प्रेमळ, सेवाभावी आणि प.पू. भक्तराज महाराज अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. हरिभाऊ कृष्णा दिवेकर (वय ६१ वर्षे) !

२८.१२.२०२१ या दिवशी हरिभाऊ दिवेकर यांचे अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. ६.१.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

हरिभाऊ कृष्‍णा दिवेकर

१. प्रेमभाव

‘आमच्या घरी कुणीही आल्यास अण्णा (वडील, श्री. हरिभाऊ दिवेकर) त्यांना चहा-पाणी किंवा जेवण दिल्याविना जाऊ देत नसत. ते घरी आलेल्या व्यक्तीची प्रेमाने विचारपूस करायचे. ते गावचे पोलीस पाटील असल्यामुळे परिसरातील लोक काही अडचण असल्यास त्यांच्याकडे यायचे. त्या लोकांना ‘अण्णा आपली अडचण सोडवतील’, असा विश्वास असायचा.

२. पू. भावेकाका यांना सेवाभावाने साहाय्य करणे

संत पू. (कै.) वैद्य नीलकंठ भावेकाका हे अण्णांचे मित्र असल्याने आणि आमचे घरोब्याचे संबंध असल्याने ‘पू. भावेकाकांचे घर आपलेच घर आहे’, असा विचार करून अण्णांनी पू. (कै.) भावेकाका यांच्या आयुर्वेदीय औषधनिर्मितीच्या कार्यात त्यांना पूर्णपणे साहाय्य केले. हे सर्व ते सेवाभावाने करत असत.

३. मोठ्या व्यक्तींप्रती आदरभाव ठेवायला शिकवणे

एकदा आमच्या घरी एक व्यक्ती दारू पिऊन आली होती. तेव्हा मी (सौ. हेमलता पाटील) तिच्याशी मोठ्या आवाजात बोलत होते. त्या वेळी अण्णांनी मला लगेचच माझ्या चुकीची जाणीव करून दिली. ते म्हणाले, ‘‘कुणीही कितीही वाईट असला, तरीही आपण त्यांच्याशी चांगलेच बोलायला हवे.’’ या प्रसंगातून ‘मोठ्या व्यक्तींप्रती आदर कसा असायला हवा ?’, हे माझ्या लक्षात आले.

४. पू. भावेकाका यांच्या माध्यमातून सनातन संस्थेच्या संपर्कात येणे 

पू. (कै.) भावेकाका यांच्या माध्यमातून अण्णा सनातन संस्थेच्या संपर्कात आले आणि त्यांच्यामुळे आम्ही सर्व जण साधनेत आलो. त्यामुळे आम्हाला अण्णांप्रती कृतज्ञता वाटते.

५. त्यागी वृत्ती 

अण्णांनी मला (श्री. किशोर) पूर्णवेळ साधना करायला कधीच विरोध केला नाही. ते ‘मलाही लवकरात लवकर पूर्णवेळ साधक व्हायचे आहे’, असे सांगायचे.

६. अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड असणे 

बाळगंगा धरण प्रकल्पात झालेला अन्याय आणि भ्रष्टाचार यांविरुद्ध अण्णांनी कायदेशीर लढा दिला. या प्रकल्पात ज्या लोकांवर अन्याय झाला होता, त्यांच्या बाजूने अण्णा स्वखर्चाने न्यायालयीन कामे करत होते. त्यांचा हे साधना म्हणून करण्याचा प्रयत्न असायचा. सर्व कामे करतांना कितीही धावपळ झाली, तरी त्यांनी सर्वकाही आनंदाने स्वीकारले.

७. श्रद्धा 

एकदा एका कठीण प्रसंगात अण्णांना मोठ्या प्रमाणात पोलीस चौकशीला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी त्यांनी न घाबरता त्या प्रसंगाला तोंड दिले. यातून त्यांची प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती दृढ श्रद्धा दिसून आली.’

– श्री. किशोर दिवेकर (मुलगा), सनातन आश्रम, देवद, पनवेल; सौ. हेमलता पाटील (मोठी मुलगी), पेण, रायगड आणि सौ. दीपिका उंबरे (लहान मुलगी), लोणावळा, जिल्हा पुणे. (३१.१२.२०२१)


‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ असलेले कै. अनंत दिवेकर आणि कै. हरिभाऊ  दिवेकर ! 

