हिंदूंनो, जागृत व्हा !

काही दिवसांपूर्वी पुणे येथे ध्वनीक्षेपकाच्या भिंती उभारू दिल्या नाहीत; म्हणून एका मंडळाच्या कार्यकर्त्यांना राग आला आणि त्यांनी चारचाकी गाडी रस्त्याच्या मधोमध लावून काही वेळासाठी मुख्य रस्ताच बंद केला. यामुळे वाहतूक कोंडी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. सार्वजनिक उत्सवांमध्ये वरील प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे उत्सवांचे होत असलेले विद्रूपीकरण पहायला मिळते. ‘आज आपण सार्वजनिक उत्सवांच्या मूळ उद्देशांपासून भरकटत चाललो आहोत’, असेच वाटते.

सध्या ‘पावनखिंड’ हा चित्रपट पहाण्यासाठी गर्दी होत आहे; पण मुळात विशाळगड आणि प्रतापगड यांवर अन्य धर्मियांच्या होणार्‍या अतिक्रमणाकडे कुणी लक्ष देत नाही. त्यावर कुणी उपाययोजना काढत नाहीत. ‘शिवरायांच्या महाराष्ट्रात माता-भगिनींवर बलात्कार होतात आणि निर्दयी हिंदु समाज मूग गिळून गप्प कसा बसतो ?’, असे विचार प्रखर हिंदु धर्माभिमान्याच्या मनात आल्यावाचून रहात नाहीत.

‘पावनखिंड’ चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना खरेच अभिवादन करायचे असेल, तर वर्षाचे ३६५ दिवस अपुरे पडतील, इतके विषय सध्या चर्चेत आहेत. त्यात त्यांचा इतिहास म्हणजेच युद्धकौशल्य, राजनीती, प्रशासकीय यंत्रणा, मूलभूत सोयींसाठी त्यांचे असणारे नियोजन हे सर्व विषय विद्यार्थी आणि तरुणपिढी यांच्यापर्यंत पोचावे, यांसाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करायला हवेत. यामध्ये शाळेच्या अभ्यासक्रमापासून ते दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट, सार्वजनिक उत्सवांमधील देखावे अशा अनेक प्रकारे प्रयत्न केले जाऊ शकतात. गड-दुर्गांची झालेली दुरवस्था रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ? यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत.

शिवरायांच्या मावळ्यांनी आपल्यासाठी जे स्वराज्य उभारले, त्याचे सध्याचे स्वरूप पहाता तरुणांना हिंदूंवर होणारी अनेकविध प्रकारची आक्रमणे, गड-दुर्गांची स्थिती, महिलांवर होणारे अत्याचार यांविषयी चीड येणे आणि ते पालटण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तेव्हा हिंदूंनो उठा, जागृत व्हा आणि छत्रपती शिवरायांना अपेक्षित अशी वीरश्री धारण करून त्यांना अपेक्षित असलेली राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य दिले; पण आता सुराज्य म्हणजेच रामराज्य आणण्यासाठी स्वतःला झोकून देऊया !

– श्री. जयेश बोरसे, पुणे