‘चांद्रयान’ मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘इस्रो’ (भारतीय अवकाश संशोधन संस्था) ‘गगनयान’ मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. ‘गगनयान’ ही मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. वर्ष २००७ मध्ये ‘इस्रो’ने या अंतराळ कार्यक्रमाचा प्रारंभ केला होता. वर्ष २०२० मध्ये या मोहिमेची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गगनयान’ मोहिमेसाठी पाठवण्यात येणार्या ४ अंतराळविरांच्या नावांची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिरूवनंतपूरम्मधील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्ही.एस्.एस्.सी.)’ला भेट देत ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन् नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन्, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या चौघांच्या नावांची घोषणा करत त्यांना मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. हे चारही जण भारतीय वायूसेनेतील आहेत. ‘ही ४ नावे किंवा ४ माणसे नसून या ४ शक्ती आहेत, ज्या १४० कोटी भारतियांच्या आकांक्षा अवकाशात घेऊन जातील’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. वर्ष १९८४ मध्ये अंतराळात गेलेल्या विंग कमांडर राकेश शर्मा (निवृत्त) यांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘४ दशकांनंतर भारतीय अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. या वेळी वेळ आणि रॉकेट दोन्हीही आपले असेल.’’
निवड करण्यात आलेले अंतराळवीर कोण आहेत ? ‘गगनयान’ मोहीम नक्की काय आहे ? आणि या अंतराळविरांची निवड नेमकी कशी करण्यात आली ? याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊ.
१. निवडलेले अंतराळवीर कोण आहेत ?
ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन् नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन्, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला हे बेंगळुरूमधील ‘एअरक्राफ्ट अँड सिस्टीम्स टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट’चे (ए.एस्.टी.ई.चे) भारतीय वायूसेनेचे प्रशिक्षित वैमानिक आहेत. या चारही जणांकडे ‘प्रशिक्षित वैमानिक’ म्हणून अनुभव आहे, ज्यामुळे त्यांची निवड ‘गगनयान’ मोहिमेसाठी योग्य मानली जात आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार नायर, कृष्णन् आणि प्रताप यांची नावे काही काळापूर्वीच निश्चित करण्यात आली होती, तर शुक्ला यांचे नाव या मोहिमेत नवीन आहे. ग्रुप कॅप्टन नायर यांनी ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’मधून (‘नॅशनल डिफेन्स अकादमी’मधून) पदवी प्राप्त केली. वर्ष १९९९ मध्ये ते वायूसेनेमध्ये ‘कमिशन्ड ऑफिसर’ म्हणून रुजू झाले. दैनिक ‘मातृभूमी’च्या वृत्तानुसार ते ‘सुखोई’ या लढाऊ विमानाचे सारथ्य करतात.
विशेष म्हणजे ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो)’ने वर्ष २०१९ मध्ये म्हटले होते की, या मोहिमेसाठी जाणारे अंतराळवीर प्रशिक्षित वैमानिक असतील; कारण या वैमानिकांकडे असणार्या अनुभवाचा लाभ त्यांना या मोहिमेत होईल.
२. अंतराळविरांचे प्रशिक्षण
निवडलेले ४ अंतराळवीर बेंगळुरू येथे प्रशिक्षण घेत आहेत. यापूर्वी त्यांनी १३ मासांच्या कालावधीसाठी रशियामधील ‘गॅगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर’मध्ये सखोल प्रशिक्षण घेतले आहे. अनपेक्षित ठिकाणी ‘क्रू मॉड्यूल’ पृथ्वीवर परतल्यास बर्फ आणि वाळवंट यांसारख्या वातावरणात रहायचे प्रशिक्षणही या अंतराळविरांनी घेतले आहे.
‘इस्रो’, ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ (डी.आर्.डी.ओ.) आणि भारतीय वायू दलाच्या अनुभवी तज्ञांनी प्रशिक्षणाचे स्वरूप ठरवले आहे. ‘न्यूज ९ लाईव्ह’च्या वृत्तात असे म्हटले आहे की, प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम विंग कमांडर राकेश शर्मा (निवृत्त) आणि एअर कमोडोर रवीश मल्होत्रा (निवृत्त) यांनी सिद्ध केला आहे. ‘सोव्हिएत इंटरकॉसमॉस प्रोग्राम’साठी घेतलेल्या प्रशिक्षणावर हा अभ्यासक्रम आधारित आहे. अंतराळवीर शारीरिक योग्यतेचे प्रशिक्षण, ‘सिम्युलेटर’ प्रशिक्षण (प्रशिक्षण उद्देशासाठी वापरले जाणारे विमानाच्या प्रणालीचे नियंत्रण) आणि ‘फ्लाईट सूट’ प्रशिक्षणही घेत आहेत.
३. गगनयान मोहीम
‘४०० किलोमीटरच्या ‘लो-अर्थ ऑर्बिट’मध्ये (एल्.ई.ओ.मध्ये) अंतराळवीर पाठवणे आणि त्यांना हिंद महासागरात सुरक्षितपणे परत आणणे’, हे गगनयानाचे उद्दिष्ट आहे. प्रजासत्ताकदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोहिमेची घोषणा केली होती. ‘गगनयान’ मोहीम वर्ष २०२२ मध्ये प्रक्षेपित होणार होती; परंतु ‘कोविड-१९’ महामारीमुळे मोहिमेला उशीर झाला. ‘इस्रो’ आता वर्ष २०२५ मध्ये प्रक्षेपण करण्याच्या विचारात आहे. ‘इस्रो’ची ही पहिली मानवी मोहीम यशस्वी झाल्यास भारताच्या प्रगतीसाठी हे पुष्कळ महत्त्वाचे ठरेल आणि रशिया, अमेरिका अन् चीन नंतर अंतराळ मोहिमेत भारत चौथ्या क्रमांकावर येईल. ‘रॉयटर्स’ वृत्तपत्राच्या वृत्तात असे म्हटले आहे की, या मोहिमेसाठी अनुमाने ९ सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान (तरतूद) करण्यात आली आहे.
‘गगनयान’ मोहिमेचा भाग म्हणून भारताने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महत्त्वपूर्ण चाचणी घेतली होती. ‘फ्लाईट टेस्ट व्हेईकल बॉर्ट मिशन-१’ (किंवा टीव्ही-डी १) या रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास ‘क्रू’ (अंतराळवीर) सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो कि नाही ? हे पहाण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती. चाचणीच्या यशानंतर ‘इस्रो’चे अध्यक्ष एस्. सोमनाथ म्हणाले, ‘‘टीव्ही-डी १’च्या यशस्वी चाचणीची घोषणा करतांना मला पुष्कळ आनंद होत आहे. वर्ष २०२५ मध्ये अंतराळविरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी चाचणी उड्डाण वर्ष २०२४ मध्ये रोबोटला अंतराळात घेऊन जाईल.’’
४. यशस्वी भारतीय अंतराळ मोहीम
अंतराळ क्षेत्रात भारताने लक्षणीय झेप घेतली आहे. वर्ष २०२३ मध्ये झालेल्या ‘चांद्रयान’ मोहिमेने तर इतिहास रचला आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश झाल्याने जगाच्या इतिहासात भारताने स्वतःचे नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे. यानंतरच्या सूर्य मोहिमेत ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी ‘आदित्य-एल् १’ लाँच केले. भारताचे ‘आदित्य-एल् १’ हे सूर्याच्या कक्षेत असून ते सौर यंत्रणेवर लक्ष केंद्रित करून आहे. भारताने वर्ष २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक स्थापन करण्याची आणि वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची नवीन योजनाही घोषित केली आहे.
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, २८.२.२०२४)