प.पू. दास महाराज यांनी उलगडलेल्या वरसई येथील सनातनचे ३५ वे संत आणि सुप्रसिद्ध वैद्य कै. (पू.) विनय भावेकाका यांच्या सहवासातील हृद्य आठवणी !

प.पू. दास महाराज यांनी उलगडलेल्या वरसई (तालुका पेण, जिल्हा रायगड) येथील सनातनचे ३५ वे संत आणि सुप्रसिद्ध वैद्य कै. (पू.) विनय भावेकाका यांच्या सहवासातील हृद्य आठवणी !

पू. (कै.) वैद्य विनय भावेकाका

‘सनातनचे ३५ वे संत आणि सुप्रसिद्ध वैद्य पू. विनय भावेकाका यांनी २५.६.२०२१ या दिवशी देहत्याग केला. त्यांनी ‘चिकाटी, नियोजनबद्धता, तळमळ, वात्सल्यभाव, संतांप्रती प्रचंड आदर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव’, या गुणांमुळे संतपद गाठून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेतले. त्यांनी इहलोकातून प्रस्थान करतांना या गुणांचा आदर्श आमच्यासमोर ठेवला. मला अशा संतांचा दीर्घ काळ सहवास लाभला. त्यांच्या सहवासातून परात्पर गुरुदेवांनी मला जे शिकवले, ती शिकवण शब्दबद्ध करून गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतो.

१. प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी एक दिवस आचारी न आल्याने सर्व भाविकांसाठी पू. भावेकाकांनी उत्तम भोजन बनवणे

वर्ष १९९५ मध्ये इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांचा भव्य अमृत महोत्सव सोहळा झाला. या सोहळ्याला सहस्रो भाविकांची उपस्थिती होती. सोहळ्याच्या सिद्धतेसाठी काही भाविक तेथेच निवासाला होते. एक दिवस भोजन बनवणारा आचारी आला नाही. त्यामुळे इतक्या भाविकांचे भोजन बनवण्याचा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा पू. भावेकाकांनी उत्तम स्वयंपाक बनवला. त्यांनी केलेला स्वयंपाक सर्वांना आवडला. त्यांच्यातील ही तळमळ शिकण्यासारखी आहे. अशा गुणांमुळेच अनेक संत त्यांच्याशी जोडले गेले. परात्पर गुरुदेवांची त्यांच्यावर विशेष कृपा झाली आणि ते संतपदाला पोचले.

२. प.पू. दास महाराज यांच्या डाव्या पायावर शस्त्रकर्म झाले असतांना पू. भावेकाकांनी त्यांना सांभाळून कांदळीला घेऊन जाणे आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीचे दर्शन घडवणे

प.पू. भक्तराज महाराज यांची कांदळी, जिल्हा पुणे येथे समाधी आहे. पू. भावेकाकांनी मला या समाधीचे प्रथमच दर्शन घडवले. वर्ष २००७ मध्ये माझा मोठा अपघात झाला होता. त्या वेळी माझ्या डाव्या पायावर शस्त्रकर्म करण्यात आले. याच स्थितीत वर्ष २००९ मध्ये पू. काकांनी मला सांभाळून कांदळीला नेले आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीचे दर्शन घडवले. त्या वेळी मी माझी मोठी माळ (प.पू. दास महाराजांनी १० सहस्र मण्यांची जपमाळ सिद्ध करून घेतली होती.) समाधीवर घातली. मी मौन साधना केली, त्या वेळी मला त्याच माळेने जप करता आला.

३. प.पू. दास महाराज यांना घरी (वरसई, तालुका पेण येथे) नेण्यासाठी पेण स्थानकावर पहाटे चारचाकी घेऊन येणे आणि येतांना त्यांच्यासाठी चहा घेऊन येणे

माझे वरसई, तालुका पेण, जिल्हा रायगड येथे पू. भावेकाकांच्या घरी सेवेनिमित्त जाणे व्हायचे. त्यांच्या घरी कधी कधी आमचा अनेक दिवस मुक्काम असायचा. एकदा परात्पर गुरुदेवांनी आम्हाला रायगडसह अन्य भागांतील मंदिरे, न्यास यांचे विश्वस्त आणि संत यांना संघटित करण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी घेण्याची सेवा दिली होती. आमच्या समवेत सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तकही असायचे. तेव्हा मी भल्या पहाटे बांदा येथून निघून रेल्वेने पेण येथे पोचत असे. तेथून वरसई १५ किलोमीटर दूर आहे. पू. भावेकाका चारचाकी घेऊन मला न्यायला यायचे. ते मला चहा आणि काहीतरी खायला घेऊन यायचे. त्यांच्यातील प्रेमभाव वाखाणण्याजोगा होता. त्यांनी घरी आलेल्या व्यक्तींना नेहमीच प्रेमाने खाऊ-पिऊ घातले होते.

