परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर तीव्र प्रारब्धभोग आनंदाने भोगणार्‍या कै. (सौ.) प्रमिला केसरकर !

कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांची सौ. वैशाली मुद्गल यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

१. सौ. केसरकरकाकूंच्या बोलण्यातून त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेली श्रद्धा, भाव आणि तळमळ दिसून येणे

‘केसरकरकाकू सतत भावावस्थेत राहून त्रासावर मात करण्याचा प्रयत्न करायच्या. त्या नेहमी म्हणायच्या, ‘‘सर्वकाही आपल्या प्रारब्धानुसार घडत असते. त्यामुळे कधीही देवाला दोष द्यायचा नाही. आपले प्रारब्ध आणि त्रास देव अन् परात्पर गुरु डॉ. आठवलेच सहन करत आहेत. आपण ते कणभरच सोसतो.’’ यातून त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेली श्रद्धा, भाव आणि तळमळ दिसून येते. ‘हे शरीर गुरूंनी दिले आहे’, असा काकूंचा भाव असायचा.

सौ. वैशाली मुद्गल

२. केसरकरकाकूंना ‘एवढ्या आजारपणातही तुम्ही आनंदी कशा ?’, असे विचारल्यावर त्यांनी ‘त्यांच्यातील भावाची दोरी परात्पर गुरु डॉक्टरांकडे असून आनंदही त्यांच्यातच सामावलेला आहे’, असे सांगणे

काकूंच्या तोंडवळ्यावर कधी दुःख किंवा काळजी दिसत नव्हती. त्या नेहमी आनंदी आणि उत्साही दिसायच्या. मी त्यांना विचारायचे, ‘‘काकू, तुम्हाला एवढा मोठा आजार आहे, तरीही तुम्ही एवढ्या आनंदी कशा आहात ?’’ तेव्हा त्या म्हणायच्या, ‘‘माझा आनंद परात्पर गुरु डॉक्टर यांच्यात सामावला आहे. माझी भावाची दोरी परात्पर गुरु डॉक्टरांकडे आहे. तेच मला नामजपादी उपायांच्या माध्यमातून सर्व सहन करण्याची शक्ती आणि आनंद देतात. तुम्ही काळजी करू नका. परात्पर गुरु डॉक्टर तुमचाही त्रास शीघ्रतेने न्यून करतील. तुम्ही केवळ कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण करा.’’ तेव्हा त्यांची देवाप्रती श्रद्धा दिसून आली.

३. शतपावली करतांना एकमेकींशी साधना आणि सेवा यांसंदर्भात बोलणे अन् ‘साधनेत आध्यात्मिक मैत्रिणी होण्यास बंधन नसते’, असे केसरकरकाकूंनी सांगणे

आम्ही प्रतिदिन शतपावली (भोजनोत्तर थोडेसे मंद गतीने फिरणे) करतांना एकमेकींना ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्यात काय शिकायला मिळाले ? सेवेतून आनंद मिळाला का ? आज भावप्रयोग कोणता केला ?’, असे व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यासंदर्भात बोलू लागलो. त्यामुळे आम्ही दोघी आध्यात्मिक मैत्रिणी झालो. ‘साधनेत आध्यात्मिक मैत्रिणी होण्यास कसलेही बंधन नसते’, असे काकू म्हणायच्या.

४. (कै.) सौ. प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे

अ. काकूंचा तोंडवळा पिवळा दिसत होता. ‘त्यांच्यातील तेजतत्त्व वाढत असून त्या शांतपणे गुरुचरणी विलीन झाल्या आहेत’, असे मला जाणवले.

आ. काकूंचे डोळे बंद होते; परंतु त्यांच्या डोळ्यांत मला जिवंतपणा जाणवत होता.

इ. ‘त्या नामजप करत आहेत’, असे मला जाणवले.

५. अनुभूती

काकूंच्या डोक्याजवळ सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अनेक देवता दिसल्यावर माझी भावजागृती झाली.’

– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक