परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत विविध सूक्ष्मातील प्रयोग करतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे श्री. नवीन येल्लांबलसे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. नवीन येल्लांबलसे

अ. ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत सूक्ष्मातील प्रयोग करण्यासाठी प्रथमच जात होतो. मी खोलीत गेल्यावर माझा श्वास आणि वेळ यांची मला जाणीव नव्हती. मला अत्यंत शांत वाटत होते. ‘अशी आनंददायी जागा असू शकते’, याची मी कल्पनाच केली नव्हती.

आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील लाद्या प्रत्यक्षात बदामी रंगाच्या आहेत; परंतु मला बर्‍याच ठिकाणी ‘त्या गडद गुलाबी रंगाच्या आहेत’, असे जाणवत होते.

इ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या पटलाजवळ उभे राहून प्रयोग करतांना ‘पटलावर गुलाबी रंगाचे डाग उमटून अदृश्य होत आहेत’, असे मला दिसले.

ई. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील भिंतीवर कपाळ आणि हात ठेवून काय जाणवते ?’, असे पहातांना मला त्या ठिकाणी भगवान शिवाचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवले. त्या वेळी मला शिवाचे रूप दिसले. शिवाने त्याच्या जटा बांधल्या असून त्या जटांतून गंगा वहात होती. मला १ मिनिट शिवाचे तसे रूप दिसत होते.

उ. वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे तेथील आरशावर आलेल्या ओरखड्यांकडे पहातांना माझा श्वास बंद होत होता.

ऊ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत प.पू. नीब करौरी बाबा आणि अन्य संत यांच्या प्रतिमा आहेत. त्यांकडे पहातांना परात्पर गुरु डॉक्टरांची व्यापकता आणि प्रीती हे गुण माझ्या लक्षात आले. त्यामुळे ‘केवळ परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेला साधनामार्ग तेवढा योग्य आणि अन्य साधनामार्ग किंवा गुरु कनिष्ठ प्रतीचे’, या माझ्या संकुचित विचारसरणीत पालट करण्याची प्रेरणा मला मिळाली.

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रसाधनगृहात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

येथील राखाडी रंगाच्या लादीवर उभे राहिल्यावर ‘माझे शरीर डोलत आहे’, असे मला जाणवले. सूक्ष्मातील हे प्रयोग चालू असतांना ‘प्रयोगाला आरंभ होऊन केवळ ५ – १० मिनिटेच झाली आहेत’, असे मला वाटले; परंतु तेव्हा प्रत्यक्षात २० मिनिटे झाली होती. प्रयोग पूर्ण झाला असतांना प्रत्यक्षात १ घंट्याहून अधिक वेळ झाला होता; परंतु मला मात्र ‘केवळ १५ – २० मिनिटे झाली असावीत’, असे वाटले.’
– श्री. नवीन येल्लांबलसे, फ्रान्स, युरोप. (९.१.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक