रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात होत असलेल्या हवनाच्या वेळी करण्यास सांगितलेल्या श्री दुर्गादेवीच्या नामजपाच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

१. नवीन पनवेल  

अ. ‘एकदा हवनाच्या वेळी नामजप करतांना पुष्कळ झोप येत होती. नामजप प्रयत्नपूर्वक करावा लागला. त्याच्या दुसर्‍या दिवशी हवनाच्या वेळी नामजप करतांना नामजप सहज होत होता. हवनाचे दृश्य सूक्ष्मातून डोळ्यांसमोर दिसत होते. ‘आपण रामनाथी आश्रमातच आहोत’, असे मला वाटत होते.’ – श्री शंकर भोईर

आ. ‘हवनाच्या वेळी नामजप करतांना पहिल्या दिवशी श्‍वास घ्यायला त्रास होत होता. दुसर्‍या दिवशी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप विसरायला होत होते; परंतु त्यानंतर घरात पुष्कळ थंडावा जाणवत होता. मला पुष्कळ छान आणि प्रसन्न वाटत होते.’ – सौ. निशिगंधा वारके

इ. ‘पहिल्या दिवशी सूक्ष्मातून श्री दुर्गादेवी, दत्तात्रेय आणि शिव समोर बसून हवनात आहुती देत आहेत’, असे मला जाणवले. दुसर्‍या दिवशी नामजप करतांना झोप येत होती आणि घशात काहीतरी होत होते; पण ‘नामजप करावा’, असे मला वाटत होते.’ –  कु. केतकी वारके

ई. ‘नामजप करतांना हवनाचे दृश्य डोळ्यांसमोर दिसत होते. ‘हवन ज्या उद्देशाने होत आहे, त्याचा लाभ आम्हाला ग्रहण करता येऊ दे’, अशी प्रार्थना करून नामजप करायला आरंभ केल्यावर एकाग्रतेने नामजप झाला. त्या वेळी मला शांत वाटत होते.’ – सौ. आशा पाटील

उ. ‘नामजप करत असतांना ‘माझे पाय पुष्कळ दुखणे, गुडघा ठणकणे’, असे त्रास झाले; पण नंतर माझा नामजप नीट झाला. ‘नामजप करत असतांना रामनाथी आश्रमात आहे’, असा भाव ठेवला होता. दुसर्‍या दिवशी नामजप करतांना ‘सर्व देवता हवनाच्या ठिकाणी उपस्थित आहेत’, असे मला जाणवले. दुर्गादेवीचे अस्तित्व मला जाणवत होते.’ – सौ. ज्योती डफळ

ऊ. कृतज्ञताभाव जागृत होऊन आध्यात्मिक लाभ होणे आणि देवतांचे दर्शन होणे : ‘साधकांच्या रक्षणासाठी रामनाथी आश्रमात हवन होणार आहे’, ही सूचना वाचल्यावर ‘देव आपल्यासाठी किती करतो! देव आपले रक्षण करण्यासाठी यज्ञ करत आहे’, त्याविषयी पुष्कळ कृतज्ञताभाव निर्माण होऊन मन शांत झाले. नामजप करत असतांना पुष्कळ आध्यात्मिक लाभ होत होते. ‘आपण प्रत्यक्ष रामनाथी आश्रमामध्ये बसलो आहोत आणि हवन चालू आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळताई तिथे आहेत आणि श्री दुर्गादेवी, दत्तात्रेय अन् शिव तेथे प्रकट झाले आहेत. दुर्गामाता रामनाथी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर विराट रूप धारण करून उभी आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. सुनीता परब

ए. ‘रात्री नामजप करतांना ‘आपण रामनाथीला आहोत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी दुर्गादेवीच्या भोवती पुष्कळ लाल रंगाचे वलय दिसले. देवीचे रूप मारक दिसत होते. नंतर पुष्कळ अस्वस्थ वाटू लागले. नामजपादी उपाय केल्यावर माझा त्रास न्यून झाला; पण पुष्कळ वेळानंतर माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला आणि मला हलके वाटू लागले.’ – सौ वर्षा काठे

ऐ. ‘नामजप करतांना काही सेकंद मला कापराचा सुगंध आला. ‘जपाला बसण्यापूर्वी मी अत्तर आणि कापूर लावण्याचे उपाय केलेले नव्हते’, हे देवानेच या माध्यमातून माझ्या लक्षात आणून दिले.’ – श्री. बल्लाळ काणे

२. महाड  

‘हवन चालू असतांना नामजप करण्यास चालू केल्यावर शरिरात पुष्कळ उष्णता निर्माण झाली. ‘यज्ञकुंडामध्ये श्री दुर्गादेवी प्रकट झाली आहे’, असे जाणवले. संपूर्ण हवनाची जागा लाल रंगाची झाल्याचे लक्षात आले. मन पुष्कळ एकाग्र झाले होते. ध्यान लागण्यासारखी स्थिती झाली होती.’

– श्री. सुदेश पालशेतकर

३. कळंबोली

अ. ‘पाऊस पडल्यावर जसा गारवा जाणवतो, तसाच गारवा मला जाणवला. पावसाचे पाणी मातीवर पडल्यावर जसा सुगंध येतो, तसा सुगंध आला.’ – कु. श्रुती किचंबरे, कळंबोली

आ. ‘नामजप करतांना रामनाथी आश्रमात जाऊन गुरुदेवांचे रूप आठवून त्यांच्या चरणांवर फूल अर्पण करतांना माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते. आध्यात्मिक लाभ होत होता, तसेच नामजप भावपूर्ण झाला. ‘या भीषण आपत्काळात गुरुदेव किती काळजी घेतात !’, हे आठवून पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

– सौ. अश्‍विनी परब, खांदा कॉलनी

इ. ‘नामजप करत असतांना शरिरातील त्रासदायक शक्ती निघून जाऊन शरीर पूर्णपणे हलके वाटायचे आणि भावजागृती व्हायची.’

– श्री. गौरव मनवळ, खांदा कॉलनी