६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या अंत्यविधीपूर्वी त्यांच्या पार्थिवाला वस्त्रालंकार घालण्याची सेवा करतांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘१८.१०.२०२१ या रात्री १०.३० वाजता सनातनच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे निधन झाले. गुरुकृपेने मला त्यांच्या अंत्यविधीपूर्वी त्यांच्या पार्थिवाला वस्त्रालंकार घालण्याची सेवा करण्याची संधी मिळाली. ती सेवा करतांना काकूंच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

१. १८.१०.२०२१ या दिवशी रात्री ११.३० वाजता जाणवलेली सूत्रे

१ अ. खोलीत लावलेल्या ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपामुळे वातावरण हलके रहाण्यास साहाय्य होणे : केसरकरकाकूंचे निधन झाल्याचे कळल्यानंतर मी आणि आश्रमातील साधिका कु. राजश्री सखदेव रात्री ११.३० वाजता काकूंच्या खोलीकडे गेलो. काकूंचे निधन झाले असूनही वातावरणात फारसा पालट जाणवला नाही. खोलीत लावलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप वातावरण हलके करण्यास साहाय्य करत होता. ‘सगळे अगदी सहजतेने चालू आहे’, असे जाणवले.

१ आ. काकूंचे पार्थिव कडक आणि जड होणे : साधक काकूंच्या दोन्ही पायांचे अंगठे एकत्र बांधत असतांना साधकांना त्यांचे दोन्ही पाय जवळ घेणे कठीण जात होते. साधकांनी काकूंचे हात काकूंच्या पोटावर ठेवण्याचा प्रयत्न केला असता काकूंचे हात कोपरातून दुमडले जात नव्हते. ते त्यांच्या पोटावरही रहात नव्हते. ते घरंगळून खाली येत होते. तेव्हा त्यांचे पार्थिव कडक आणि जड झाले होते.

२. १९.१०.२०२१ या दिवशी पहाटे ५.३५ वाजता जाणवलेली सूत्रे

१९.१०.२०२१ या दिवशी पहाटे ५.३५ वाजता सेवा करण्यासाठी मी आणि कु. राजश्री सखदेव केसरकरकाकूंच्या खोलीत गेलो. त्या वेळी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

२ अ. काकूंची उंची न्यून झाल्याचे जाणवणे : मी पार्थिवाकडे पाहिले असता मला काकूंची उंची आधीपेक्षा न्यून जाणवली. ‘रुग्णाईत असतांना देह कृश होतो’, हे समजू शकते; पण ‘त्यांची उंची न्यून झाल्याचे मला  का जाणवत होते ?’, ते कळले नाही. मी तिथे जवळजवळ सव्वा दोन घंटे होते. तेव्हा ‘काकूंची उंची न्यून झाल्याचा मला भास होत आहे का ?’, असे वाटून मी ३-४ वेळा त्यांच्या पार्थिवाकडे पाहिले. तेव्हा प्रत्येक वेळी मला तसेच जाणवले.

(सर्वांचीच उंची देहत्यागानंतर थोडी कमी होते; कारण सर्व स्नायू शिथिल होतात. – संकलक)

श्रीमती मेघना वाघमारे

२ आ. देह हलका झाल्याचे जाणवणे : एका रुग्णशय्येवर काकूंचे पार्थिव ठेवले होते. तेथे वावरण्यासाठी मोकळी जागा व्हावी; म्हणून आम्ही (मी आणि राजश्री सखदेव यांनी) रुग्णशय्या थोडी पुढे ओढली. रात्री त्यांचा देह कडक आणि जड झाला होता; परंतु त्या वेळी रुग्णशय्या अगदी सहजपणे पुढे ओढली गेली.

२ इ. काकूंजवळ गेल्यावर त्या प्रतिसाद देत असल्याचे जाणवणे : पार्थिवाला वस्त्रालंकार घालण्याची सेवा चालू करण्यापूर्वी मी पार्थिवाजवळ गेले आणि काकूंचा तोंडावळा पाहिला. त्यांच्या उजव्या डोळ्याच्या पापणीची हालचाल झाल्याचे मला जाणवले. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ‘मी त्यांच्याजवळ गेल्याचे त्यांच्या लक्षात आले असावे’, असा प्रतिसाद मला त्यांच्या त्या डोळ्यातून आणि तोंडवळ्यावर दिसला.

२ ई. पोट सोडून इतरत्रच्या त्वचेवर सुरकुत्या नसणे : त्यांच्या पोटावर पडलेल्या सुरकुत्यांमुळे तेथील त्वचा सुकल्यासारखी शुष्क वाटत होती. त्या व्यतिरिक्त त्यांच्या हाता-पायांच्या आणि तोंडवळ्याच्या त्वचेवर सुरकुत्या नव्हत्या.

२ उ. ‘काकूंचे प्राण डोळ्यांतून गेले असावेत’, असे वाटणे : ‘काकूंचे प्राण डोळ्यांतून गेले असावेत’, असे मला वाटले. याविषयी मी कुणाला विचारले नाही किंवा निश्चिती केली नाही; मात्र त्यांचा उजवा डोळा अर्धवट उघडा होता आणि डावा डोळा पूर्ण बंद झाला होता. ‘उजव्या डोळ्यातून त्या माझ्याकडे पहात आहेत’, असे मला जाणवले. काही वेळानंतर मी त्यांचा उजवा डोळा पूर्ण बंद केला. साधारणपणे अर्ध्या घंट्याने तो पुन्हा आपोआप उघडला.

