लसीचा साठा आल्याचे समजताच सावंतवाडीत लसीकरण केंद्रावर गर्दी झाल्याने गोंधळ

कोरोनाविषयीचे नियम पायदळी

प्रतिकात्मक चित्र

सावंतवाडी – सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १० मे या दिवशी ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीचा दुसरा डोस उपलब्ध झाला आहे, हे समजताच सकाळी ६ वाजल्यापासूनच दुसरी लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे कोरोनाविषयीच्या नियमांचा फज्जा तर उडालाच; पण काही नागरिक डॉक्टर आणि कर्मचारी यांच्याशी वाद घालू लागल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या गोंधळामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारीही हतबल झाले. अखेर माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी लसीकरण केंद्रावर धाव घेतली अन् नागरिकांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी गर्दी केल्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय

सावंतवाडी – तालुक्यातील मळेवाड-कोंडूरे गावातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तात्पुरता स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायतीने घेतला आहे. या कक्षाला अनुमती मिळावी, यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

मालवण येथे कोरोनामुक्त होऊन पुन्हा सेवेत आलेल्या पोलीस अधिकार्‍यांचे उस्फूर्त स्वागत

मालवण – कोरोनावर मात करत पुन्हा सेवेत आलेले मालवण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण आणि भारत फारणे यांचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुलाबपुष्प देऊन उत्स्फूर्त स्वागत केले. काही दिवसांपूर्वी दोघेही कोरोनाबाधित झाले होते. १४ दिवसांचे अलगीकरण आणि उपचार संपल्यानंतर दोन्ही अधिकारी १७ दिवसांनंतर पुन्हा सेवेत रूजू झाले.