(उभे) डावीकडून श्री. किशोर दिवेकर, सौ. अपर्णा दिवेकर, श्री. हरिभाऊ दिवेकर, श्री. संतोष दिवेकर, सौ. दीपाली दिवेकर, तसेच पुढील रांगेत (डावीकडून) कु. वेदश्री दिवेकर, (बसलेले) श्री. अनंत दिवेकर आणि सौ. निर्मला दिवेकर आणि कु. नंदिता दिवेकर

‘कै. अनंत दिवेकर आणि कै. हरिभाऊ दिवेकर या दोघांनाही मायेची आसक्ती नव्हती. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ अशा पद्धतीनेच दोघांनी आयुष्य व्यतीत केले. केवळ समाजातील लोकच नव्हे, तर गावातील आदिवासी लोकांनाही दोघांचा आधार असायचा. ‘जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला’ या उक्तीप्रमाणे त्यांचे जीवन आम्हाला अनुभवता आले. गुरुदेवांनी आम्हाला दोघांच्या माध्यमातून पुष्कळ शिकवले. ‘त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आम्हाला आचरण करता येऊ दे’, ही गुरुचरणी प्रार्थना !’ – श्री. संतोष दिवेकर, श्री. राजेंद्र दिवेकर आणि सौ. रंजना जानिरे (कै. अनंत दिवेकर यांची मुले) अन् श्री. किशोर दिवेकर, सौ. हेमलता पाटील आणि सौ. दीपिका उंबरे (कै. हरिभाऊ दिवेकर यांची मुले) (३१.१२.२०२१)


घरातील २ कर्त्या पुरुषांच्या अपघाती निधनाच्या मोठ्या संकटाला गुरुस्मरणाच्या बळावर सामोरे जात परात्पर गुरुदेवांच्या अखंड कृपेची प्रचीती घेणारे वरसई (करोटी) (ता. पेण, जिल्हा रायगड) येथील दिवेकर कुटुंबीय !

हरिभाऊ दिवेकर यांच्या अपघाती निधनानंतर सर्वांनाच जाणवले, ‘आपल्याला स्थिर राहूनच या प्रसंगाला सामोरे जायचे आहे.’ या प्रसंगांमध्ये त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

श्रीमती अपर्णा दिवेकर (कै. हरिभाऊ दिवेकर यांची पत्नी), करोटी (तालुका पेण, जिल्हा रायगड)

श्रीमती अपर्णा दिवेकर

यजमानांच्या निधनानंतर ‘त्या प्रसंगातून सावरण्यासाठी परात्पर गुरुदेवच शक्ती देत आहेत’, असे जाणवणे

‘यजमानांचे निधन झाल्याचे समजल्यावर प्रथम मी पुष्कळ अस्थिर झाले. मला अश्रू अनावर झाले. काही वेळानंतर मला परात्पर गुरुदेवांचे स्मरण झाले. ‘आलेल्या प्रसंगाला आता मला सामोरे जावे लागणार आहे’, याची मला जाणीव झाली आणि ‘गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) मला शक्ती देत आहेत’, असे मला वाटत होते. नंतर मला स्थिर आणि शांत वाटत होते.’

श्री. किशोर दिवेकर (कै. हरिभाऊ दिवेकर यांचे पुत्र), सनातन आश्रम, देवद, पनवेल. 

१. सकाळपासूनच गुरूंची स्तुती होत असणे आणि ‘पुढील कठीण प्रसंगात स्वीकारण्याच्या स्थितीत रहाता येण्यासाठी गुरुदेवांनी आधीच मनाची सिद्धता करवून घेतली’, असे जाणवणे : ‘ज्या दिवशी वडील आणि काका यांचा अपघात झाला, त्या दिवशी सकाळपासूनच माझ्याकडून गुरूंची स्तुती होत होती. ‘देवाने त्या माध्यमातून माझ्या मनाची आधीच सिद्धता करवून घेतली’, असे मला जाणवले. ‘पुढील कठीण प्रसंगात मला स्वीकारण्याच्या स्थितीत रहाता येण्यासाठी गुरुदेवांनी वातावरण निर्मिती करून घेतली होती’, असे मला वाटत होते.

२. वडिलांना रुग्णालयात भरती केल्यावर ‘तेथे उपस्थित असलेल्या साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवलेच तेथे आहेत’, असे जाणवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला संपूर्ण प्रसंगात स्थिर रहाता आले. माझ्या वडिलांना रुग्णालयात भरती केले होते. तेथे माझ्या समवेत सनातनचे काही साधकही असल्याने मला एकटेपणा जाणवला नाही. ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरच तिथे आहेत’, असे मला जाणवत होते.

३. ‘वडिलांच्या जगण्याची शाश्वती नाही’, असे ठाऊक असूनही मन स्थिर असणे आणि स्वतःच्या सभोवती परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : माझे मनातून अखंड गुरुस्मरण चालू होते. मला भीती किंवा ताण जाणवत नव्हता. ‘वडिलांच्या जगण्याची शाश्वती नाही’, हे ठाऊक असूनही माझे मन स्थिर होते. मला ईश्वरेच्छा म्हणून परिस्थिती स्वीकारता येत होती. माझ्या शरिराभोवती, तसेच मला माझ्या षट्चक्रांच्या ठिकाणी आणि पेशीपेशीत परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.

