‘स्वयंपाक करतांना नामजप करणे महत्त्वाचे आहे’, याविषयी साधकाला आलेले अनुभव !

श्री. अपूर्व ढगे

‘स्वयंपाक करतांना मन एकाग्र असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला ‘कुठली कृती करायला हवी ?’, हे सुचते. मन एकाग्र नसेल, तर बर्‍याच चुका होतात आणि काही सुचतही नाही. उत्तम स्वयंपाक सिद्ध करण्यासाठी कृतीच्या स्तरावर सरावाची आवश्यकता तर आहेच; पण ‘मन स्थिर असणे, त्याहूनही अधिक आवश्यक आहे’, असे वाटते. ‘हे केवळ देवाच्या अनुसंधानात (म्हणजेच नामात) राहिल्यामुळे शक्य होऊ शकते’, याची मला अनुभूती आली.

१. पूर्वी पंचतारांकित उपाहारगृहातीलस्वयंपाक घरात नोकरी करतांना जाणवलेली सूत्रे

१ अ. पदार्थ बनवण्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे

१. स्वयंपाकघरात पुष्कळ लोकांचा आणि भांड्यांचा आवाज असायचा.

२. काम करणारे सहकारी विनाकारण कुचेष्टा करायचेे. मी त्यांना प्रत्युत्तर द्यायचो. त्या वेळी माझी चिडचिड व्हायची.

३. लोक पुष्कळ शिवीगाळ करायचे.

४. सेवा करतांना मीसुद्धा पुष्कळ बोलायचो आणि त्याची मला सवय लागली.

५. या सर्वांमुळे पदार्थ सिद्ध करतांना बर्‍याच वेळा मनाची एकाग्रता नसायची. कधी कधी ‘काय करावे ?’, हे सुचायचे नाही. त्यामुळे बर्‍याच चुका व्हायच्या.

६. पदार्थ सिद्ध करण्यासाठी समयमर्यादा असायची. त्यामुळे धावपळही व्हायची.

१ आ. नामजप आणि भावप्रयोग करत पदार्थ बनवू लागल्यावर जाणवलेले पालट

१. स्वयंपाकघरात होणार्‍या भांड्यांचा आणि लोकांच्या बोलण्याच्या आवाजाचा त्रास वाटायचा नाही. ‘आतून नामजप चालू असल्यामुळे बाहेरील गोष्टींचा आपल्यावर काही परिणाम होत नाही’, असे वाटायचे.

२. सेवा करतांना सहकारी चेष्टा करायचे. त्याचे मला काहीच वाटायचे नाही. त्यांना प्रत्युत्तर देण्याचे प्रमाण न्यून झाले आणि मला स्वतःत स्थिरता जाणवू लागली.

३. सेवा करतांना माझे अनावश्यक बोलणे व्हायचे. तेसुद्धा बर्‍याच प्रमाणात न्यून झाले.

४. सेवा करतांना मला आनंद मिळू लागला.

२. रामनाथी आश्रमात स्वयंपाकघरात पूर्णवेळ सेवा करतांना अनावश्यक बोलल्यावर जाणवलेली सूत्रे आणि नामजप करत सेवा केल्यावर जाणवलेला पालट

रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करायला लागल्यानंतर मी स्वयंपाकघरात सेवेला होतो. तेव्हा मी पुष्कळ अनावश्यक बोलायचो. मी सेवा करतांना आणि येता-जाता साधकांशी सतत काहीतरी बोलायचो. प्रथम मला त्याचे काही वाटायचे नाही; पण नंतर पुढील गोष्टी जाणवल्या.

अ. अनावश्यक बोलल्याने पुष्कळ थकवा यायचा.

आ. सेवेमध्ये मन एकाग्र होत नव्हते.

इ. स्वयंपाक करतांना आणि भाजी चिरतांना माझ्याकडून पुष्कळ चुका व्हायच्या.

वरील गोष्टी लक्षात येऊ लागल्यानंतर आपोआपच माझे मन नामजपाकडे केंद्रित झाले. सेवा करतांना माझा अधिकाधिक नामजप होऊन मला शांतता आणि स्थिरता जाणवू लागली.

३. बिस्किटे बनवण्याची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

अ. सेवा करतांना माझ्याकडून अनावश्यक बोलणे होत असले, तर ते माझ्या लगेच लक्षात येते.

आ. वातावरणात जडत्व जाणवते, तेव्हा मी लगेच शांत होतो आणि माझा नामजप चालू होतो.

त्यामुळे ‘कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आनंदी रहायचे असेल, तर नामजप करणे आवश्यक आहे’, याची मला अनुभूती आली’, यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अपूर्व प्र. ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक