‘३०.४.२०२१ या दिवशी पुणे येथील साधक मोहन चतुर्भुज (वय ६७ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे निधन झाले. त्यांची कन्या सुगम संगीत विशारद कु. मधुरा चतुर्भुज हिला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, तरीही वडिलांच्या निधनाच्या कठीण प्रसंगाला ती स्थिरतेने आणि धैर्याने सामोरे गेली. त्या वेळी तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि तिच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
१. मधुराला तिच्या वडिलांच्या संदर्भात अनिष्ट घडणार असल्याची पूर्वसूचना मिळणे अन् त्यामुळे ती वडिलांच्या निधनाच्या वेळी स्थिर असणे
कु. मधुरा हिला वडिलांचे निधन होण्याच्या २ दिवस आधी ‘वडिलांच्या संदर्भात काहीतरी अनिष्ट घडणार आहे’, असे जाणवले होते. त्यामुळे तिच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा ती बरीच स्थिर होती. तिने आम्हाला देवाने तिला वडिलांच्या निधनाविषयी दिलेल्या पूर्वसूचनेविषयी सांगितले होते. ‘देवाने तिला वडिलांच्या निधनाची पूर्वसूचना देऊन तिच्या मनाची आधीच सिद्धता करवून घेतली होती’, असे आमच्या लक्षात आले.
२. आध्यात्मिक त्रास असूनही वडिलांच्या निधनाच्या वेळी स्वतः स्थिर रहाणे आणि आईलाही साधनेचे दृष्टीकोन देऊन धीर देणे
कु. मधुराला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे; परंतु वडिलांच्या निधनाच्या वेळी ती बरीच स्थिर होती. वास्तविक तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना अशा कठीण प्रसंगात स्थिर रहाता येणे कठीण जाते; परंतु ‘देवानेच तिला आतून स्थिर ठेवले’, असे आम्हाला जाणवले. एवढेच नाही, तर वडील गेल्याचे कळल्यावर तिने स्वतःला सावरले आणि ‘देव बाबांना सांभाळणार आहे अन् त्यांना पुढे नेणार आहे. आपण रडून त्यांना आपल्यात अडकवायला नको’, असे सांगून ती आईला धीर देत होती.
३. वडिलांच्या निधनानंतरचे विधी पूर्ण झाल्यावर मधुराने पुनश्च व्यष्टी साधनेची घडी बसवणे
वडिलांच्या निधनानंतरचे सर्व विधी पूर्ण झाल्यावर त्यांच्या विचारांत अडकून न रहाता तिने नामजपादी उपाय, स्वयंसूचना सत्रे आणि सेवा यांची घडी पुनश्च बसवली. एवढ्या लवकर या कठीण प्रसंगात स्थिर राहून व्यष्टी साधनेची घडी बसवणे, ही तिच्यावर असलेली देवाची कृपाच आहे.
४. प्रामाणिकपणे आढावा देणे
मधुरामध्ये प्रामाणिकपणा आहे. साधना आणि संगीताचा सराव यांचे तिच्याकडून जेवढे प्रयत्न झाले, तेवढ्याचा ती प्रामाणिकपणे आढावा देते.
५. वडिलांच्या निधनानंतर कु. मधुरामध्ये जाणवलेले पालट
५ अ. मधुरा आणि तिची आई यांना वेगवेगळ्या खोलीत रहायला सांगितल्यावर मधुराने ते आनंदाने स्वीकारणे : आधी मधुराला मानसिक आधार लागायचा. त्यामुळे तिची आई तिच्या समवेत रहायची; परंतु आता ‘तिला स्वावलंबी होऊन त्रासाशी लढता यावे’, या दृष्टीने तिला आणि तिच्या आईला वेगवेगळ्या खोलीत रहाण्यास सांगितले आहे. तिने तो निर्णय आनंदाने स्वीकारला. ‘देवाच्या कृपेने मला निराळ्या खोलीत रहाणे जमणारच आहे’, अशी तिची श्रद्धा आहे. तिच्या श्रद्धेमुळेच आता तिला आईला सोडून एकटे रहाणे सहज शक्य होत आहे.
५ आ. आध्यात्मिक त्रासांशी लढण्याचे प्रयत्न वाढणे : पूर्वी मधुराला मानसिक आधार लागत असल्यामुळे तिची आध्यात्मिक त्रासांशी लढण्याचे प्रयत्न न्यून पडत असत; परंतु ‘आता तिचे आध्यात्मिक त्रासांशी लढण्याचे प्रयत्न वाढले आहेत’, असे आम्हाला जाणवते.
५ इ. तोंडवळा आनंदी दिसणे : पूर्वी ती सतत त्रासाच्या मनःस्थितीत असल्याने तिचा तोंडवळा त्रासिक आणि निराश जाणवत असे. आता त्रासाशी लढण्याचा भाग वाढल्याने तिचा तोंडवळा आनंदी दिसतो.
५ ई. पूर्वी छोट्या छोट्या प्रसंगांमध्येही मधुराला वाईट वाटत असणे आणि वडिलांच्या निधनानंतर ‘आपण चांगली साधना केल्यानेच बाबांना पुष्कळ आनंद होईल’, असे तिने आईला सांगणे : मधुराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या आईला त्यांची आठवण येऊन रडायला येत होते. तेव्हा मधुरा आईला म्हणाली, ‘‘बाबांनी माझ्यासाठी पुष्कळ केले आहे. ‘माझा त्रास लवकर न्यून व्हावा आणि माझी साधना चांगली व्हावी’, हीच त्यांची इच्छा होती. त्यामुळे आपण चांगली साधना केल्यानेच बाबांना पुष्कळ आनंद होईल.’’ पूर्वी छोट्या छोट्या प्रसंगांमध्येही मधुराला वाईट वाटत असे; परंतु ‘आता या कठीण प्रसंगात देवच तिला स्थिर ठेवून असे प्रगल्भ विचार सुचवत आहे’, असे आम्हाला जाणवले.
६. मधुराला नामजप करतांना वडिलांचा तोंडवळा आनंदी दिसणे आणि ‘मधुरा चांगली साधना करू लागली आहे’, याची जणू तिच्या वडिलांनी तिला पोच दिली’, असे जाणवणे : आम्ही मधुराला साधनेचे जे प्रयत्न करायला सांगतो, ते ती मनापासून करते. वडिलांच्या निधनानंतरही तिने स्वतःला सावरून साधनेचे प्रयत्न चालू ठेवले. कै. चतुर्भुजकाकांचे मधुरावर पुष्कळ प्रेम होते आणि मधुराचेही वडिलांवर पुष्कळ प्रेम होते. नामजप करतांना तिला वडिलांचा आनंदी तोंडवळा दिसला. त्या वेळी तिला आनंद झाला आणि तो आनंद तिच्या तोंडवळ्यावर दिसत होता. ‘मधुरा चांगली साधना करू लागली आहे’, याची जणू तिच्या वडिलांनी तिला पोच दिली’, असे आम्हाला जाणवले.
‘देव कठीण प्रसंगात साधकांना बळ देऊन त्या प्रसंगावर मात करण्याची शक्ती देतो’, हे मधुराच्या प्रसंगावरून आम्हाला शिकायला मिळाले.’
– सौ. अनघा शशांक जोशी (बी.ए. (संगीत), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि संगीत विशारद सुश्री (कुमारी) तेजल अशोक पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.६.२०२१)