४. घरी अनेक संतांचा सत्संग लाभणे

पू. भावेकाकांनी पुष्कळ अन्नदान केले आहे. त्यांच्या घरी नेहमी ब्राह्मणभोजन असायचे. पू. भावेकाकांच्या घरी एखादे संत आले की, त्या संतांच्या समवेत त्यांचे भक्तगणही असायचे. त्या सगळ्यांची निवास आणि भोजन यांची व्यवस्था पू. भावेकाका आपुलकीने करायचे. याच गुणांमुळे अनेक संत त्यांच्याशी जोडले गेले. भगवान प.प. श्रीधरस्वामींचे शिष्य तथा माझे गुरुबंधू पू. नीळकंठ महाराज हेही पू. काकांच्या घरी राहून गेले आहेत. प.पू. काणे महाराज यांच्यासारखे संतही पूर्वी त्यांच्या घरी येऊन गेले आहेत. अशा संतांची शक्ती त्यांना मिळत गेली आणि ते संतपदाला पोचले.

५. सतत वर्तमानकाळात राहून परिस्थिती स्वीकारणे

पू. नीळकंठ महाराज हे प.प. श्रीधरस्वामींचे पट्टशिष्य होते. त्यांची कांदळी येथे जाऊन प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. ते चौल (अलिबाग) येथे एका भक्ताकडे निवासाला असायचे. पू. भावेकाकांनी त्यांना कांदळी येथे समाधीस्थळी नेण्याचे नियोजन केले. त्यांच्या समवेत मीही होतो. आम्ही तेथे जायला निघण्याआधीच पू. नीळकंठ महाराज यांनी देहत्याग केल्याचे समजले. आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना दूरभाष करून याची माहिती दिली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘महाराज सूक्ष्मातून समाधीस्थळी पोचले आहेत. आता तुम्ही चौल येथे जाऊन त्यांचे अंत्यविधी करून या.’’ त्यानुसार पू. काकांनी आम्हाला लगेच चौल येथे अंत्यविधीला नेले. या प्रसंगातून पू. भावेकाका यांच्यातील ‘वर्तमानकाळात कसे रहावे ? पालटलेली परिस्थिती स्थिर राहून कशी स्वीकारायची ?’, हे गुण दिसून आले.

६. पू. भावेकाकांनी अनेक औषधे सिद्ध करून अनेक साधकांना दुर्धर आजारातून मुक्त केले असणे

पू. भावेकाका हे आयुर्वेदाचे प्रसिद्ध वैद्य होते. ‘धन्वन्तरिदेवतेची कृपा अखंड असावी’, यासाठी ते प्रतिवर्षी ‘धन्वन्तरि याग’ करायचे. धन्वन्तरि देवतेच्या कृपेने त्यांना अनेक औषधांचे ज्ञान प्राप्त झाले होते. मी एकदा त्यांच्याकडे झालेल्या ‘धन्वन्तरि यागा’च्या वेळी उपस्थित होतो. या यज्ञाला सूक्ष्मातून अनेक देवता अन् ऋषिमुनी उपस्थित असायचे. ते जणू त्रेतायुगातील वैद्य सुषेण (श्रीलंकेचा राजा रावण याचा राजवैद्य) यांचा अंश असल्यासारखे मला वाटायचे. त्रेतायुगात लक्ष्मण मूर्च्छित झाल्यानंतर सुषेण वैद्यानेच संजीवनी देऊन त्याचे प्राण वाचवले होते. पू. काकांनी अशा प्रकारे अनेक औषधी सिद्ध करून अनेक साधकांना दुर्धर आजारातून मुक्त केले आहे. रुग्णाला औषधे देण्यापूर्वी ते परात्पर गुरुदेवांचे स्मरण करायचे. असे वैद्य मिळणे, या काळात कठीण आहे.

७. ‘मरावे परि कीर्तीरूपे उरावे’ ही उक्ती सार्थ करणारे कै. (पू.) भावेकाका यांच्याप्रती कृतज्ञता !

‘नियोजनबद्धता, शिस्त, निरपेक्ष प्रेम, वात्सल्यभाव, परात्पर गुरुदेवांच्या प्रती अत्युच्च भाव’, अशा नानाविध गुणांमुळे पू. भावेकाका संतपदावर पोचले. पू. भावेकाका हे या लोकाची यात्रा लवकर सोडून वैकुंठ लोकात गेले. ते जातांना कीर्ती मागे ठेवून गेले. त्यांच्याप्रती जितकी कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी अल्पच आहे. ‘त्यांचे जीवनचरित्र आयुर्वेदात कार्य करणार्‍यांना आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शक राहील’, हे निश्चित.

परात्पर गुरुदेवांनी आम्हाला अशा संतांच्या सहवासात रहाण्याचे भाग्य दिले, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः प्रणाम करतो.’

– आपले चरणसेवक,

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१२.२०२१)

 येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक