जोधपूर (राजस्थान) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समोर भावपूर्ण नृत्य सादर केल्यावर ते पाहून कु. मधुरा भोसले यांना आलेली अनुभूती !

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

कु. वेदिका मोदी

‘जोधपूर येथील पू. (श्रीमती) सुशीला मोदीआजी आणि मोदी साधक कुटुंब हे सर्व रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम बघण्यासाठी आले होते. १०.१.२०२२ या दिवशी पू. (श्रीमती) सुशीला मोदीआजी आणि कुटुंबीय यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी त्यांच्या खोलीत भेट झाली. तेव्हा त्यांची नात कु. वेदिका मोदी (१४ वर्षे) ‘ओ कान्हा अब तो मुरली की मधुर सुनादो तान ।’ या भक्तीगीतावर सुंदर रितीने नृत्य सादर केले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी नृत्यापुरते श्रीकृष्णाचे तत्त्व जागृत झाल्याचे जाणवले. (अन्य वेळी त्यांच्यामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व निर्गुण-सगुण स्तरावर कार्यरत असते.) हे नृत्य करत असतांना तिने घागरा घातला होता. त्यामुळे तिच्या ठिकाणी ‘एक लहानशी गोपीच श्रीकृष्णाच्या पुढे तिचे भावपूर्ण नृत्य सादर करून नृत्यातून श्रीकृष्णाची उपासना करत आहे’, असे जाणवले. तिचे हे नृत्य चालू असतांना तिच्या हृदयातील भगवान श्रीकृष्णाप्रतीचा भाव जागृत झाला.

कु. मधुरा भोसले

त्यामुळे तिने या नृत्यामध्ये केलेल्या विविध हस्तमुद्रा आणि पदन्यास पहात असतांना त्यांतून भाव, चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींचे प्रक्षेपण होऊन संपूर्ण वातावरण कृष्णलोकाप्रमाणे झाले. भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आतूर झालेल्या एका गोपीतील मधुराभक्तीने ओतप्रोत भरलेला आर्तभाव तिच्या नृत्यातून जाणवत होता. त्यामुळे तिचे नृत्य पहात असतांना माझाही श्रीकृष्णाप्रतीचा आर्तभाव जागृत झाला. या नृत्याचा शेवट करतांना तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर मस्तक ठेवून मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या श्रीचरणांवर भावाश्रू वाहिले. तेव्हा तिची समर्पणभावातील मुद्रा पाहून शबरीने ज्याप्रमाणे प्रभु श्रीरामाच्या चरणी समर्पणभावाने मस्तक ठेवले होते, तसा समर्पणभाव वेदिकामध्ये जागृत झाल्याचे जाणवले. तिची भावमुद्रा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपाळूमुद्रा पाहून मोदी कुटुंबीय स्तब्ध झाले. ‘या भावावस्थेतून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते. हे नृत्य पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले,‘मुझे तो लगा मैं भी नृत्य सिखूं । ऐसा सुंदर नृत्य मैंने कभी नहीं देखा ।’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक