जाणवणे

२४.३.२०२२ या दिवशी सौ. अनिता घाळीकाकू रुग्णालयात अतीदक्षता विभागात होत्या. तेव्हा रात्रीच्या वेळी त्यांना साहाय्य व्हावे; म्हणून मी त्यांच्या समवेत गेले होते. त्या वेळी ‘त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहून त्या एवढ्या आजारी आहेत’, असे मला वाटले नाही.

कु. गीतांजली काणे

२. स्वतः रुग्णाईत असूनही इतरांचा विचार करणे

मला काकूंच्या खोलीच्या बाहेर झोपायचे होते. त्या वेळी त्यांनी ‘तुला व्यवस्थित जागा आहे ना ?’, अशी माझी विचारपूस केली. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांनी ‘तुला व्यवस्थित झोप लागली ना ?’, असे विचारले. त्यांनी मला ‘रुग्णालयाच्या जवळच चांगला चहा मिळतो’, असे सांगून चहा पिऊन यायला सांगितले. त्यांच्यासाठी अल्पाहाराचा डबा आल्यावर त्या त्यातील पदार्थ माझ्यासाठीही काढून ठेवत असत.

३. परिस्थिती सहजतेने स्वीकारणे

काकूंची ‘अँजिओप्लास्टी’ (टीप) करण्यासाठी दुसर्‍या रुग्णालयात न्यायचे होते. काकूंना त्याविषयी काळजी वाटत नव्हती. त्यांनी ती स्थिती सहजतेने स्वीकारली होती. प्रत्यक्षात काकूंना तीव्र आणि आध्यात्मिक त्रास होता.

टीप – हृदयाकडे रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिनीमधील अडथळा दूर करण्यासाठी केलेले शस्त्रकर्म

४. या कालावधीत काकूंमधील ‘प्रेमभाव, स्थिरता आणि गुरूंवरील श्रद्धा’, हे गुण माझ्या लक्षात आले.

५. ‘काकूंची आंतरिक साधना चांगली चालू आहे’, असे मला जाणवले.

– कु. गीतांजली काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२२)


पत्नीच्या आजारपणात शांत आणि स्थिर राहून तिची मनापासून सेवा करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश घाळी (वय ७३ वर्षे) !

डॉ. प्रकाश घाळी

१. पत्नीचे आजारपण सहजतेने स्वीकारणे : सौ. अनिता प्रकाश घाळी रुग्णालयात असतांना त्यांचे पती श्री. प्रकाश घाळीकाका यांच्याशी माझी रुग्णालयात भेट झाली. तेव्हा ते पुष्कळ स्थिर आणि शांत दिसत होते. त्यांनी काकूंचे आजारपण सहजतेने स्वीकारले होते.

२. काकूंना साहाय्य करणार्‍या साधकांचे सतर्कतेने आणि तत्परतेने नियोजन करणे : ‘रुग्णालयात काकूंच्या साहाय्यासाठी येणार्‍या साधकांना अडचण येऊ नये; म्हणून साधकांनी येतांना कोणत्या गोष्टी आणायला हव्यात ?’, याविषयी काका साधकांना सांगत होते. ‘निवासस्थानाहून रुग्णालयात ये-जा करण्यासाठी वाहन चालवणार्‍या साधकांशी समन्वय करणे, महाप्रसादाच्या डब्याचे निरोप देणे आदी गोष्टी काका सतर्क राहून आणि तत्परतेने करत होते.

३. निरपेक्षता : ‘साधकांचा सेवेचा वेळ जाऊ नये’, यासाठी काकांनी बर्‍याच गोष्टी एकट्याने हाताळल्या. त्यांनी अत्यावश्यक असेल, तेव्हाच साधकांचे साहाय्य घेतले. ते म्हणत असत, ‘‘साधकांचे नियोजन होत असेल, तर पहा; नाहीतर मी करतो.’’ त्यांची साधकांकडून कोणतीच अपेक्षा नव्हती.

४. काकूंची सेवा मनापासून करणे : काकांनी काकूंची अतिशय मनापासून सेवा केली. काकूंना तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे त्यांची चिडचिड होत असे. काकांनी काकूंना गेली अनेक वर्षे प्रेमाने समजून घेतले.

५. ‘गुरुदेवांची कृपा आणि काकांमधील प्रेमभाव अन् चैतन्य यांमुळे काकूंमध्ये सकारात्मक पालट झाला होता’, असे मला वाटले.

६. काकांच्या बोलण्यात ‘स्थिरता, प्रेमभाव, तत्त्वनिष्ठता आणि गुरूंप्रती श्रद्धा’, हे गुण प्रकर्षाने जाणवतात.

‘गुरुदेवा, ‘श्री. घाळीकाका आणि कै. (सौ.) घाळीकाकू यांच्यामधील गुण आम्हाला आत्मसात् करता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.

– कु. गीतांजली काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२२)