१. सतर्कता आणि इतरांचा विचार करणे
अ. ताईंचे भोजनकक्षातील जेवणाच्या पटलाकडे सतत लक्ष असते. पटलावरील भात, भाजी किंवा अन्य पदार्थ संपलेले असतील, तर ताई ते पदार्थ लगेच पटलावर आणून ठेवतात. त्यामुळे साधकांना सर्व पदार्थ वेळेत मिळतात.
आ. ताई कधी कधी जेवणाचे ताट वाढून घेतात आणि त्या वेळी पटलावरचा एखादा पदार्थ संपलेला असतो. तेव्हा त्या लगेच आपले वाढलेले ताट बाजूला ठेवतात आणि प्राधान्याने संपलेला पदार्थ पटलावर आणून ठेवतात. नंतर त्या स्वतः जेवायला बसतात.
२. भाव
एकदा पू. रेखाताई (सनातनच्या संत पू. रेखा काणकोणकर) आणि ताईंना साहाय्य करणारी सहसाधिका सेवेला आली नव्हती. त्या वेळी मी आणि ताई सेवा करत होतो. त्या दिवशी आम्हाला सेवेला आरंभ करण्यास उशीर झाला होता. त्या दिवशी ‘बॉयलर’ची सेवा, भाजी, आमटी आणि पथ्याचे पदार्थ बनवणे आणि अन्य सेवांकडे लक्ष देणे’, अशा अनेक सेवा होत्या. त्यामुळे ‘हे सर्व वेळेत होईल ना ?’, असा विचार माझ्या मनात चालू होता; परंतु ताईंना जराही ताण आला नव्हता. त्या सेवा स्थिर राहून करत होत्या. आमच्या सेवेला उशिरा प्रारंभ झाला, तरी ठरलेल्या वेळेत सर्व जेवण तयार होते. याचे मला आश्चर्य वाटले; म्हणून मी ताईंना विचारले, ‘‘ताई, आज साधक अल्प होते, तरी सर्व वेळेत कसे झाले ?’’ तेव्हा ताई म्हणाल्या, ‘‘देवानेच सर्व करवून घेतले आणि देवाच्या कृपेनेच झाले.’’
३. इतरांना साहाय्य करणे
त्या स्वतः लक्षपूर्वक सेवा करतात आणि इतर साधकांच्या सेवेकडेही लक्ष देतात. सेवा वेळेत पूर्ण होण्यासाठी त्या इतर साधकांना सेवेत साहाय्य करतात.
४. सेवेची तळमळ
ताई सेवा करतांना इतरांवर अवलंबून रहात नाहीत. त्या ‘बॉयलर’मधून भात आणि आमटी काढणे, जेवण गरम रहाण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी (हॉटकेस) उचलणे इत्यादी सेवा करतात. मोठी पातेली उचलण्यासाठी त्या इतरांना साहाय्य करतात.
– श्री. सुकेश गुरव, नंदीहळ्ळी, बेळगाव. (८.११.२०१९)