कु. राजश्री सखदेव

२ ऊ. देह लवचिक होणे

२ ऊ १. काकूंचे हात लवचिक झाल्याने त्यांना सहजतेने वस्त्र नेसवता येणे आणि त्यांच्या हातात बांगड्या सहजतेने भरता येणे : पार्थिवाला वस्त्र नेसवतांना अगदी सहजपणे नेसवले गेले. काकूंचे हात मुळीच कडक झाले नव्हते. ते लवचिक असल्याने त्यांना पोलके (ब्लाऊज) अगदी सहजपणे घालता आले. साडी नेसवतांना त्यांना एकदा डाव्या आणि एकदा उजव्या, अशा दोन्ही बाजूंनी कुशीवर वळवले. तेव्हाही ‘एखाद्या गलितगात्र रुग्णाची सेवा करतांना त्याने प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करावा, तसाच काहीसा प्रतिसाद काकू देत आहेत’, असे आम्हाला वाटले. काकूंच्या हातात बांगड्या भरतांना त्या अगदी सहजच भरल्या गेल्या.

२ ऊ २. काकूंची मान सहजतेने उचलली जाणे : काकूंना साडी नेसवतांना त्यांच्या डोक्यावरून पदर घेण्यासाठी त्यांची मान उचलली असता ती अगदी सहजपणे उचलली गेली. तेव्हाही ‘त्या प्रतिसाद देत आहेत’, असे मला जाणवले.

२ ऊ ३. काकूंचे हात सहजतेने हालवता येणे : त्यानंतर मी त्यांचा एक हात पोटावर ठेवण्यासाठी उचलला. तेव्हा तो अगदी सहजपणे उचलला गेला आणि पोटावर ठेवल्यावर तो तिथे तसाच राहिला. नंतर मी त्यांचा दुसरा हात उचलला आणि पोटावर ठेवलेल्या त्यांच्या हातावर ठेवला. तोही तिथे तसाच राहिला. ‘अशा प्रसंगातील नेहमीच्या अनुभवापेक्षा हे काही वेगळे आहे’, असे आम्हाला जाणवले. व्यक्तीचे अंग जिवंतपणी जसे लवचिक असते, तसे काकूंचे संपूर्ण अंग मला आणि कु. राजश्री सखदेव यांना लवचिक जाणवले.

२ ऊ ४. अर्ध्या घंट्यानंतरही देहाची लवचिकता टिकून रहाणे : ‘अर्ध्या घंट्यानंतर पार्थिवाची लवचिकता अजून तशीच आहे का ?’, हे पहाण्यासाठी मी काकूंचे दोन्ही हात पोटावरून खाली भूमीला समांतर ठेवले आणि नंतर पुन्हा उचलून त्यांच्या पोटावर ठेवले. त्या वेळीही त्यांच्या देहाची लवचिकता टिकून होती.

२ ए. केस रेशमासारखे मऊ असणे : काकूंचे केस रेशमासारखे अगदी मऊ मुलायम वाटले. मी त्यांच्या केसांना थोडे तेल लावून ते नीट बसवण्याचा प्रयत्न केला, तरीही केसांचा मुलायमपणा तसाच होता.

२ ऐ. काकूंना वस्त्रालंकार घातल्यानंतर ‘त्यांचे तोंड अधिक उघडले गेले’, असे मला आणि कु. राजश्री सखदेव यांना जाणवले.

२ ओ. काकूंच्या देहाला उगवत्या सूर्यकिरणांचा स्पर्श होणे आणि त्यांच्या नखांवरून प्रकाश परावर्तीत होतांना दिसणे : काकूंना वस्त्रालंकार घालण्याची सेवा पूर्ण झाली आणि त्याच वेळी त्यांच्या खोलीच्या खिडकीतून उगवतीच्या सूर्याच्या किरणांनी त्यांच्या देहाला स्पर्श केला. काकूंच्या हाताची तर्जनी आणि अनामिका यांच्या नखांवरून प्रकाश परावर्तित होतांना दिसला. हे परावर्तन अगदी जवळून, ४-५ फुटांवरून आणि खोलीच्या बाहेरूनही दिसत होते. त्यांच्या हातांच्या अन्य बोटांची नखे केवळ चमकतांना दिसली.

२ औ. ही सर्व सेवा अल्पावधीत पूर्ण होणे : या पूर्वी २ – ३ प्रसंगांत ही सेवा करण्यासाठी आम्हाला एक घंट्यापेक्षा अधिक अवधी लागला होता; मात्र ही संपूर्ण सेवा केवळ ३५ ते ४० मिनिटांत पूर्ण झाली. हेही आम्हाला वेगळे वाटले.’

– श्रीमती मेघना वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०२१)

मृत व्यक्तीचे शरीर कडक आणि पुन्हा मऊ होण्याची प्रक्रिया

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

‘रायगर मॉर्टिस’ म्हणजे ‘स्नायूंचा मृत्यूत्तर कडकपणा’ ही प्रक्रिया मृत्यूनंतर १ ते ४ घंट्यांनंतर प्रथम तोंडवळ्याच्या स्नायूंमध्ये आरंभ होते, ६ घंट्यांनंतर अन्य स्नायूंमध्येही ती दिसू लागते आणि एकूण १२ घंट्यांनंतर ती पूर्ण होते. त्यानंतर १२ घंट्यांनंतर स्नायू परत सैल होतात.’

– डॉ. दुर्गेश सामंत (२६.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक