मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात !

‘माझ्या मुलाचा मी इंग्रजी माध्यमाच्या किंवा कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश घेतला आहे’, असे अभिमानाने (?) सांगणारे अनेक पालक आपल्याला दिसतात; पण ‘माझा मुलगा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतो’, हे सांगायला पालक कचरतात; कारण मराठी भाषेला सध्या अतिशय हीन दर्जाचे स्थान दिले जात आहे. अर्थात् तिला पुनर्जीवित करणे, हे मराठीजनांचे दायित्व आहे. मग त्यात पालक आणि शाळा या दोघांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. पुणे येथील ‘अक्षरनंदन’ या मराठी माध्यमाच्या शाळेचा प्रयत्न तितकाच स्तुत्य आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठीचे आवेदन शुद्ध मराठी भाषेत आहे. त्यात आई-वडिलांनी मराठीतच माहिती भरायची आहे. त्यात ‘इंग्रजी भाषेचे भावी आयुष्यातील महत्त्व ठाऊक असतांना तुम्ही मराठी माध्यमाची निवड का केली ?, मुलांच्या कलाने घेणे आणि लाडावणे यांत भेद काय ?, ही शाळा सेमी इंग्रजी नाही, त्याविषयी काय वाटते ?’, अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांद्वारे आई-वडिलांची अनेक गोष्टींकडे पहाण्याची मानसिकता, तसेच मराठी माध्यमातील मूल कसे घडू शकते ? याविषयीचा अंदाज घेता येऊ शकतो. या प्रश्नावलीचा शाळेला विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निश्चितच लाभ होईल. ‘अक्षरनंदन’ शाळेचा आदर्श अन्य मराठी माध्यमाच्या शाळांनी घेतल्यास मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यास वेळ लागणार नाही आणि अशा शाळांमध्ये पाल्याला प्रवेश घेण्यासाठी पालकांचाही ओढा वाढेल.

मुलांना मराठमोळे घडवा !

केवळ अस्खलित इंग्रजी बोलता येऊन स्वतःचे मूल चारचौघात उठून दिसावे, यासाठी आटापिटा करण्यापेक्षा ते सर्वांगांनी घडणे महत्त्वाचे आहे. हे घडणे केवळ मातृभाषेतूनच घडू शकते. इंग्रजीचा उदो उदो थांबवण्यासाठी शाळा आणि पालक यांनीच प्रयत्न करायला हवेत. ‘अक्षरनंदन’सारख्या शाळा निर्माण होण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलावीत आणि मराठीला महत्त्व देणार्‍या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनीही पुढाकार घ्यावा अन् अन्यांमध्ये जागृती करावी. तराजूत तोलल्यास इंग्रजी आणि मराठी यांमध्ये मराठीचे पारडे जड व्हायला हवे. मराठीला पुनर्वैभव मिळवून देणे मराठीजनांच्याच हातात आहे. बालकरूपी मातीच्या गोळ्याला मराठमोळे घडवा, त्याला इंग्रजाळलेले करू नका. त्यातच त्याचे उज्ज्वल भविष्य सामावलेले आहे.

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.