कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर अंथरुणावर खिळून असतांना नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांच्यावर सतत कृपा करणारे भक्तवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) अंथरुणावर खिळून असतांना नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांच्यावर सतत कृपा करणारे भक्तवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

सौ. प्रमिला केसरकर अंथरुणाला खिळून असतांना त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले नामजपादी उपाय आणि काकूंचे पती अधिवक्ता रामदास केसरकर यांनी काकूंसाठी केलेले नामजपादी उपाय अन् त्यामुळे काकूंना झालेले लाभ’, यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत. या लेखात १८.९.२०२१ आणि २४.९.२०२१ या दिवशी परात्पर गुरुदेवांनी काकूंना सांगितलेल्या नामजपादी उपायांविषयी झालेला लाभ दिले आहेत. (२९.१०.२०२१ या दिवशी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचा निधनानंतरचा बारावा दिवस आहे.)

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. १८.९.२०२१

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्यासाठी प्रथम नामजपादी उपाय सांगणे आणि नंतर अधिवक्ता केसरकर यांना अंगठा अन् अनामिका यांची टोके जोडून मुद्रा करून नामजपादी उपाय करायला सांगणे : ‘१८.९.२०२१ या दिवशी परात्पर गुरुदेवांनी सौ. प्रमिला केसरकर यांना (काकूंना) होणार्‍या तीव्र शारीरिक त्रासांविषयी माझ्याकडून माहिती घेतली. नंतर त्यांनी केसरकरकाकूंसाठी नामजपादी उपाय सांगितले. त्यानंतर त्यांनी मला अंगठा आणि अनामिका यांची टोके जोडून मुद्रा करून सौ. प्रमिला यांच्या दोन्ही हातांवर आणि दोन्ही पायांवर प्रत्येकी २० मिनिटे, असे ४० मिनिटे श्रीकृष्णाचा जप करत नामजपादी उपाय करायला सांगितले. परात्पर गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘अशा प्रकारे दिवसभरात उपायांची ३ सत्रे करून ‘परिणाम काय होतो ?’, ते मला कळवा.’’

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

१ आ. परात्पर गुरुदेवांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे सौ. प्रमिला यांना काही प्रमाणात झोप लागणे; परंतु हाता-पायांच्या वेदना न्यून न होणे आणि अन्य त्रास होणे : आधी असह्य वेदनांमुळे सौ. प्रमिला यांना जराही झोप लागत नसे. परात्पर गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे मी नामजपादी उपाय केल्यामुळे त्यांना काही प्रमाणात झोप लागण्यास आरंभ झाला; मात्र त्यांच्या हाता-पायांत होणार्‍या वेदना न्यून झाल्या नाहीत. त्यानंतर ३ दिवसांनी सौ. प्रमिला यांना थंडी वाजून ताप आला. त्यांचा ताप १०३ डिग्रीपर्यंत जात असे. त्यांच्या दोन्ही पायांवरची सूजही वाढली. काकूंच्या तोंडात फोड येण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांना तोंडही उघडता येत नसे. त्यामुळे त्यांना चमच्याने पाणी पाजणेही कठीण होत होते. या यातनांमुळे त्या कण्हत आणि विव्हळत होत्या. २४.९.२०२१ या दिवशी मी त्याविषयी परात्पर गुरुदेवांना कळवले.

२. २४.९.२०२१

२ अ. परात्पर गुरुदेवांनी सौ. प्रमिला यांच्यासाठी नामजपादी उपाय सांगितल्यावर त्यांनी साधकाला सौ. प्रमिला यांच्यासाठी श्रीकृष्णाचा नामजप करायला आणि त्याला प्रार्थना करायला सांगणे : २४.९.२०२१ या दिवशी परात्पर गुरुदेवांनी मला सौ. काकूंना होणार्‍या वेदना आणि अन्य शारीरिक त्रास यासंदर्भात विचारले आणि त्यानंतर मी त्यांना थोडक्यात माहिती सांगितली. तेव्हा त्यांनी काकूंच्या शारीरिक स्थितीचे अवलोकन केले. परात्पर गुरुदेवांनी स्वतः काकूंसाठी नामजप केला. त्यानंतर त्यांनी मला हाताचे मधले बोट आणि अंगठा यांची टोके जोडून मुद्रा करून काकूंच्या आज्ञाचक्रावर ठेवून श्रीकृष्णाचा नामजप करायला सांगितला. त्यांनी मला मधून मधून श्रीकृष्णाला ‘देवा, तू आता यांना या यातनांतून मुक्त कर’, अशी प्रार्थना करायला सांगितली.

अधिवक्ता रामदास केसरकर

२ आ. सौ. प्रमिला यांची स्थिती पहाता पंखा लावता येत नसल्याने अशा पद्धतीने नामजपादी उपाय करणे कठीण होत असल्याचे परात्पर गुरुदेवांना सांगणे : मी सौ. प्रमिला यांच्यासाठी नामजपादी उपाय चालू केल्यावर मला २-३ मिनिटांतच घाम आला. त्या वेळी सौ. प्रमिला यांना थंडी वाजून ताप येत असल्याने पंखा लावता येत नव्हता; परंतु मला पुष्कळ उकडत असल्याने पंख्याविना असे नामजपादी उपाय करणे कठीण वाटत होते. त्यामुळे मी गुरुदेवांना अशा पद्धतीने नामजपादी उपाय करणे मला कठीण असल्याचे सांगितले.

२ इ. परात्पर गुरुदेवांनी ‘माझ्या आज्ञाचक्रावर तीच मुद्रा करून काकूंसाठी जप आणि प्रार्थना केल्यास त्यांना तेवढाच लाभ होईल’, असे सांगणे : तेव्हा परात्पर गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘विवाहित स्त्रिया नवर्‍याच्या नावाने कपाळावर कुंकू लावतात. तुम्ही काकूंचे पती म्हणून तुमच्या आज्ञाचक्रावर तीच मुद्रा करून काकूंसाठी जप आणि प्रार्थना केल्यास काकूंना तेवढाच लाभ होईल. तुम्ही काकूंना मधून मधून सांगा, ‘देव तुमची या यातनांतून लवकरच सुटका करणार आहे.’’ त्याप्रमाणे मी नामजपादी उपाय चालू ठेवले.’

– अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२१)

(क्रमशः)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/522898.html