४. वडिलांच्या अंत्ययात्रेच्या वेळी मी मडके धरल्यावर माझा आतून ‘परम पूज्य’ असा नामजप होत होता.’

 

सौ. हेमलता पाटील (कै. हरिभाऊ दिवेकर यांची ज्येष्ठ कन्या), पेण, रायगड

दोघांचे मृत्यू झालेले असूनही वातावरणात सात्त्विकता जाणवणे 

‘अन्य ठिकाणी अशा प्रकारे मृत्यू झाल्यावर पुष्कळ गोंगाट असतो, तसेच वातावरणात जडपणा किंवा दाब जाणवतो. त्यामुळे डोके जड होते; पण आमच्या घरी तसे काहीही जाणवत नव्हते. दोघांचे मृत्यू झालेले असूनही वातावरणात सात्त्विकता जाणवत होती.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (३१.१२.२०२१)


अपघात होण्याच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना

अ. ‘अपघात होण्याच्या २ – ३ दिवसांपूर्वीच आम्हाला स्वप्नात दिसले, ‘कुणाचा तरी अपघात झालेला आहे.’ – श्री. राजेंद्र दिवेकर, श्रीमती अपर्णा दिवेकर (कै. हरिभाऊ दिवेकर यांची पत्नी) आणि सौ. हेमलता पाटील (कै. हरिभाऊ दिवेकर यांची ज्येष्ठ कन्या)

आ. ‘अपघाताच्या ४ – ५ दिवसांपूर्वी माझ्या मनात आपोआप विचार आला, ‘सर्व काही देवाच्या इच्छेने होत असते.’ त्या वेळी त्याचा संदर्भ माझ्या लक्षात आला नाही. सासर्‍यांचा अपघात झाल्याचे समजल्यावर तसा विचार येण्यामागील कार्यकारणभाव माझ्या लक्षात आला.’ – सौ. नम्रता दिवेकर

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (३१.१२.२०२१)


घरातील वातावरणाविषयी जाणवलेली सूत्रे

१. घरातील २ व्यक्तींचे अपघाती निधन होऊनही घरात शांतता आणि गारवा जाणवणे : ‘घरातील २ व्यक्तींचे अपघाती निधन होऊनही त्या संपूर्ण कालावधीत घरात कुठेही दाब किंवा वाईट स्पंदने जाणवत नव्हती. घरातील वातावरण भेसूर वाटत नव्हते. वातावरणात शांतता जाणवत होती. घरात गारवा जाणवत होता. गुरुदेवांच्या कृपेने सर्व जण स्थिर होते. ‘त्यांनीच आम्हाला शक्ती दिली’, असे वाटले. त्या शक्तीच्या बळावरच आम्ही सर्व जण इतक्या कठीण प्रसंगाला शांतपणे सामोरे जाऊ शकलो.

२. सांत्वन करण्यासाठी येणार्‍या व्यक्तींनी ‘घरात नेहमीप्रमाणे चांगलेच जाणवत आहे’, असे सांगणे : आमचे सांत्वन करण्यासाठी येणार्‍या व्यक्ती घरात आल्यावर प्रथम संकोचून बोलत असत; मात्र घरातील वातावरणामुळे त्या नंतर सहजतेने बोलायच्या. अनेक जणांनी सांगितले, ‘‘तुमच्या घरात आल्यावर इतका मोठा कठीण प्रसंग घडला आहे’, असे वाटतच नाही. तुमच्या घरात नेहमीप्रमाणेच चांगले जाणवत आहे.’’

– दिवेकर कुटुंबीय (३१.१२.२०२१)


प्रतिकूल प्रसंगात गुरुदेवांनी फुलासारखे सांभाळल्यामुळे दिवेकर कुटुंबियांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘गुरुदेवा, आम्हा कुटुंबियांवर इतका मोठा प्रसंग प्रथमच ओढवला. असे असतांनाही तुम्ही आम्हा सर्वांना अगदी फुलासारखे सांभाळलेत. तुम्ही आम्हाला कोणतीही झळ पोचू दिली नाहीत. या प्रसंगाला सामोरे जाण्याची आमची क्षमताच नव्हती. तुम्हीच आमचे रक्षण केलेत, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. साधक, जवळचे नातेवाईक, तसेच राजकीय क्षेत्रातील काही मंडळी यांनीही आम्हाला या प्रसंगात पुष्कळ सहकार्य केले. ‘गुरुदेवा, त्यांच्या माध्यमातून तुम्हीच आमची काळजी घेतलीत’, असे आम्हाला वाटले. ‘प्रतिकूल काळात साधनाच आपल्याला तारून नेते’, हे आतापर्यंत ऐकले, वाचले होते. या मोठ्या संकटकाळात आम्ही ते अनुभवले. तुम्ही आम्हा कुटुंबियांवर केलेल्या अपार कृपेसाठी कोटीशः कृतज्ञता !’ – दिवेकर कुटुंबीय (३१.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक